मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध – Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

ज्याप्रमाणे एखादा वृक्ष हळूहळू त्याच्या परिस्थितीनुसार पल्लवित होतो. त्याचप्रमाणे साहित्याची निर्मितीही हळूहळू विचारवंत, लेखकांच्या काल परिस्थितीवर अवलंबून असते. मराठी साहित्याची प्राचीन, अर्वाचीन आणि नव साहित्य अशी काळानुसार विभागणी करण्यात येते. प्रत्येक काळात सुवर्णमोलाचे साहित्य आहे. सुवर्णाची कांती-ज्याप्रमाणे नष्ट होत नाही त्याप्रमाणे या साहित्याची कांती निस्तेज झाली नाही. हे सर्व साहित्य आपल्या पूर्व साहित्यापेक्षा उत्कृष्ट आहे. प्राचीन काळातील साहित्य भक्तिरस

प्रधान व आध्यात्मिकतेकडे वळणारे होते. त्याचबरोबर समाजाला बंधुभाव, प्रेम, ईश्वरभक्ती, भूतदया शिकविणारे होते. त्यामुळे समाज संघटित झाला व ईश्वरभक्ती केंद्रस्थानी ठेवून जीवन जगू लागला. बाराव्या शतकातील ‘ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी’ महानुभावांचे लीळाचरित्र, चक्रधर चरित्र, दृष्टांतपाठ इ० साहित्य, याही पूर्वीच्या वैदिक काळातील वेदांनी समाजाला आचरणाचे धडे दिले. उपनिषदांनी जीवनातील तत्त्वज्ञान सांगितले.

पंढरपूरच्या वारकरी संप्रदायातील नामदेव, तुकाराम, जनाबाई, चोखोबा, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी यासारख्या संतकवींचे काव्य विठ्ठलभक्तीने ओतप्रोत व प्रापंचिकांना भक्तीचा मार्ग दाखविणारे तसेच जातिभेदाची तीव्रता दाखविणारे होते. हे सर्व मराठी साहित्यातील सुवर्णकण वेचीतच पेशवे काळाचा उदय झाला. महाराष्ट्र जणू निद्रिस्त झाला होता. या झोपलेल्या महाराष्ट्राला जागे करण्याचे कार्य होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापूराव या शाहिरांनी शाहिरी कविता रचून केले. तर सभासदाने, “शिवप्रभूचरित्र’ चिटणिसांनी”चिटणीसी बखर”. होळकरांची कैफियत या बखरींनी मराठेशाहीचा आणि पेशवाईचा इतिहास लिहून ठेवला.

इ. स. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला. संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजांची राजवट आणि इंग्रजी शिक्षण आले. त्याचबरोबर मराठी साहित्याचे रूपही बदलण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला इंग्रजीतून पॅराडाईज लॉस्ट, पिलिग्रिम्स प्रोग्रेस, शेक्सपियर, डिकन्स इ. पुस्तके मराठीत भाषांतरित झाली. ही भाषांतरेही सुवर्णकणच होती.

त्यानंतर इंग्रजीच्या प्रभावातून इंग्रजी भाषेतील व्यक्तिस्वातंत्र्यवादी, पुरोगामी, उदारमतवादी, बंधुत्ववादी, जातिभेदविरोधी विचार मराठी साहित्यात आले. त्यातूनच हरिनारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो? या विधवांच्या प्रश्नावरील कांदबरीचा जन्म झाला. केशवसुत आणि रविकिरण मंडळाची कविता आली. लघुकथेचा जन्म झाला. वामन मल्हार जोशी यांच्या, ‘आश्रमहरिणी’ या कांदबरीने पुनर्विवाहाचा विचार केला. फडके खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला.

नंतरच्या काळात नवसाहित्याचा प्रवाह सुरू झाला. मढेकर यांनी त्याची सुरवात केली. मराठी साहित्य आत्मकेंद्री बनले. फक्त व्यक्तीच्या मनाचाच विचार करू लागले. कारण व्यक्तिस्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले. दलित साहित्याने दलितांची सुख-दुःखे समाजासमोर मांडली. कोणताही दागिना घडत असताना सोन्याचे कण न कण गोळा करून त्याला आगीत तापवून त्यावर हत्यारांच्या साह्याने कलाकुसर केल्यानंतरच दागिना तयार होतो. तद्वतच मराठी भाषा ही अशीच कण कण विखुरलेली होती. मग तिच्यावर खूप संस्कार झाले. बदल झाले आणि मग मराठी साहित्याचे दागिने घडले. आज मराठी साहित्याची सुवर्णकांती झळाळत आहे. त्याचा दागिन्यांचा खजिना वाढत आहे. त्यात नव्या सुवर्णकणांची भर पडत आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply