एका वृद्धाचे मनोगत मराठी निबंध – Eka Rrudhache Manogat
मुलांनो, मी एक वृद्ध आजोबा बोलत आहे. आता माझे खूप वय झाले आहे. माझे हातपाय थकले आहेत. मी पूर्वीप्रमाणे सर्व कामे करू शकत नाही. त्यामुळे मला कधी कधी खूप त्रास होतो.
मी तरुण होतो, तेव्हा खूप कष्ट केले. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यांच्यासाठी मी खूप कष्ट केले. त्यांना खूप शिकवले. त्यांनी खूप मोठे व्हावे, असे माझे स्वप्न होते. माझी दोन्ही मुले आता परदेशात आहेत. ती परदेशात गेली, तेव्हा मला किती अभिमान वाटला होता! सुरुवातीला खूप छान वाटले. पण मग त्रास होऊ लागला.
अनेकदा मला मुलांची आठवण येते. त्यांना भेटावे, असे वाटते. नातवांना पाहावे, असे वाटते. पण ते शक्य होत नाही. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी वारली. आता मी एकटाच राहतो. कुठे जावेसे वाटले, तर जाता येत नाही. काही वेगळे खावेसे वाटले, तर मिळत नाही. आजारी पडलो, तर देखभाल करायला कोणीही नसते.
माझ्यासारखे असे अनेक वृद्ध आहेत. सगळे एकाकी आहेत; असहाय आहेत. त्यांना मदत करा. त्यांचे दु:ख हलके करा.
वृद्धाचे आत्मवृत्त मराठी निबंध
बाजारात जात होते. उन्हाचा कडाका असह्य झाला होता. चालताना रस्त्यात एका झाडाभोवतालचा पार दिसला म्हणून विश्रांती घेण्यासाठी बसले. बरेच पुरुष व स्त्रिया त्या पारावर विश्रांती घेत होते. माझ्या शेजारी बसलेले आजोबा खूप थकलेले व थरथर कापत असलेले दिसले म्हणून त्यांना आधारासाठी हात दिला तर त्यांचे अंग कढत उष्ण लागले. म्हणून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू पाझरु लागले व त्यांनी हुंदके देत आपली व्यथा सांगायला सुरुवात केली.
मोठ्या कपंनीतुन मॅनेजर पदावरुन निवृत्त झालेले खरे आजोबा त्यांच्या निवृत्तीचे जीवन दु:खमय घालवत होते. मुलांना मोठे करण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कमी पगारात संसाराचा गाडा ओढला. दोन-दोन नोकऱ्या केल्या परंतु मुलांना काही कमी पडू दिले नाही. आपल्या गरीब परिस्थितीची झळ मुलांना लागू नये म्हणून पत्नीला ही नोकरी करण्यास प्रवृत्त केले. मुले मोठी झाली त्यांच्या यशाची चढती कमान मिरवत खरे आजोबाही वरच्या श्रेणीत पोहोचले. पण आयुष्यभर साथ देणारी गृहस्वामिनी त्यांना सोडून देवाघरी गेली एवढा मोठा धक्का पचवून, मुलानातवंडात सुख पहावे म्हटले तर सुनदेखील आपले रंग दाखवू लागली. मुलगा दिवसभर नोकरीत घरी आल्यावर त्याला त्रास नको म्हणून सुनेकडून होणारी अवहेलना, उपासमार सोसत राहिले पण मुलगादेखील गेंड्याच्या कातडीचा निघाला.
एके दिवशी सकाळी उठताच मुलगा व सुनेची मुक्ताफळे ऐकायला आली. सुनबाईंच्या लाडीक आग्रहाने आजोबांची रवानगी परगावी असणाऱ्या वृद्धाश्रमात होणार होती. कारण त्यांची आता या घरात अडचण होत होती. त्यांची सेवा सुश्रृषा करण्यासाठी कोणालाही वेळ नव्हता. प्रत्येकाचे वेळापत्रक ठरले होते. निवृत्त आजोबांना ठराविक वेळापत्रक किंवा कोणतेही काम नव्हते. नुसते ‘खायला काळ अन भूईला भार’ सुनबाईंच्या भिशीच्या मैत्रीणी, माहेरचे नातलग आल्यावर आजोबा स्वत:च्याच घरात ‘अडगळ’ झाले होते. तरी आजोबा आपला जास्तीत जास्त वेळ घराबाहेर, बागेत, मंदिरातच काढत होते पण थोडाही वेळ घरी असले तरी सुनबाई घालूनपाडून बोलत. उपाशी ठेवत त्यामुळे दु:खी आयुष्य काढणे फार मुश्किल झाले होते. बाबांना गोड बोलून मुलाने त्यांचे निवृत्तीनंतरचे सर्व उत्पन्न घशात घातले होते त्यामुळे कुठेही जायला त्याच्यापुढे हात पसरावे लागत होते. नातवंडेही त्यांच्याकडे सहानुभूतीने पहात नव्हती. सुखाचे दिवस, नातवंडांशी खेळत रहायच्या काळात आजोबा स्वखर्च भागवण्यासाठी एका प्रेसमध्ये दोन हजार रु पगारावर कामाला जात होते व कामावर जाताना उपाशी असल्याने उन्हाळ्याच्या तीव्रतेने झाडाखाली बसले होते.
कधीतरी सुखाचे दिवस येतील, मुलासुनेला दया येईल व त्यांच्याकडून प्रेम, माया मिळेल म्हणून आशेवर जगत होते.
‘लहानपण देगा देवा मुंगीसाखरेचा रवा’ ‘नको ते म्हातारपण त्यापेक्षा हलता चालता मरण यावे’ म्हणून प्रतिक्षा करणाऱ्या वृद्धांच्या या व्यथेला सलाम केला नि घरी गेले.
पुढे वाचा:
- एका आदिवासीचे मनोगत मराठी निबंध
- लता मंगेशकर मराठी निबंध
- एक शेतकरी गृहिणी मराठी निबंध
- एक वृद्ध नट मराठी निबंध
- एक रम्य सकाळ निबंध मराठी
- एक निसर्गरम्य स्थान
- माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी
- सुट्टीतील मजा निबंध मराठी
- उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेतील पहिला दिवस
- उद्याचा भारत निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- इंग्रजी भाषेचे महत्त्व निबंध मराठी
- आराम हराम आहे निबंध मराठी
- आरसा निर्माण झाला नसता तर निबंध मराठी
- आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी