घारीचे मनोगत निबंध मराठी

मी आहे घार. मुलांनो, तुम्ही उंच आकाशात विहरताना पाहिले असेल मला. माझे बळकट पंख, तीक्ष्ण चोच आणि तेवढीच तीक्ष्ण नजर त्यामुळे मला जमिनीवरील माझे भक्ष्य स्पष्ट दिसते. मग मी एकदम झेप घेऊन खाली उतरते आणि माझ्या बळकट नख्यांमध्ये ते भक्ष्य पकडते. ‘घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’ असा अभंग तुमच्या संत जनाबाईंनी लिहिला आहे. माझे घरटे खूप उंच बहुदा नारळाच्या झाडावर मी बांधते. कितीही उंच गेले तरी माझे माझ्या पिलांकडे चांगले लक्ष असतेच. तुमच्या आईचे नाही का तुमच्याकडे लक्ष असते? मग मीसुद्धा माझ्या पिलांची आईच असते ना? मी किर्र असा आवाज करून ओरडते. पिल्ले मोठी झाली की त्यांना उडायला शिकवण्याचे आणि भक्ष्य पकडायला शिकवण्याचे काम मलाच करावे लागते.

मी शिकारी कुळातील पक्षी आहे. ससाणा आणि गरूड हेसुद्धा शिकारी कुळांतलेच पक्षी आहेत. आम्हा सर्वांचे पाय आणि पंख चांगले मजबूत असतात . त्यामुळे अगदी उंचावर आम्ही बराच वेळ आकाशात तरंगत राहू शकतो. उंदीर, साप, सरडे, गोगलगायी, लहानमोठे किडे हे आमचे अन्न असते.

हल्ली काय झाले आहे की तुमच्या शहरात झाडे कमी झाली आहेत. मग आम्ही घरटी कुठे बांधणार आणि भक्ष्य मिळवण्यासाठी घिरट्या कशा मारणार? त्यातच गगनचुंबी इमारती तुम्ही लोकांनी बांधून ठेवल्यामुळे आम्हाला मोकळेपणाने उडताही येत नाही. त्यातच भर म्हणून कावळे आमच्या मागे लागतात. त्यामुळे भक्ष्य मिळवण्याच्या कामी अडथळा येतो. असो, तर अशी आहे माझी कहाणी.

घार पक्षाची माहिती

पुढे वाचा:

Leave a Reply