पारतंत्र्यात असताना स्वप्नातही सुख होत नाही

स्वातंत्र्य हा मानव, पशुपक्ष्यांचा जन्मासिद्ध अधिकार आहे. रूसोच्या मते, “मनुष्य जन्य घेताना स्वतंत्र असतो, पण नंतर तो बंधनात जखडला जातो. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मते”, माणसासाठी सर्वात कठोर दंड आहे. “पारतंत्र्य”. पारतंत्र्य हा सुखाचा शत्रू आहे.”

मनुष्य स्वतंत्र राहूनच सर्व सुखांचा उपभोग घेऊ शकतो. मनाप्रमाणे आचरण करून आपल्या प्रत्येक सुखाकडे स्वतः लक्ष ठेवू शकतो. ज्या स्थितीत त्याला सुख मिळेल त्या स्थितीची निवड करतो आणि ज्या स्थितीत त्याला दु:ख होते त्या स्थितीचा त्याग करतो. केवळ स्वतंत्र व्यक्तीच मनाप्रमाणे सुखांची निवड करण्याची अधिकारी असते. पारतंत्र्य म्हणजे दुसत्यांची गुलामी स्वीकारून आपले सर्वस्व त्यांच्या स्वाधीन करणे. परतंत्र व्यक्ती सदैव आपल्या इच्छांचे दमन करीतच जगते. इतरांच्या अनुकंपेवर त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण होते. मालकाच्या प्रत्येक बऱ्यावाईट कामात तो भागीदार असतो.

तिथे त्याच्या इच्छा अनिच्छेला काही महत्त्व नसते. परतंत्र व्यक्ती कितीही बुद्धिमान असली तरी अनेक प्रसंगी तिला आपली प्रतिभा दाखविता येत नाही. तिच्याजवळ करुण रुदन भावशून्यता आणि चैतन्यहीनतेशिवाय काही नसते. एडिसनच्या मते जेव्हा स्वातंत्र्य जाते तेव्हा जीवन नीरस आणि आनंदहीन होते.” म्हणून महाभारतात म्हटले आहे . सर्व परवशं दुःखं, सर्वमात्मवशं सुखमा” अर्थात दुसऱ्यांच्या अधीन असणारा दुःखरूप असतो. जे काही आपल्या अधीन आहे ते सर्व सुखरूप आहे.

स्वातंत्र्य मानवी जीवनासाठी अमृत आहे. स्वतंत्र व्यक्तीचाच चौफेर विकास होतो त्यामुळे राष्ट्राचीही उन्नती होते. असा मनुष्यच सुखसदृश स्वर्ग आणि दुःखसदृश नरकात फरक करू शकतो.जो माणूस पराधीन नाही त्याच्यासाठी स्वर्ग नरकात फरक आहे. जो मनुष्य पराधीन आहे त्याच्यासाठी स्वर्ग-नरकात काही अंतर नाही. कारण त्याच्या भावनेवर दुसऱ्याचे स्वामित्व असते, अंकुश असतो. स्वर्गात मिळालेले अमृतही त्याच्यासाठी विष आहे. स्वतंत्र व्यक्तीच्या भावनेवर कोणतेही बंधन नसते. .

जर एखाद्या पापटाला पिंजऱ्यात कैद करून त्याला वेळेवर स्वादिष्ट भोजन दिले गेले तरी तो स्वतंत्र राहून तो आकाशात स्वच्छंद विहार करून उपाशीपोटी राहणे पसंत करील. मनुष्यच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही स्वातंत्र्याचा अर्थ कळतो. पक्षी वृक्षांच्या हिरव्यागार फांद्यांवर बसून किलबिल करू इच्छितात. मोकळ्या आकाशात उडू इच्छितात मग मानव तर बुद्धिमान प्राणी आहे. परतंत्र्यात त्याला सुख कसे मिळेल? जर एखाद्या माणासाला पारतंत्र्यात सुखाचा अनुभव आला तर तो जनावरांपेक्षाही बदतर समजला पाहिजे. परतंत्र व्यक्ती दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत देशाच्या गौरवाला कमीपणा आणते. परतंत्र व्यक्तीच्या संपत्तीवर विजेत्याचा अधिकार स्थापित होतो.

मनुष्य स्वभावत:च स्वातंत्र्यावर प्रेम करणारा आहे. जर कोणी त्याचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सर्वस्वाचे दान करूनही तर तो ते पुन्हा मिळवितो. या जगात जेव्हा केव्हा मानवाला परतंत्र बनविले गेले तेव्हा त्याने आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रत्येक संकटाशी सामना दिला. त्याने यातना सहन केल्या. काळ कोठडीत राहिला. फाशीवर गेला पण दुसन्याचे दास्य स्वीकारले नाही. याला आपला इतिहास साक्षीदार आहे.

आपल्या भारताला जेव्हा इंग्रजांनी गुलाम केले तेव्हा भारतीय वीरांमध्ये बंडाची ज्वाला भडकली. सुभाषचंद्र बोस यांनी घोषणा केली “तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा।” लोकमान्य टिळक म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.” बिसमिलने भारतीयांमध्ये नवचैतन्याचा मंत्र फुकत म्हटले “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें है। देखना है जोर कितना बाजुएँ कातिल में है।” एक दिवस बंडाच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, लाला लाजपतराय व असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या बली वेदीवर हुतात्मा होऊन पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि पारतंत्र्यांचा कलंक धुऊन टाकून स्वातंत्र्याचा टिळा लावला.
स्वातंत्र्यवेड्या महाराणा प्रतापला कोण ओळखत नाही. ज्याने अकबराची गुलामी न स्वीकारता आपल्या जीवनातील सोनेरी दिवस जंगलात इकडे तिकडे भटकत घालविले. खुल्या आकाशाखाली झोपला, गवत खाल्ले पण शरण गेला नाही. केवळ भारतानेच नव्हे. तर चीन, रशिया, कॅनडा अमेरिका आदी देशांनीही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि स्वतंत्र झाल्यावर विकसित देशांच्या श्रेणीत जाऊन उभे राहिले. स्वातंत्र्य मागून मिळत नसते. संघर्ष करून मिळवावे लागते. जे राष्ट्र ज्या जाती संघर्ष न करता शरण जातात ते परतंत्र होतात.

स्वातंत्र्य हे प्रगतीचे द्वार असून सुखसमृद्धीची खाण आहे तर पारतंत्र्य हे सर्व दुःखांचे मूळ आहे. परतंत्र व्यक्ती सुखाची फक्त कल्पना करू शकते. सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही.

पुढे वाचा:

Leave a Reply