दिल्ली भारताची शान निबंध मराठी – Essay On Delhi in Marathi

दिल्ली भारताची राजधानी आहे. भारताच्या हृदयस्थानी वसलेल्या ह्या नगरीला खूप प्राचीन इतिहास आहे. महाभारताच्या काळात ह्या ठिकाणी खांडववन नावाचे मोठे वन होते. त्या वनाचा नाश करून पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरी वसवली. तिचेच नाव पुढे दिल्ली असे झाले.

दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान होता. त्यानंतर तिथे मोगलांचे राज्य आले. दिल्लीचा इतिहास रक्तरंजित आहे. १८५७ सालच्या स्वातंत्र्य समरातही दिल्ली रक्तात न्हायली होती. त्यानंतर दिल्लीवर ब्रिटिशांनी कब्जा केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस दिल्ली येथील लाल किल्ल्यावरच सर्वप्रथम तिरंगा झेंडा फडकवण्यात आला.

यमुनेच्या किना-यावर दिल्ली वसली आहे. पूर्वी हा केंद्रशासीत प्रदेश होता. आता तिथे विधानसभा निर्माण करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

दिल्ली ही भारताची राजधानी असल्याने भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आणि खासदार तिथे राहातात. संसदभवन, राष्ट्रपतीभवन, सर्वोच्च न्यायालय, सैनिकी मुख्यालये आणि केंद्रीय सचिवालयही दिल्लीतच आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या देशांच्या वकिलाती आणि त्यांचे राजदूतही दिल्लीतच राहातात.

नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली असे दिल्लीचे दोन भाग आहेत. जुन्या दिल्लीत पुराणे वाडे, मोगलकालीन इमारती आहेत, गल्लीबोळांचे रस्ते आहेत. नव्या दिल्लीत मात्र प्रशस्त रस्ते, त्यांच्या कडेला लावलेली वृक्षराजी, ब्रिटिशकालीन तसेच आधुनिक इमारती आहेत. लाल किल्ला, कुतुबमिनार, लोधी पार्क, जामा मशीद, गौरीशंकर मंदिर, बिर्लामंदिर, सिसगंज गुरूद्वारा, निजामुद्दीन अवलियाचा दर्गा, हुमायूनची कबर, राजा मानसिंगचे जंतरमंतर अशी बरीच प्रेक्षणीय स्थळेही आहेत. एक मोठे वस्तुसंग्रहालय आहेच त्याशिवाय बुद्ध गार्डन, ताल कटोरा, मुघल गार्डन, रोशन आरा बाग, लोधी गार्डन अशा बागाही आहेत.

दिल्ली हे खूप मोठे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, इंद्रप्रस्थ विद्यापीठ आदी विद्यापीठे आहेत. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालय, सैनिकी छावण्याही आहेत.

अशा ह्या भव्य राजधानीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे.

दिल्ली मेरी जान निबंध मराठी – Essay On Delhi in Marathi

दिल्लीचा इतिहास खूप प्राचीन आहे. महाभारतकाळात पांडवांनी श्रीकृष्णाच्या मदतीने खांडववन नामक वनाचा नाश केला होता आणि त्या जागी इंद्रप्रस्थ नामक नगर वसवले होते. हे इंद्रप्रस्थ नगर म्हणजेच आजची दिल्ली होय. तेव्हापासून आजतागायत दिल्ली हे शहर भारताच्या दृष्टीने महत्वाचे राहिले आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्याचा मान ह्याच शहराला मिळाला आहे. त्यामुळेच दिल्लीचे नक्की वय किती हे सांगणे अवघड होऊन बसले आहे. यमुना नदीच्या रम्य किना-यावर हे शहर वसले आहे. असे म्हणतात की ज्या ठिकाणी दिल्लीतील जुना किल्ला आहे त्याच ठिकाणी मूळचे इंद्रप्रस्थ वसले होते.

इतिहासात शोधले असता लाल कोट आणि रायपिथौरा ह्या नावांनीही दिल्ली शहर ओळखले जात होते.११ व्या शतकात तोमर राजांनी ह्या शहराचा विस्तार केला. नंतर ते चौहान वंशातील राजांच्या ताब्यात आले. पृथ्वीराज चौहान हा दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा होता. त्यानंतर मुसलमान राजांनी दिल्लीची सत्ता बळकावली. तिथपासून जवळजवळ ९०० वर्षे दिल्लीवर मुसलमानांची सत्ता होती. ह्या सर्व राजांनी आपापल्या शक्तीनुसार आणि इच्छेनुसार दिल्लीला सजवली, नटवली. प्रचंड किल्ले, भव्य महाल आणि अन्य इमारती उभारल्या.

दिल्लीचा प्रसिद्ध कुतुबमिनार बाराव्या शतकात कुतुबुद्दीन ऐबक ह्या राजाने बांधून घेतला. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी ह्याने येथील प्रसिद्ध अलाई दरवाजा बांधून घेतला. इतरही अनेक बादशहांनी दिल्लीत कितीतरी इमारती बांधल्या, मशिदी बांधल्या. ज्या मशिदी आधीपासून होत्या त्यांचा विस्तारही केला.

मात्र मोगल सम्राट अकबर आणि जहांगीर ह्यांनी दिल्लीची उपेक्षा केली आणि राजधानी आग्रा येथे नेली. परंतु जहांगीरपुत्र शहाजहानने राजधानी पुन्हा दिल्लीला आणली. त्यानेच तिथे लाल किल्ला आणि जामा मशिद बांधली. त्याचा पुत्र औरंगझेब ह्याने लाल किल्ल्यावरील मोती मशीद बांधली.चांदनी चौकही त्याच काळात उभारला गेला.
आजच्या नवी दिल्ली ह्या शहराची कहाणी १७११ पासून सुरू होते. ह्याच वर्षी इंग्रजांनी कलकत्त्याहून आपली राजधानी हलवून दिल्ली येथे आणली. त्यांनी नवी दिल्ली हा भाग वसवला. तेथील भव्य इमारतींची बांधणी सर एडविन ल्यूटन आणि सर हर्बर्ट बेकर ह्यांनी केली. त्या इमारतींपैकी मुख्य इमारती आहेत त्या म्हणजे राष्ट्रपती भवन, संसदभवन आणि सचिवालय. केनॉट प्लेसही त्याच काळात उभारले गेले.

आजही दिल्ली भारताची राजधानी आहे. ती भारताचे हृदय आहे. देशात घडणा-या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान आहे. त्याशिवाय शिक्षण, व्यापार, संस्कृती ह्यांचेही मुख्य केंद्र आहे. दिल्लीची कायम लोकसंख्या एक कोटीपेक्षा जास्त आहेच त्याशिवाय येथे रोज हजारो पर्यटक, व्यापारी, देशोदेशीचे राजकीय मुत्सद्दीयेतच असतात.

बदलत्या काळानुसार दिल्लाचे स्वरूपही बदलत आहे. मेट्रो झाल्यामुळे दिल्लीतील सामान्य जनतेला स्वस्त आणि मस्त प्रवासाचे साधन उपलब्ध झाले आहे. सध्या अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. अशी ही आमच्या देशाची राजधानी-सौंदर्यखनी दिल्ली

राजधानी दिल्ली निबंध मराठी – Essay On Delhi in Marathi

भारताची राजधानी दिल्लीचा इतिहास खूप जुना आहे. प्राचीन काळापासून त्याचे रंग, रूप, नाव बदलत राहिले आहे. इथेच कौरव-पांडवांचे महाभारत युद्ध झाले. श्रीकृष्णाने पांचजन्य शंखाचा नाद इथेच केला. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करून याचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ ठेवले. दिल्लीचा प्रथम संस्थापक सूर्यवंशी राजा दिलीप होता. त्यानंतर धर्मराज आणि शेवटचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान होता. त्यानंतर मोगलांचे राज्य आले. पृथ्वीराज चौहाननेच या शहराला ‘दिल्ली’ हे नाव दिले.

दिल्लीचा इतिहास रक्तरंजित आहे. अनेक क्रूर आक्रमक आले. त्यांनी येथील लोकांवर अत्याचार केले. तैमूर आणि नादिरशहाने रक्ताच्या नद्या याच दिल्लीत वाहविल्या. १८५७ च्या युद्धात ती पुन्हा रक्तात न्हाली. मुसलमान आणि इंग्रज शासकांनी २०० वर्षे येथे राज्य केले. शेकडो स्वातंत्र्यप्रेमींना इथे फासावर चढविले गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ ऑगस्ट रोजी येथे लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला.

यमुना नदीच्या उजव्या किनाऱ्यावर दिल्ली स्थित आहे. शेजारी इतर राज्ये आहेत. पूर्वी हे केंद्रशासित राज्य होते पण आता इथे विधानसभा निर्माण करण्यात आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दिल्लीचा पुरेसा विस्तार झाला. दिल्ली सोनीपत गाझियाबादपर्यंत पसरली आहे. सर्व खासदार, मंत्री आणि विदेशी राजदूत येथे राहतात. इथेच संसद भवन, राष्ट्रपती भवन व केंद्रीय सचिवालय आहे. लाल किल्ला, कुतुबमिनार, लोधी पार्क, जामा मशीद, गौरी शंकर मंदिर, बिर्ला मंदिर, सिसगंज गुरुद्वारा, निजामुद्दीन अवलियाचा दुर्गा, हुमायूनची कबर, राजपूत राजा मानासिंगाने बनविलेले जंतर-मंतर अशा महत्वाच्या इमारती येथेच आहे. प्राचीन काळात जंतर मंतरच्या साह्याने सूर्य, चंद्र, पृथ्वी, नक्षत्रांच्या स्थितीचे ज्ञान मिळविले जाई.

दिल्लीत भारताची प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे प्रतीक असणारे एक राष्ट्रीय संग्रहालय आहे. बुद्ध गार्डन, तालकटोरा, मुघल गार्डन, रोशनआरा बाग, अजमलखान पार्क, लोधी गार्डन ही प्रेक्षणीय उद्याने आहेत. मोठमोठे बाजार आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी प्राणिसंग्रहालय व अप्पूघर आहे. येथे सोने, चांदी, कपडे, भांडी, रसायने आदींचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.

दिल्ली हे शिक्षणाचेही एक प्रमुख केंद्र आहे. येथील दिल्ली विद्यापीठ, इंद्रप्रस्थ विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ प्रसिद्ध आहे. याखेरीज सर्वोच्च न्यायालय, सैनिकी छावणी आहे. तसेच आकाशवाणी भवन दूरदर्शन केंद्र, सर्वात उंच टी. व्ही. टॉवर, विज्ञान भवनामुळे दिल्लीची शोभा वाढते. दिल्ली गेटच्या बाहेर महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी यासारख्या महान व्यक्तिंच्या समाध्या आहेत.

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी दिल्लीची शोभा अवर्णनिय असते. अशा या देशाच्या राजधानीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply