जीवनात विनोदाचे स्थान निबंध मराठी – Jivanatil Vinodache Sthan Marathi Nibandh

प्रत्येकानं जीवनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. कोण म्हणतं, “दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव”. तर कोण म्हणतं, जीवन हे काट्याकुट्यातून करायचा प्रवास आहे. तर कोण म्हणतं, हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा, हुकला तो संपला”. अशा धकाधकीच्या जीवनात मनाला आनंद देणारं माध्यम म्हणजे विनोद.

विनोद हा आपल्या जीवनातील एक विरंगुळा आहे. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या दडपणांना सामोरा जात असतो. मुलांना परीक्षेचं टेंशन, मग कॉलेजच्या प्रवेशाचं टेंशन. मग नोकरी मिळवण्याचं टेंशन, नोकरी मिळाली की ती टिकवण्याचं टेंशन. चित्रपट क्षेत्रात, नाट्यक्षेत्रात वावरणाऱ्यांना आपलं स्थान कायम टिकवण्याचं टेंशन; अशावेळी आपल्याला मानसिक आधार देतो तो विनोद.

विनोद हे जनजागृतीचं महत्त्वाचं माध्यम आहे. पूर्वी जरठ कुमारी विवाह ही प्रथा होती. चाळीस वर्षाचा पुरुष आणि आठ वर्षाची मुलगी यांचा विवाह व्हायचा. या प्रथेविरूद्ध जनजागृती केली गेली ‘संगीत शारदा’ या नाटकातून. त्यात एक गाणं होतं,

“म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान
लग्ना अजून लहान, अवघे पाऊणशे वयमान’

अशा प्रकारे ‘विनोद’ हे या प्रथेवर टीका करण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम ठरावं. माणसाला तुम्ही उघडघडपणे त्याचे दोष सांगितलेत तर त्याचा कदाचित त्या माणसाला राग येईल. पण तेच दोष विनोदाच्या सहाय्याने सांगितले जातात, तेव्हा मन दुखावले न जाता त्या माणसाला त्याची चूक कळते. ‘टिकल ते पॉलिटिकल, घडलंय बिघडलंय’ यासारख्या मालिकांतून विनोदाच्या माध्यमातून राजकीय स्तरावरील दोषांवर भाष्य केलं गेलं. थोडक्यात, विनोद हे दोषदिग्दर्शनाचं माध्यम ठरतं.

जगाला हसवण्यात वेगवेगळ्या माध्यमांचा आणि अर्थातच कलाकारांचा खूप महत्वाचा वाटा आहे. ‘चार्ली चॅप्लीन’ हा जगप्रसिद्ध अभिनेता. त्याच्या स्वतःच्या जीवनात अनेक दुःखं आली, पण त्यानं सर्व जगाला हसवत ठेवलं. साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे मराठी साहित्यिक आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी यांचं स्ट महत्त्वाचं आहे. पु. लं. नी विनोद कसा असावा हे सांगताना विनोद हा निर्विष असावा, असं म्हटलं आहे. तर आचार्य अत्रे यांनी ‘विनोद ही साहित्यातील अहिंसा आहे’ असं म्हटलं आहे. राजा गोसावी, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्या चित्रपटांनी त्यातील विनोदाने तर मराठी रसिकांना खिळवून ठेवलं.

सध्याच्या काळात हास्यसम्राट, लाफ्टर चॅलेंज यासारख्या कार्यक्रमामुळे विनोदाच्या क्षेत्रात ‘विनोदवीर’ म्हणून तुम्ही करिअर देखील करू शकता. विनोदाच्या सहाय्यानं आजारही बरे होऊ शकतात. हल्ली हास्यसंघटना (लाफ्टर्स क्लब) निर्माण झाल्या आहेत. योग्य पद्धतीनं हसल्यावर आपला शरीरातील स्नायू मोकळे होतात आणि त्याचा फायदा निश्चितच चांगल्या आरोग्यासाठी होतो.

विनोद हा वाळवंटातील ‘ओअॅसिस’ आहे असंही म्हणतात. जीवनात विनोदाचं स्थान मीठासारखं आहे. म्हणजे असं की जर का जेवणात मीठ नसेल तर जेवण अळणी लागेल, जीवनात विनोद नसेल तर सारं जीवन बेचव, नीरस व कंटाळवाणं होईल.

दुर्दैवाची गोष्ट ही की सध्या अनेकदा या विनोदाचा दर्जा घसरलेला दिसतो. अश्लील, असभ्य विनोदाकडे समाजाचा कल वाढलेला दिसतो. विनोद हा कसा असावा. यालादेखील महत्त्व आहे. विनोद हा जातीधर्मावर, शारीरिक, व्यंगावर आधारीत नसावा. तर तो निखळ, निर्भेळ आनंद देणारा असावा !

जीवनात विनोदाचे स्थान निबंध मराठी – Jivanatil Vinodache Sthan Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply