आराम हराम आहे निबंध मराठी-Aaram Haram Aahe Nibandh in Marathi
आराम हराम आहे निबंध मराठी-Aaram Haram Aahe Nibandh in Marathi

आराम हराम आहे निबंध मराठी – Aaram Haram Aahe Nibandh in Marathi

भगवद्गीतेत साक्षात् श्रीकृष्णानं म्हणून ठेवलं आहे की, ‘कर्म करीत राहा. कर्तव्यापासून कधीही ढळू नका.’ गीतेतील हा संदेश वास्तवात उतरवण्यासारखाच आहे खरा. कारण ईश्वरानेच आपलं जीवन कर्मप्रधान बनवलं आहे. कर्म केल्याशिवाय हा प्रपंच चालतच नाही. हे विश्व साक्षात् त्या विधात्याचं मंदिर आहे. विधात्याने केलेली आकर्षक आणि आश्चर्यकारक निर्मिती आहे. केवळ मंदिर, मशीद आणि गुरूद्वारा येथे ईश्वर नांदत नाही. तर ज्या ठिकाणी माणसं कष्ट करतात, देशोपयोगी आणि समाजोपयोगी कामं करतात अशाच ठिकाणी देवाची वसती असते. धार्मिक कर्मकांडाच्या मागे लागणे आणि त्या पायी आपल्या जबाबदा-या टाळणे हा पलायनवादच आहे.

ईश्वर हा शेतक-यांमध्ये, कष्टक-यांमध्ये आणि सैनिकांमध्ये निवास करतो. हेच लोक खरे कर्मयोगी असतात. ते भोगवादाला, दुस-याच्या कष्टांवर बांडगुळासारखं जगण्याला हराम मानतात. आपल्या रक्तानं आणि घामानं देशाच्या प्रगतीस हातभार लावतात.

म्हणूनच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हयांनी म्हटले होते की आराम हराम आहे.

तुम्हीच पाहा ना, मुंगी एवढीशी असते परंतु, हजारो, लाखो मुंग्या एकत्र येऊन वारूळ तयार करतात. त्यासाठी प्रत्येक मुंगी मातीचा इवलासा कण उचलते परंतु त्यातून त्या एवढे मोठे वारूळ बनवतात. मधमाश्यासुद्धा आकाराने छोट्या असतात, तरीही त्या आपल्या इवल्याशा पंखांच्या जोरावर आसपासचा सगळा प्रदेश फिरतात आणि फुलांमधील मध गोळा करून आणतात आणि आपल्या पोळ्यात साठवतात. सारा निसर्गच आपल्याला सांगतो की कष्ट करा, कष्टाशिवायफळ नसते. दीर्घ परिश्रमाला पर्याय नसतो.

आपण इस्रायल ह्या देशाचे उदाहरण घेऊ. सा-या जगातून नाकारलेल्या ज्यूंना दुस-या महायुद्धानंतर सरतेशेवटी एक वाळवंटी प्रदेश मिळाला खरा, परंतु तो प्रदेश अगदी ओसाड होता. शिवाय सौदी अरबस्तान, पॅलेस्टाईन, इराक, इराण अशा सर्व मुसलमानी देशांनी ह्या देशाला वेढलेले होते. अशा वेळेस ज्यू लोकांनी हिंमत धरली, चिकाटी धरली आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या त्या मरूप्रदेशात बाग फुलवली, शेती केली आणि ते लोक स्वावंलबी झाले. त्याच वेळेस त्यांनी आपली लष्करी ताकदही वाढवली आणि आसपासच्या शबूंना चांगली जरब बसवली. हे सर्व त्यांनी कष्ट केले म्हणूनच घडले.

अहो, सिंहाला भूक लागली तर शिकार करायचे कष्ट घ्यावेच लागतात. त्याला काही बसल्या जागी कुणी हरीण आणून देत नाही. म्हणूनच ‘ आराम हराम आहे,’ हे तत्व अगदी खरे आहे. निरूद्योगामुळे अनेक दुर्गुण वाढीस लागतात. आळशीपणा येतो, माणूस विघातक कृत्यांकडे वळतो, कुढू लागतो किंवा नकारात्मक विचार करू लागतो. म्हणूनच माणसाने नेहमी उद्योगी राहावे.श्रम करण्यातच प्रतिष्ठा आहे हे पक्के समजावे.

पुढे वाचा:

Leave a Reply