पश्चिमोत्तानासन मराठी माहिती – Paschimottanasana Information in Marathi

या आसनात शरीराच्या पाठीचा संपूर्ण भाग ताणला जातो म्हणून या आसनास पश्चिमोत्तानासन म्हणतात. हे एक महत्त्वाचे आसन आहे. जर शीर्षासनाला सर्व आसनाचा राजा म्हणून संबोधिले, तर पश्चिमोत्तानासनास सर्व आसनाचा मुख्यमंत्री म्हणावा लागेल. हे आसन विविध प्रकारे करता येते.

पश्चिमोत्तानासन मराठी माहिती, Paschimottanasana Information in Marathi
पश्चिमोत्तानासन मराठी माहिती, Paschimottanasana Information in Marathi

पश्चिमोत्तानासन पहिली पद्धत

 1. चटईवर बसा.
 2. पाय पुढे सरळ पसरवा.
 3. दोन्ही गुडघे आणि पायाची बोटे जुळवून ठेवा.
 4. हात समोर सरळ पसरवून श्वास घ्या.
 5. श्वास सोडून पुढे वाका.
 6. हात पायाच्या बोटाकडे आणा.
 7. उजव्या हाताने उजव्या पायाचे आणि डाव्या हाताने डाव्या पायाचे बोट सावकाश पकडा.
 8. पुढे वाकून नाक किंवा डोके गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करा आणि पोट आत ओढा.
 9. नाक किंवा डोके गुडघ्यावर टेकवा.
 10. श्वास घेऊ नका.
 11. 20 ते 30 सेकंद या स्थितीत थांबा.
 12. हळूहळू श्वास घेऊन पूर्वस्थितीत या.
 13. शवासन करून विश्रांती घ्या.
 14. गुडघे उचलणार नाहीत याची काळजी घ्या.
 15. त्याचा खालचा भाग जमिनीला टेकलेला असावा.

पश्चिमोत्तानासन दुसरी पद्धत

 1. पाय पुढे पसरवून चटईवर बसा.
 2. श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे वाका.
 3. उजव्या पायाची टाच उजव्या हाताने आणि डाव्या पायाची टाच डाव्या हाताने पकडा.
 4. आता पोट आत ओढून आणि पुढे हळूहळू वाकून नाक आणि डोके गुडघ्याला टेकवा.
 5. कुंभक करा. याच स्थितीत 4 ते 20 सेकंदापर्यंत किंवा तुम्हाला जितके शक्य आहे तितका वेळ थांबा.
 6. सावकाश श्वास घ्या आणि पूर्वस्थितीत या.
 7. शवासन करून विश्रांती घ्या.

पश्चिमोत्तानासन तिसरी पद्धत

 1. चटईवर बसून पाय समोर पसरवा.
 2. हात समोर पसरवता पसरवता श्वास घ्या.
 3. श्वास सोडून समोर वाका.
 4. हात पायाच्या बोटाकडे आणा.
 5. पोट आत ओढून घ्या.
 6. पुढे सरका आणि नाक गुडघ्याकडे आणा.
 7. शेवटी डोके गुडघ्यावर टेकवा.
 8. हात पायापुढे आणा. या स्थितीत शक्य तितका वेळ थांबा.
 9. कुंभक करा.
 10. शेवटी श्वास घेत घेत पूर्वस्थितीत या.
 11. शवासन करून विश्रांती घ्या.

पश्चिमोत्तानासन या तिन्ही पद्धतींमध्ये फरक

या तिन्ही पद्धतींमध्ये फारसा फरक नाही. पहिल्या पद्धतीत दोन्ही पायाची बोटे पकडताना डोके गुडघ्यावर टेकवावे लागते. दुसऱ्या पद्धतीत पायाच्या टाचा पकडताना डोके गुडघ्यावर टेकवावे लागते. तिसऱ्या पद्धतीत हात पायाच्या पुढे नेऊन डोके गुडघ्यावर टेकवावे लागते.

पश्चिमोत्तानासन करताना सावधगिरी

पश्चिमोत्तानासन हे एक अवघड आसन आहे. या आसनास घाईघाईने करू नये. जोर देऊन आसन केल्यास शरीराला इजा होण्याचा संभव असतो. याकरिता कोणत्याही परिस्थितीत झटक्याने हे आसन करू नका. हळूहळू आणि सावकाश सराव करा. शेवटची स्थिती प्राप्त करण्यास सहा महिनेसुद्धा लागू शकतील. ज्याचे पोट मोठे आहे, शरीर जड आहे किंवा ज्यांना ढेरी सुटलेली आहे अशा व्यक्तींनी हे आसन फार काळजीपूर्वक करावे.

सरावाने शरीर आणि मांड्या लवचिक होऊन शरीरातील चरबी झडून जाईल. अनावश्यक चरबी झडल्यामुळे शरीर हलके होईल. हे आसन तीन ते चार वेळा करावे. गुडघ्यावर डोके टेकवल्यानंतर श्वासोच्छवास सामान्य करा. या स्थितीत तुम्ही बराच वेळ थांबू शकता. आसनाच्या अंतिम स्थितीत थांबण्याचा अवधी हळूहळू वाढवा. एकदम वाढवू नका.

पश्चिमोत्तानासन करण्याचे फायदे – Paschimottanasana Benefits in Marathi

 1. पश्चिमोत्तानासनामुळे शरीराचा मागचा संपूर्ण भाग लवचिक बनतो.
 2. वाढलेली ढेरी आणि शरीरातील लठ्ठपणा कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे आसन आहे.
 3. गुडघ्याच्या खालचे शरीरातील स्नायू या आसनामुळे लवचिक बनण्यास मदत होते.
 4. पाठीच्या कण्यातील ताठपणा हळूहळू कमी होतो.
 5. हे आसन नियमित केल्याने माणूस नेहमी उत्साही राहतो.
 6. या आसनामुळे पोटऱ्या आणि कमरेतील वेदना कमी होण्यास मदत होते.
 7. पित्ताशय, पाणथरी, आतड्या यातील विकार कमी होऊ शकतात.
 8. पोटदुखी कमी होते, भूक वाढते, मधुमेह आणि मूत्रपिंडातील रोग कमी करण्यास या आसनाची मदत होते.
 9. मूत्राशयातील विकार, स्वप्नावस्था, श्वेतस्राव आणि पडसे याची प्रखरता कमी होण्यास या आसनाची मदत होते.
 10. स्त्रियांच्या आजारावर हे आसन गुणकारी आहे.

पश्चिमोत्तानासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply