मी डॉक्टर होणार मराठी निबंध – Mi Doctor Honar Marathi Nibandh
डॉक्टरांना समाज देवमाणूस मानतो. त्यांच्याकडे आदराने पाहातो. सैनिक देशाचे रक्षण करतात तसेच डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. आपल्या देशात आयुर्वेदिक, युनानी, ऍलोपथी, होमिओपथी अशा वेगवेगळ्या वैद्यकीय उपचार पद्धती आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीचे डॉक्टर वेगवेगळे असतात. रोगाची लक्षणे पाहून अचूक रोगनिदान करणे आणि त्यानुसार उपचार करणे हे डॉक्टरांचे काम असते. किरकोळ आजारापासून ते गंभीर आजारांपर्यंत सर्व आजारांवर डॉक्टर प्रयत्नपूर्वक उपचार करतात.
डॉक्टरांचे जीवन हे एक सेवाव्रतच असते. कित्येकदा अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रिया करताना त्यांना तासंतास एकाग्र चित्ताने काम करावे लागते कारण रूग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. कधीकधी तर त्यांना हातातली कामे टाकून तातडीने रोग्याचे प्राण वाचवायला जावे लागते.
ताप आला की पहिली आठवण होते ती डॉक्टरांची. मला ताप येतो त्या दिवशी माझी आई ऑफिसला जात नाही. त्याऐवजी ती मला डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन जाते. तिथे माझ्यासारखे बरेच आजारी लोक बसलेले असतात. पंधरावीस मिनिटांनी नंबर लागला की आम्ही आत जातो. आत गेल्यावर डॉक्टर सुहास्यवदनाने विचारतात,” काय रे? काय झालंय तुला?” त्यांच्या बोलण्यामुळेच अर्धा आजार पळून जातो. आमच्या डॉक्टरांच्या हाताला खरेच चांगला गुण आहे.
डॉक्टर हा स्वभावाने मृदू असावा. त्याने रोग्याच्या मनात विश्वास निर्माण करावा. त्याला धीर द्यावा. रोग्याची मानसिक स्थिती सुधारल्यामुळे अर्धी लढाई जिंकल्यासारखे होते. केवळ पैसा कमावणे हा डॉक्टरांचा उद्देश असू नये. परंतु हल्ली काहीकाही डॉक्टर संगनमत करून रूग्णांना लुटतात. त्यावर त्यांचे म्हणणे असते की डॉक्टरी शिक्षणाचा खर्चच एवढा जास्त असतो की शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे लौकर वसूल व्हावे म्हणून डॉक्टर ह्या मार्गाने जातात. परंतु काही डॉक्टर असेही आहेत जे जन-सेवेसाठी आपले सगळे जीवन पणाला लावतात.
डॉ. अभय आणि डॉ.राणी बंग, डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे ह्यासारखे अनेक डॉक्टर शहरात मिळणा-या सुखसोयी लाथाडून रूग्णसेवेसाठी खेडोपाडी गेलेले आहेत.
म्हणूनच मला वाटते की आपणही डॉक्टर व्हावे आणि लोकांची सेवा करावी.
पुढे वाचा:
- जीवनात विनोदाचे स्थान निबंध मराठी
- जीवनात कलेचे स्थान निबंध मराठी
- जागतिक खेळांमध्ये भारताचे स्थान निबंध मराठी
- कृष्णा जन्माष्टमी वर मराठी निबंध
- चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध
- चलचित्रपटांचा प्रभाव मराठी निबंध
- राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
- एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
- कर्म हीच पूजा मराठी निबंध
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध