Set 1: आमच्या गावची जत्रा मराठी निबंध – Aamchya Gavachi Jatra Nibandh
Table of Contents
आमच्या गावची जत्रा म्हणजे आनंदाची पर्वणी असते. जवळच्या गावातील खूप लोक येतात. गावातील सगळ्यांचे नातेवाईकही येतात. खूप मित्रमैत्रिणी भेटतात. खूप मजा करता येते. आमची जत्रा एक दिवसाची असते. पण त्याआधी आठवडाभर गावात उत्साह असतो.
गेल्या वर्षी आम्ही जत्रेला गेलो होतो. देऊळ छान सजवले होते. सगळीकडे फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. दिव्यांची आरास केली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते.
देवळाच्या जवळच अनेक दुकाने थाटली होती. अनेक मुले फुगे घेऊन पिपाण्या वाजवत हिंडत होती. एके ठिकाणी जादूचे खेळ चालू होते. झटपट फोटो काढण्याचा एक ठेलाही होता. मी लाकडाच्या चंद्रकोरीवर बसून फोटो काढून घेतला. उंच आकाशपाळण्यात तर फारच धमाल आली. काहीजण मात्र भीतीने किंचाळत होते. खाण्याच्या ठेल्यांवर खूप गर्दी होती. मी भरपूर पाणीपुरी खाल्ली.
अशी ही आमच्या गावची जत्रा आम्हांला खूप आनंद देते.
Set 2: आमच्या गावची जत्रा मराठी निबंध – Aamchya Gavachi Jatra Nibandh
प्रत्येक गावामध्ये उरूस, जत्रा भरत असते. जत्रेचा दिवस म्हणजे त्या गावचा आनंदाचा दिवस ! गावातील प्रत्येक व्यक्ती जत्रेची आतुरतेने वाटत पाहत असते. लहान मुलांना गावची जत्रा म्हणजे आनंदाची पर्वणीच.
आमच्या गावचे ‘जोतिबा’ हे कुलदैवत आहे. गावामध्ये जोतिबाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. चैत्र पौर्णिमेच्या हस्त नक्षत्रावर गावची जत्रा भरते. आमच्या गावच्या या जत्रेला ‘चैत्र’ असे संबोधतात. चैत्राला गावातील सर्व माघारणी देव दर्शनासाठी येतात. गावच्या आनंदात सामील होतात.
सकाळपासूनच जोतिबाच्या माळावर गर्दी व्हायला सुरुवात होते. देवदर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. दुपारच्या प्रहरी निशाणकाठीच्या सोबत हलगी, ढोल, लेझीमच्या तालावर पालखी निघते. पालखीच्या वेळी खूप लोक जमतात. भक्त लोक पालखीवर, गुलाल-खोबरे उधळतात. पालखीला स्त्रियाही मोठ्या प्रमाणात हजर असतात. याप्रसंगी काही लोक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवतात.
Set 3: आमच्या गावची जत्रा मराठी निबंध – Aamchya Gavachi Jatra Nibandh
रत्नागिरी जिल्ह्यातील जोतिबाचे देवस्थान तसे जागृत देवस्थान, मोठे प्रसिद्ध जोतिबा म्हणजे बारा लिंगापैकी एक ‘ज्योर्तिलिंग’. कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर याचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला याची प्रचंड मोठी जत्रा भरते. लाखो लोक निरनिराळ्या ठिकाणापासुन या देवस्थानाकडे येत असतात. आम्ही देखील आमच्या कुटूंबासमवेत या यात्रेत सामील होत असतो.
या देवाची पालखी फार मोठी निघते. त्या पाठोपाठ भजनी मंडळ, भाविक मोठ्या श्रद्धेने टाळ मृदंग वाजवित, जोतिबाच्या नावाचा उदो उदो करत प्रयाण करीत असतात. त्याचबरोबर रथ आणि पालखीवर गुलाल-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली जाते. ‘जोतिबाच्या नावाने चांगंभले’ करीत सर्व पंथाचे जातीधर्माचे लोक पालखी घेवून जातात. पाठीमागे सजविलेला घोडा व उंटही जात असतात. भाविकांकडून पडणाऱ्या गुलाल-खोबऱ्याचा प्रसाद घेत असतात. प्रथम मी गुलालाच्या अखंड उधळणीपासून स्वत:चा व कपड्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरला. कारण चोहोबाजूंनी पहावे तिकडे गुलालाचा जणु पाऊसच पडल्याप्रमाणे वाटत होते. शुभ्रपांढऱ्या कपड्यांवर गुलालाचा रंग चढत होता व भाविकांच्या आरोळ्या व जयजयकाराला ऊत आला होता.
नवस वगैरे केलेल्या स्त्रिया कपड्यासहित अभ्यंग स्नान करुन देवळाभोवती लोटांगण घालीत असतात. लोकांच्या झुंडी जोतीबाच्या नावाचा जयघोष करीत पुढे पुढे सरकत होत्या. देवळाचा तट, कळस, पायऱ्या व आजुबाजूचा परिसर गुलालाच्या गुलाबी रंगाने चमचमत होता. उंचावरुन खाली पाहिले की संबंध परिसरात माणसांचा सागर पसरलेला होता. लोक गुलाल उधळत असल्याने तो सागर गुलाबी लाटांच्या प्रवाहात खळखळतोय असे वाटत होते. संध्याकाळी जेवण वगैरे आटोपल्यावर आम्ही परत देवळात जावून बसलो. लोक गटागटाने भजन, कीर्नन करण्यात रंगून गेले होते. गर्दी इतकी होती की जमिनीला पाय न टेकता, अधांतरीच पुढे सरकत होतो.
जोतिबापासुन यमाई देवीच्या स्थानापर्यंत सर्वत्र, अपंग, दीन, अनाथ लोकांच्या रांगांच्या रांगा मदतीसाठी हात पुढे करुन बसलेल्या दिसल्या. यातील बरेच लोक दीनपणे यात्रेकरुना मदत देण्याविषयी आळवत होते. आम्ही गरीब आहोत, अपंग आहोत हा का आमचा दोष आहे म्हणुन जाब विचारत होते.
यमाई देवीला पीठामीठाची ओटी भरुन दर्शन घेवून देवाचा प्रसाद घेवून आम्ही आमच्या गावची वाट चालू लागलो पण मनात मात्र विचार योत होते की अशा अनाथ अपंग लोकांना देवाचीच साथ सोबत तोच त्यांचा वाली म्हणूनच ते आपली करुण कहाणी ऐकवीत देवाच्या चरणाशी वास्तव्य करतात देवाच्या किंवा देवस्थानाच्या ठिकाणी ‘अंगात वारे येणे’ सारख्या ओंगळ आणि विकृत गोष्टीबाबत फक्त चीड येते. अज्ञानापायी समाजातील ढोंगी लोक इतरांना लूटण्यासाठी असे चाळे करत असतात व समाजाच्या अज्ञानाची कीव येते. देवाची यात्रा व भव्य मिरवणूक डोळ्यात साठवून मी इतरांबरोबर घरी परतले.
Set 4: जत्रा मराठी निबंध – Jatra Nibandh Marathi
‘ही दुनिया हाय एक जतरा..हौसं, नवसं.गवसं सतरा’ असे एक गाणे जयवंत कुळकर्णीनी गायले आहे. तेरेडियोवर अधुनमधुन लागत असते.
जत्रा ही नेहमी कुठल्यातरी देवाची किंवा देवीची असते. महाराष्ट्रात भैरोबा, काळूबाई, मांढरदेवी, ज्योतिबा अशी अनेक जागृत देवस्थाने आहेत. त्या त्या देवाची किंवा दर वर्षी विशिष्ट महिन्यात जत्रा भरते. त्या देवाला ज्यांनी नवस बोललेला असतो ते ‘नवसे’ लोक नवस फेडण्यासाठी जत्रेला जातात. जत्रेच्या निमित्ताने मोठा बाजार भरतो. नानाविध वस्तू तिथे विकायला येतात, त्याशिवाय जत्रेत पाळणा असतो, आईस्क्रीम, म्हातारीचे केस, मिठाई, रेवड्या अशा वस्तू लहान मुलांना खायला मिळतात.
त्यातच भर म्हणून जत्रेत तमाशाचा फड लागतो, डोंबा-याचा खेळही येतो. ती सगळी मजा अनुभवायला जातात ते असतात हौशे लोक. तर ह्या जत्रेतील गर्दीच्या निमित्ताने आपल्याला कशावर तरी हात मारायला मिळेल, आपल्याला काहीतरी वस्तू गवसेल अशा उद्देशाने जे लोक जत्रेला जातात त्यांना गवशेअसे म्हणतात.
जत्रांना पूर्वीच्या काळात खूपच महत्व होते कारण त्या निमित्ताने लोक एकत्र येत असत. तिथे अनेक वस्तूंची खरेदी विक्री होई, त्यामुळे कारागिरांच्या कलांना उत्तेजन मिळून त्या त्या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळे. शिवाय लोकांना संपर्काची फारशी काहीच साधने नव्हती. अशा वेळेस पंचक्रोशीतले लोक जत्रेच्या कारणाने एकत्र भेटत. त्यासाठी ते बैलगाड्यांनी किंवा पायी चालत हा प्रवास करीत. आसपासच्या परिसरातील लोकच आल्यामुळे फार गर्दी काही होत नसे.
हल्ली मात्र काय झाले आहे की बस, मोटारी आणि आगगाडी अशा वेगवान वाहनांनी दूरवरचे लोकही जत्रेला येतात. एवढ्या लोकसंख्येचा भार त्या जत्रास्थानाला पेलत नाही. मग चेंगराचेंगरी होते, सार्वजनिक मलनिःसारण व्यवस्थेवर भार पडून सर्वत्र दुर्गंधी, घाण आणि रोगराई पसरते. लहान मुले हरवण्याची शक्यता असते. तसेही नवस बोलणे ही तर अंधश्रद्धाच आहे त्यामुळे अशा जत्रांवर बंधने घालणे गरजेचे आहे.
Set 5: जत्रेतील गमतीजमती मराठी निबंध
गावातील जत्रा जवळ आली तसे गावात एकदम चैतन्य पसरले. ‘अरे, जत्रा जवळ आली,’ असे प्रत्येकजण एकमेकाला सांगत होता. गावातील देवीच्या देवळाची साफसफाई, रंगरंगोटी सुरू झाली. बाहेरच्या दीपमाळाही स्वच्छ केल्या गेल्या. देवळावर रोषणाई केली गेली. प्रत्येकजण उत्साहाने जत्रेच्या तयारीला लागला होता. देवाचे काम ते आपलेच काम हीच भावना सर्वांच्या मनात होती.
जत्रेची पुनव दोन दिवसांवर येऊन ठेपली. देवळाबाहेर दुकाने उभी राहिली. त्यांच्यापुढे जत्रेतील पाळणा लागला. आम्ही मुले रोज फेऱ्या मारू लागलो. बाहेरगावचे पाहुणे घरी येऊन पोहोचले. गावात गर्दी वाढली होती.
जत्रेच्या दिवशी सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. सर्वजण लवकर उठून देवळाकडे निघाले. सकाळीच देवीची पालखी गावातून मिरवली गेली. त्या मिरवणुकीत सर्वजण सामील झाले होते. पालखी परत देवळात आल्यावर देवीची पुन्हा स्थापना झाली आणि मग जत्रेला जोर चढला. लोक दुकानांत विविध वस्तूंची खरेदी करत होते. आम्ही मुले जत्रेतील खेळांत रमलो होतो. पाळण्यात बसून उंच उंच झोके घेतले. स्वत:चे फोटो काढून घेतले.
दुपारी महाप्रसाद झाला. सर्वांनी मोठ्या भक्तीने तो सेवन केला. गर्दीत चुकलेल्या मुलांच्या नावांचा पुकारा चालला होता. संध्याकाळी विविध कार्यक्रम झाले. सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता.
Set 6: मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध – Mi Pahileli Jatra Nibandh in Marathi
एका नवरात्रात आम्ही मामाबरोबर देवीच्या जत्रेला गेलो होतो, जत्रेला लोकांची खूप गर्दी होती. देवळात देवीच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती. देवीला वाहण्यासाठी प्रत्येकाजवळ काही ना काही होतेच होते. कोणी नारळ घेतले, तर कोणी पेढे घेतले, तर कोणी हारफुले घेतली, असे प्रत्येकजण काही तरी हाती घेऊन रांगेत उभा होता. गर्दी खूप असल्यामुळे लोक झटपट दर्शन घेऊन बाहेर पडत होते.
देवळाच्या बाहेर दोन्ही बाजूंनी दुकाने थाटलेली होती. या दुकानांमध्ये हळदकुंकू, ओटीचे सामान, नारळ, हारफुले, मिठाई, साखरफुटाणे, खेळणी, भांडी, नकली दागिने इत्यादी माल मांडून ठेवला होता. मोकळ्या जागेत एक-दोन उपाहारगृहे व रसवंतीगृहे होती. एका बाजूला मुलांसाठी चक्र, पाळणे व इतर काही खेळ होते. एका ठिकाणी सिनेमा दाखवण्याचे काम चालू होते.
मोठी माणसे हौसेने आवडीच्या वस्तू खरेदी करत होती. चक्रात व पाळण्यात बसण्यासाठी मुलांची झुंबड उडाली होती. आम्हीही चक्रात व पाळण्यात बसण्याची मजा लुटली. त्यानंतर आम्ही खेळणी घेतली. आम्ही जत्रेत खूप मजा केली व आनंदाने घरी परत आलो.
पुढे वाचा:
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- आमचे पशुमित्र निबंध मराठी
- आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध
- आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी
- आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी
- अस्वच्छता आणि प्रदूषण मराठी निबंध