एका सैनिकाचे आत्मवृत्त निबंध मराठी – Eka Sainikache Manogat Marathi Nibandh

माझे नाव गौरव वाघमारे. मी आघाडीवर लढणारा शिपाई आहे. आपल्या देशाच्या काश्मीर सीमेवर सध्या माझी नेमणूक झाली आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना माझी खूप काळजी वाटत असते. कारण ह्या सीमेवरून पाकिस्तान सतत कुरापती काढत असतो आणि आपल्या देशात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी घुसखोरीही करीत असतो. खरोखरच आपल्या देशाच्या दुर्दैवामुळे आपल्याला पाकिस्तान आणि चीन हे दोन शेजारी भेटले आहेत. ते अत्यंत उपद्रवी आहेत. त्यांच्यामुळे आपल्या सीमेवर शांतता नसते. त्यांच्यामुळेच आपल्याला सदैव शस्त्रसज्ज राहावे लागते आणि आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा बराच भाग शस्त्रास्त्रांवर खर्च करावा लागतो.

चीनने आपल्याशी १९६२ साली युद्ध केले. त्यानंतर पाकिस्तानशी १९६५ आणि १९७१ साली दोन युद्धे झाली तसेच १९९९ साली कारगीलची लढाई झाली हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहेच.

मी वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यात सामील झालो. आज माझे वय सव्वीस आहे. बारावीनंतर पुढे काय करायचे हा प्रश्न होता. शिवाय माझ्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. माझे मामा सैन्यात सुभेदार होते, त्यांनी माझ्या मनात लहानपणापासून देशप्रेमाची महती जागवली होती. त्या गोष्टी ऐकूनच मलाही सैन्यात जावेसे वाटू लागले. एके दिवशी जिल्ह्यात सैन्यभरतीची घोषणा ऐकली आणि मी तिथे हजर झालो. माझ्या अनेक चाचण्या झाल्या, वैद्यकीय तपासणीही झाली. त्यात उत्तीर्ण होऊन मला त्यांनी सैन्यासाठी निवडले.

भरतीनंतर डेहराडून येथील सैनिकी प्रशिक्षण संस्थेत मला पाठवण्यात आले. हे प्रशिक्षण अत्यंत कठीण होते. सैन्यातील शिस्त फार कडक असते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मला गुजरातच्या कच्छ सीमेवर पाठवले गेले. तिथल्या दलदलयुक्त वाळवंटात आमचा तळ होता. आजूबाजूला मैलोन् मैल मानवी वस्तीही नव्हती. गावाहून येणारी पत्रे आणि ट्रान्झिस्टर एवढीच काय ती मनोरंजनाची साधने आमच्याकडे होती.

तिथे वर्षभर काढल्यावर आता माझी बदली काश्मीर सीमेवर झाली आहे. काश्मीर हे खरे तर नंदनवन. निसर्गरम्य स्थळ. परंतु तिथे आम्हाला सतत हातात बंदुका घेऊन उभे राहावे लागते. पाकिस्तानला काश्मीरमध्ये घुसखोर घुसवायचे असले की ते गोळीबार करून आमची कुरापत काढतात आणि आम्ही त्यांच्याशी चकमकीत गुंतलो की घुसखोरांना काश्मीरमध्ये पाठवतात. म्हणून आम्हाला खूप दक्ष राहावे लागते.

काश्मीरी लोकांना भारतीय लष्कराबद्दल प्रेम नाही. त्यांना वाटते की आम्ही लोक त्यांच्यातील निरपराध तरूणांना दहशतवादी ठरवून पकडतो. एखाद्या वेळेस तसे झाले असेलही. कारण ओल्यासोबत बरेचदा सुकेही जळते. परंतु जोपर्यंत पाकिस्तानी दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्हाला तिथे असावेच लागेल हे काश्मिरीजनतेने समजून घ्यायला हवे.

ह्या सीमेवर येऊन मला देशसेवेची चांगली संधी मिळाली आहे. इथेच मला शिस्त आणि परिश्रम शिकता आले.मी साहसी तरूणांना नक्कीच सल्ला देईन की तुम्ही सैन्यात भरती व्हा आणि आपले आणि देशाचे भवितव्य उज्जवल करा. आपले सामर्थ्य आणि आपली बुद्धी देशाच्या सेवेसाठी वापरा. हेच माझे सर्व तरूणांना सांगणे राहील.

एका सैनिकाचे आत्मवृत्त निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply