ग्रंथप्रदर्शन निबंध मराठी – Granth Pradarshan Nibandh Marathi

ग्रंथ हे आपले गुरू आहेत, मार्गदर्शक आहेत, चांगले मित्र आहेत. त्यांच्यापाशी ज्ञानविज्ञानाचा जणू खजिनाच असतो. एखादा लेखक काळाच्या उदरात गडप झाला तरी त्याने मांडलेले श्रेष्ठ विचार पुस्तकरूपात पुढील पिढ्यांसाठी जिवंत राहातात. उत्तम पुस्तकांचे वाचन करणे म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींचे विचार समजून घेणे असते.

आमच्या गावात जेव्हाजेव्हा ग्रंथप्रदर्शन भरते तेव्हातेव्हा त्याला भेट द्यायला मी जाते. ह्या ठिकाणी वाचक आणि लेखक एकत्र येतात. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके आपल्याला एका जागी मिळतात. पुष्कळदा आमच्या गावातील पुस्तकांच्या दुकानात जी पुस्तके पाहायलाही मिळत नाहीत ती पुस्तके मला ह्या ग्रंथप्रदर्शनात पाहाता येतात, चाळता येतात आणि विकतही घेता येतात. माझ्या आवडीच्या विषयांवर कुठली नवीन पुस्तके बाजारात आली आहेत हे मला ग्रंथप्रदर्शनात गेल्यामुळेच समजते. पुस्तकाची पाने चाळून त्याचा दर्जा आणि विषयसूची ह्यांचा अंदाज बांधता येतो. ह्या ठिकाणी इतर वाचकांचीही भेट होते. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते तसेच कुठले पुस्तक चांगले आहे, कुठले वाचायचे अजून राहिले आहे हेसुद्धा समजते.

परवाच मी आमच्या गावात भरलेल्या एका ग्रंथप्रदर्शनाला गेले होते. तिथे देशभरातील प्रकाशकांचे स्टॉल्स होते. बरीच गर्दी लोटली होती. इतिहास, भूगोल, शास्त्र, प्रवास, धार्मिक, भाषा, चरित्र, कादंब-या, कविता, ललित लेख, नाटके, पाकशास्त्र, व्यक्तिमत्व विकास, बालसाहित्य अशा अनेक विषयांवरील ग्रंथ तिथे होते. अधिक करून पुस्तके मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या भाषांमधीलच होती. तिथे ब-याच शाळांतील मुलेसुद्धा आली होती. बरेच लोक पुस्तके विकत घेण्यात गुंग होते. काही घोळक्यात उभे राहून पुस्तकांविषयी चर्चा करीत होते.

सर्वसाधारणपणे ग्रंथप्रदर्शनाच्या वेळेस पुस्तकांच्या किंमतीवर काही टक्के सवलत दिली जाते. त्याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर, डायरी अशा वस्तूही भेट मिळत होत्या. त्या प्रदर्शनातून मी विज्ञानकथांचे एक पुस्तक आणि माझ्या बहिणीसाठी हॅरी पॉटरचे पुस्तक विकत घेतले

त्याशिवाय मी आणखीही काही पुस्तके विकत घेतली. ती पुस्तके मी अशासाठी विकत घेतली की मला लोकांना भेट म्हणून पुस्तकेच द्यायला आवडतात. त्यामुळे मी दर वर्षी बारा पंधरा चांगली पुस्तके विकत घेते आणि ती लोकांना भेट म्हणून देते. त्यामुळे साहजिकच वाचनप्रसारही होतो. तर असे आहे ग्रंथप्रदर्शनाचे महत्व.

ग्रंथप्रदर्शन निबंध मराठी – Granth Pradarshan Nibandh Marathi

पुस्तके अमूल्य आहेत. ते आपले सर्वात चांगले मित्र आहेत. कारण ते ज्ञान-विज्ञानाचे भांडार आहे. मनुष्य येतो आणि जातो परंतु त्याचे श्रेष्ठ विचार, ज्ञान, उपदेश, संस्कृती, सभ्यता ही मानवी मूल्ये पुस्तकांच्या रूपात जिवंत राहतात. उत्तम पुस्तकांचे अध्ययन याचा अर्थ श्रेष्ठ व्यक्ती आणि त्यांचे विचार समजून घेणे व त्या विचारांशी मैत्री करणे. त्यांच्यापेक्षा चांगला दुसरा कुणी मित्र नाही.

ग्रंथ प्रदर्शने आपल्यासाठी एक वरदान आहे. इथे वाचक व लेखक एकत्र येतात. या ठिकाणी सर्व विषयांवरील सर्व प्रकारची पुस्तके सहजपणे मिळतात. वाचक आपली आवड, योग्यता आणि आवश्यकतेनुसार पुस्तकांची निवड करू शकतात. पुस्तकाची पृष्ठे उलटून त्याची गुणवत्ता, विषय सूची इत्यादी पाहू-वाचू शकतात. विषय, मूल्य इत्यादींची विविधता असते. या खेरीज एक वाचक दुसऱ्या वाचकाशी, विचारांची देवाण घेवाण करू शकतात. अशा प्रदर्शनात पुस्तकांवर चर्चा होतात. हे सर्व वाचकांसाठी फार लाभदायक ठरते.

काही दिवसांपूर्वी आमच्या गावात भरलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात जाण्याची संधी मला मिळाली. देशभरातील प्रकाशक व पुस्तक विक्रेते यांचे स्टॉल्स त्यात होते. मी माझ्या वडिलांसोबत गेले होते. प्रदर्शनात बरीच गर्दी होती. इतिहास, भूगोल, शास्त्र, साहित्य, प्रवास, धर्म, भाषा, चरित्र इ. सर्व विषयांवर पुस्तके होती. देशातील जवळपास सर्व प्रमुख . भाषांतील पुस्तके होती. परंतु सर्वात जास्त पुस्तके इंग्रजी आणि मराठीची होती.

अनेक शाळांचे विद्यार्थी तेथे आले होते. लोक पुस्तके खरेदी करण्यात व्यस्त होती वा पुस्तके पाहत होती. काही लोक गटागटाने पुस्तकांवर चर्चा करीत होते. लोकांच्या आवडीनुसार भरपूर पुस्तके होती. पुस्तकांवर आकर्षक सूट होती. कित्येक पुस्तक विक्रेते नव्या वर्षाचे कॅलेंडर, डायरी इत्यादी पुस्तकांबरोबर भेट म्हणून देत होते. माझ्या वडिलांनी नवी-जुनी सर्व पुस्तके पाहिली व काही कादंबऱ्या तसेच आत्मचरित्रे विकत घेतली. मी एक विज्ञान शब्दकोश व हॅरी पॉटरची पुस्तके घेतली. माझ्या बहिणीसाठी पंचतंत्राच्या कथांचे पुस्तक घेतले. अशा प्रकारे तीन-चार तास मोठ्या मजेत गेले. हे प्रदर्शन पाहण्याचा सुखद अनुभव मी नेहमी लक्षात ठेवीन.

ग्रंथप्रदर्शन निबंध मराठी – Granth Pradarshan Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply