उद्याचा भारत निबंध मराठी
उद्याचा भारत निबंध मराठी

उद्याचा भारत निबंध मराठी

माझा जन्म महान अशा भारत देशात झाला ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. ह्या माझ्या पुरातन देशाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा, कावेरी अशा अनेक नद्यांच्या काठावर माझ्या देशाची संस्कृती बहरली आहे.

जगातील सर्वात उंच पर्वत जो हिमालय- तो माझ्याच देशात आहे. उत्तरेला हिमालयाची तटबंदी असलेल्या माझ्या देशाच्या उरलेल्या तिन्ही बाजूंना अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहेत. माझा प्रिय भारतदेश नानाविध सृष्टीसौंदर्याने समृद्ध आहे. इथे काश्मीरमधल्या फळबागा आहेत, पंजाबमधील सुपीक भूमी आहे तसेच राजस्थानकच्छमधील वाळवंटसुद्धा आहे. केरळ-कोकणातील हिरवीगार झाडी आणि समुद्राकाठची नितळ वाळू मन मोहून टाकते. अशी माझ्या देशावर निसर्गाने कृपा केली आहे.

माझ्या देशावर दीडशे वर्षे दुष्ट इंग्रजांनी राज्य केले होते. त्यांच्या तावडीतून १५ ऑगस्ट, १९४७ रोजी माझा देश मुक्त झाला. जगातली सर्वात मोठी लोकशाही आज माझ्याच देशात आहे. माझ्या देशात सर्वधर्मसमभाव हे सूत्र महत्वाचे मानले जाते. इथे वेगवेगळ्या जातींचे आणि धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहातात. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी असे महनीय नेते माझ्या देशाला लाभले ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

मग हाच माझा भारत देश उद्या कसा असेल? माझ्या प्रिय भारत देशा, तू सदैव प्रगतीपथावर राहावेस असे मला वाटते. आम्ही सर्वांनी एकजुटीने राहावे आणि विकास करावा असे मला वाटते. माझ्या देशात गरीबी अजूनही खूप आहे. मेळघाटात अजूनही कुपोषित बालके आहेत, सगळीकडे अस्वच्छता आहे. शहरात झोपड्या वाढत आहेत आणि खेडी ओस पडत आहेत. भ्रष्टाचाराने अर्थव्यवस्था पोखरलेली आहे. सरकारी यंत्रणा मठ्ठ आहे. आम्हाला पाकिस्तान आणि चीनसारखे भांडखोर शेजारी आहेत. ही सर्व परिस्थिती पालटली जावी असे मला वाटते. आम्ही मुले ह्या देशाचे भावी नागरिक आहोत. आम्हाला आमचे नशीब उज्ज्वल असायला हवे असे वाटते.

माझा देश उद्याची जगातील महासत्ता बनला पाहिजे असे मला वाटते. त्याच वेळेस माझ्या देशात खूपच विषमता आहे. सामाजिक, आर्थिक विषमतेची ही दरी बुजली पाहिजे. माझ्या देशाचा कुणाही नागरिकाला उपाशीपोटी झोपावे लागता कामा नये. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे, शिक्षण मिळाले पाहिजे. जातीपातींमधील भांडणे नष्ट झाली पाहिजेत. धार्मिक तेढीला कुणीही थारा देता कामा नये. असे झाले तर उद्याच्या भारताचे भविष्य नक्कीच उज्वल असेल ह्यात मला मुळीच शंका वाटत नाही.

पुढे वाचा:

Leave a Reply