आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी

आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी

एकदा आमच्या शाळेने संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम घेतला. आम्हां सर्व मुलांना ही कल्पना खूपच आवडली. मग सर्व मुलांची सभा घेण्यात आली. मुलांचे गट पाडण्यात आले. सर्व गटांना कामे नेमून देण्यात आली.

आमच्या वर्गात सरपंचांचा मुलगा आहे. त्याने त्याच्या बाबांना हा उपक्रम सांगितला. तेही खूप खूश झाले. त्यांनी गावकऱ्यांची सभा घेतली आणि उपक्रमाला सहकार्य करण्याची कल्पना मांडली. त्यांनी गावकऱ्यांचे गट केले आणि एकेक गट विदयार्थ्यांच्या गटाशी जोडून दिला. विशेष म्हणजे विदयार्थीच या गटांचे प्रमुख होते. मग आम्ही कामाला लागलो.

गावातील कचरा काढण्यापूर्वी आम्ही त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चर खणले. गावातील सर्व कचरा एकत्र केला आणि त्या चरांमध्ये टाकला. गटारे साफ केली. गावातील विहिरी साफ केल्या.

चावडीचे सुशोभन केले. लहान मुले काम करतात हे पाहून मोठी माणसेही कामाला लागली. पाहता पाहता संपूर्ण गाव स्वच्छ झाला. घरादारांना रंगरंगोटी झाली. प्रत्येकजण आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू लागला.

स्वच्छतेसंबंधीच्या सूचनांचे रंगीबेरंगी फलक आम्ही ठिकठिकाणी लावले. प्रत्येक वाडीच्या मुखाशी वाडीतील नागरिकांच्या नावांचे फलक लावले. गावकरी खूप खूश झाले. स्वाभाविकच आमच्या गावाला ‘स्वच्छ, निर्मळ गावा’चे पाच लाखांचे बक्षीस मिळाले! आम्हांला खूप आनंद झाला.

पुढे वाचा:

Leave a Reply