दारुबंदी निबंध मराठी – Daru Bandi Marathi Nibandh

भारतातल्या अनेक सामाजिक समस्यांपैकी दारू पिणे ही एक फारच मोठी समस्या आहे. ह्या व्यसनाचे दुष्परिणाम भयंकर आहेत. दारूपानाला प्रतिष्ठा मिळू नये ह्यासाठी समाजाने त्या विरूद्ध पावले उचलायला हवीत.

मानवाचा इतिहास आपण पाहिला तर दारूचा उल्लेख अगदी प्राचीन काळापासून आपल्याला आढळतो. पुराण काळातील सोमरस म्हणजेच मद्य होय असे ब-याच विद्वानांचे म्हणणे आहे परंतु मद्यपान हे निश्चितपणे केव्हा आणि कसे सुरू झाले हे सांगता येणार नाही. दारूला संस्कृतमध्ये मद्य, मदिरा, वारुणी अशी अनेक नावे आहेत.

दारूमध्ये मुख्यत्वेकरून अल्कोहोल हा रासायनिक पदार्थ असतो परंतु दारूचे रासायनिक नाव आहे, ‘इथाईल अल्कोहोल.’ ह्या पेयाच्या सेवनामुळे शरीराचा हळूहळू -हास होतो. सुरूवातीला माणसाला वाटते की आपला ह्या व्यसनावर ताबा आहे. परंतु हळूहळू दारूच त्या माणसावर ताबा बसवते आणि त्याला पशूपेक्षाही हीन पातळीवर घेऊन जाते.

दारूसेवनामुळे माणसाची विचारशक्ती मंदावते, त्याला योग्य-अयोग्य ह्यातील फरक समजेनासा होतो. धुंदी चढल्यामुळे तो नैतिकता गमावून बसतो. नशेमुळे मद्यप्याचा स्वतःचा विनाश होतोच, त्याशिवाय त्याचे घरही नरकासमान बनते. कारण नसताना तो आपल्याच पत्नीला आणि मुलांना – बेताल होऊन मारहाण करतो. अनेकदा मद्यप्याकडे फार पैसे टिकत नसल्यामुळे तो हलक्या प्रतीची दारू पिऊ लागतो. त्यामुळे तर त्याच्या तब्येतीची आणखीनच नासाडी होते.

कधीकधी हातभट्टीची दारू विषारीसुद्धा असते. त्यामुळे हजारो लोक मरतात, अपंग बनतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे हाल आणखीच गहिरे बनतात. दारू प्यायल्याने यकृत खराब होते, कर्करोगासारखे आजारही गाठतात म्हणून शहाणेसुरते लोक म्हणतात की “दारूपासून दूरच रहा.”

आजकाल फॅशनच झाली आहे की कुठलाही आनंदाचा प्रसंग घडला की दारूपार्टी करायची. बढती मिळाली, कचेरीतील परीक्षा उत्तीर्ण झाली तर दारूपार्टी होतेच, त्याशिवाय वाढदिवस असला तरीही दारूपार्टी होते. कधीकधी सहज बसायला आणि पत्ते खेळायला मंडळी बसतात, मग दारूपार्टी होते. लग्न, साखरपुडा अशा आनंदी प्रसंगी हे लोक दारू पितातच पण मग दुःख घालवायला आणि कामाचा ताण कमी करायलाही दारू पिऊ लागतात. तिथूनच दारूचे व्यसन लागायला सुरूवात होते.

नशा करणे हे कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत खीळ बसते. म्हणूनच सरकारने दारूबंदी करावी, प्रसारमाध्यमांनी ह्या व्यसनाविरूद्ध चळवळ उभारावी. विद्यार्थ्यांना नशेमुळे होणा-या नुकसानाबद्दल सांगावे. व्यसनांपेक्षा आपला वेळ खेळ, व्यायाम अशा विधायक कार्यात घालवावा ह्याविषयी प्रचार झाला पाहिजे. आज कित्येक गावातील स्त्रिया दारूची स्थानिक दुकाने बंद पाडतात कारण त्यांच्या दुःखाचे मूळ तिथूनच सुरू होते. अनेक स्वयंसेवी संस्था व्यसनमुक्ती केंद्रचालवतात. त्यामुळेही ब-याच मद्यप्यांचे पुनर्वसन झाले आहे.

सरकारने दारूपासून मिळणा-या महसुलाकडे न बघता दारूमुळे होणा-या विनाशाची आकडेवारी पाहावी. प्रबोधनातून दारूबंदी हेच आजचा समाज सुखी करण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे.

मद्यबंदी निबंध मराठी – Daru Bandi Marathi Nibandh

मानवी जीवनात सत्त्व व तमोगुण असतात. हे दोन्ही गुण मानवी मनावर प्रभाव टाकतात. ते मानवाला आपल्याकडे आकषून घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी मनुष्य सत्त्व गुणाच्या संपर्कात येतो त्यावेळी तो दैवी गुणांकडे जाऊन देशाचा महान नागरिक बनून देशाला प्रगतीकडे घेऊन जातो. जेव्हा तमोगुणाच्या संपर्कात येतो तेव्हा तो वाईट सवयींच्या चक्रव्यूहात अडकतो. त्याचे स्वतःचे पतन तर होतेच तो देशालाही पतनाच्या गर्तेत टाकतो. म्हणून तमोगुणाविरुद्ध युद्ध केले पाहिजे. अशीच एक वाईट सवय आहे मद्यपान. मद्यपानाला समाजात महत्त्व मिळू नये म्हणून समाजानेच त्याच्याशी युद्ध सुरू ठेवले पाहिजे. आज ज्या जलद गतीने मद्यपान केले जात आहे त्याच जलद गतीने समाजात वाईट प्रवृत्ती घर करीत आहेत.

मद्यपानाचे उल्लेख आपणास प्राचीन काळापासून मिळतात. मद्यपान केव्हा आणि कसे सुरू झाले हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु वैदिक काळात सोमरस पानाचे उल्लेख तत्कालीन साहित्यात दिसून येतात. सोमरस पान फक्त राजे आणि देव करीत असत. विचारवंतांच्या मते, सोमरसाला सुरेचा पर्याय समजणे अवघड आहे. कारण दोन्हीत अंतर आहे. कवि हरिवंशराय बच्चन उपहासाने म्हणतात.

“सोम सुरा पुरखे पीते थे, हम पी लेते हैं हाला”, मद्यपानाला संस्कृतमधील नीती आणि स्मृतिग्रंथही विरोध करताना दिसतात. मनुस्मृतीत असा उल्लेख येतो की, सुरा अन्नाचा मळ असल्यामुळे पाप आहे. मद्याचे सेवन केवळ यक्ष आणि राक्षसांसाठीच योग्य मानले गेले आहे. महाभारतात मद्यपानाचा निषेध करताना म्हटले आहे की,” दारू पिऊन लोक आपापसांत वेड्यासारखे भांडतात. काही लडखडतात, काही अयोग्य बडबड करतात, काही विक्षिप्त झाल्यामुळे नग्न होतात. जे या पेयाचे सेवन करतात ते पापी आहेत” गांधीजी मद्यपानाच्या विरोधात म्हणाले होते,” मद्याकडे जाणे म्हणजे जळत्या भट्टीत किंवा पूर आलेल्या नदीत जाण्याइतके धोकादायक आहे. भट्टीत किंवा नदीत गेल्यामुळे केवळ शरीर नाश पावते पण मद्य प्याल्यामुळे शरीर व मन दोन्हींचा नाश होतो. इंग्लंडमधील ग्लॅडस्टोनच्या मते,” मद्यपानामुळे मानवजातीची जितकी हानी झाली तितकी युद्ध, रोगराई, दुष्काळामुळेही झाली नाही.”

भारतात प्राचीन काळापासून मद्याचे सेवन चालू आहे. परंतु मोगल, इंग्रजी राजवटीत त्याने चरम सीमा गाठली. शाही दरबारात मद्यपान अनिवार्य झाले. मोगल सम्राट जहांगिराने मद्याच्या एका प्याल्यासाठी राज्याची धुरा नूरजहांच्या हातात देऊन टाकली.

मद्याचे रासायनिक नाव. “इशाहल अल्कोहोल” असे आहे. यामुळे शरीराचा हळूहळू विनाश होतो. याच्या सेवनामुळे व्यक्तीची विचारशक्ती क्षीण होते. योग्य-अयोग्यमधील फरक करण्याची क्षमता नष्ट होते. धुंदीमुळे नैतिक पतन आणि संपत्तीचा नाश होतो. पैसे नसल्यामुळे मद्यपी बायकोचे दागिने विकतो पण दारू पितो. धुंदीमुळे मद्यपीचा स्वत:चा नाश तर होतोच त्याचे घरही नरक बनते. विनाकारण तो बायकामुलांना मारहाण करतो. मद्य व्यक्तीला शक्तिहीन करून अशा अवस्थेत नेते, त्याला जाणीव करून देते की रक्ताच्या ठिकाणी दारूच त्याच्या नसानसातून वाहते आहे. सामान्य लोक महागडी दारू पिऊ शकत नाहीत म्हणून ते देशी दारू पितात. कधी ती विषारीही असते. त्यामुळे हजारो लोक मरतात. हसती खेळती कुटुंबे स्मशान शांततेत परिवर्तीत होतात. दारू प्याल्यामुळे कॅन्सरसारखे रोग होतात म्हणून जाणते लोक म्हणतात दारू पिऊ नका. त्या विषाचा त्याग करणेच श्रेयस्कर आहे. यामुळे धन जाते अपयश मिळते आरोग्याची हानी होते. मनुष्य दारू का पितो? हे जाणून घेणे रोमांचकारक आहे.

काही लोक आनंदाच्या प्रसंगी आपला आनंद आणखी वाढावा म्हणून दारू पितात. विवाह, साखरपुडा, परीक्षा पास झाल्यावर, घरात अपत्य जन्म झाल्यावर, नोकरी लागल्यावर, श्राद्धाच्या वेळीसुद्धा दारू पितात. दारूशिवाय पार्टीला रंग चढत नाही. आधी लोक आपल्या इच्छा पूर्ण झाल्यावर देवदर्शनाला जात असत आता मद्यालयात जातात. कोणी दु:ख विसरण्यासाठी दारू पितात. मैत्री वाढविण्यासाठी, गुप्तहेरी करण्यासाठी, व्यापाराचा सौदा करण्यासाठी देणे-घेणे व्यवहारात दारू पिणे हे सभ्यपणाचे व मॉडर्न असण्याचे लक्षण समजले जाते. दारू पिणाऱ्याला यात काही वाईट आहे असे वाटत नाही. परंतु दारूला सगळ्या वाईटाचे मूळ समजणारा माणूस दारूला शिवतदेखील नाही.

एकीकडे सरकार दारू सोडायला सांगते तर दुसरीकडे दारू उत्पादकाला व दुकानदाराला लायसेन्स देते. दवाखान्यात औषधे नसले तरी चालते पण दुकानात दारू पाहिजेच. सरकारला दारूच्या दुकानापासून खूप उत्पन्न मिळत असल्यामुळे सरकार ती दुकाने बंद करीत नाही. दारूचे अवैध धंदे पोलिसांच्या देखरेखीखाली चालतात. लोक विषारी दारू प्याल्यामुळे मरतात व सरकार तमाशा पाहत बसते. दारूच्या प्रत्येक बाटलीवर’ मद्यसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे’ असे लिहिलेले असूनही दारू पिणारे त्याकडे दुर्लक्ष करतात व दारू पिणे कमी करीत नाहीत.

नशा करणे राष्ट्राच्या प्रगतीला बाधक आहे. मुन्शी प्रेमचंदांच्या मते तिथे १०० पैकी ८० माणसे उपासमारीमुळे मरतात तिथे दारू पिणे म्हणजे रक्त पिणे आहे. सरकारने दारूचे अवैध धंदे बंद केले पाहिजेत. प्रसार माध्यमांनी नशेविरुद्ध प्रचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना दारूमुळे होणारे नुकसान सांगितले पाहिजे. नशा करणे हे आधुनिकपणाचे लक्षण आहे. हा विचार सोडून दिला पाहिजे. लेखकांनी व समाजातील बुद्धिजीवी वर्गाने मद्य सेवनातील दोषांचा विचार केला पाहिजे.

समाजातील बहुसंख्य लोक आज दारूच्या नशेत अडकलेले आहेत. आधी मद्यपी मद्य पितो मग मद्य मद्यपीला पिते. दारू एक अशी सवय आहे की जी लागली की सहजपणे सुटत नाही. प्राण जातो पण दारूची तहान काही भागत नाही. दारू पिऊन लोकांच्या हाडाचा पिंजरा होण्याच्या आत सरकारने दारूबंदीसाठी कठोर पावले उचलावीत. कारण राष्ट्राच्या प्रगतीची जबाबदारी निरोगी नागरिकांच्या खांद्यावरच असते.

पुढे वाचा:

Leave a Reply