गुड फ्रायडे मराठी माहिती – Good Friday Information in Marathi
‘गुड फ्रायडे’ हा दिवस म्हणजे येशू ख्रिस्ताला सुळी देण्यात आले, त्याचा स्मरणदिन. हा मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. या शोकाच्या दिवसाला ‘गुड’- चांगला असे विशेषण का लावायचे?
येशू ख्रिस्त जगातील लोकांच्या पापाकरता प्रायश्चित्त म्हणून फाशी गेला, म्हणून त्याचे हे बलिदान पवित्र मानले जाते.
फाशी दिल्याच्या तिसर्या दिवशी, म्हणजे नंतरच्या रविवारी येशू पुन्हा जिवंत झाला, अशी ख्रिश्चनांची समजूत आहे. त्याने असा मरणावर विजय मिळवला, त्या पुनरुत्थानाच्या दिवसाला ‘ईस्टर संडे’ म्हणतात. हा ख्रिश्चनांच्या आनंदाचा सण असतो.
स्वतः येशूला सुळी जाण्याआधी चाळीस दिवस उपास घडला होता, त्यामुळे भाविक ख्रिश्चन ईस्टरआधी चाळीस दिवस उपास करतात, त्याला ‘लेंट’ असे म्हणतात. फेब्रुवारीतल्या शेवटच्या बुधवारपासून- ‘अॅश वेन्सडे’- ते ईस्टर संडेला सांगता होईपर्यंतचे हे सुमारे चाळीस दिवस ख्रिश्चन-धर्मीयांना फार पवित्र वाटतात.
ख्रिस्त हा ईश्वराचा पुत्र आहे असे ख्रिश्चन लोक मानतात. तो असे म्हणत असे की ‘मी राजा आहे!’ हे राज्य म्हणजे स्वर्गाचे राज्य असे त्याला म्हणायचे होते. पण रोमन सत्ताधीश हेरोद याला असे वाटले की, येशू आपलेच राज्य बळकावणार आहे. राजाच्या माणसांनी व ज्यू धर्माच्या प्रमुखांनी येशूच्या यहुदा (जुडास) नावाच्या शिष्याला फितूर केले. येशू आपल्या शिष्यांबरोबर एका बागेत प्रार्थनेला येणार होता. तेथे यहुदा त्याला भेटून त्याचा मुका घेईल, त्यावरून राजाच्या शिपायांनी येशूला ओळखावे व पकडावे असे ठरले. या कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून यहुदाला बरीच रक्कम मिळाली.
या यहुदाबद्दलदेखील मोठी रंजक गोष्ट आहे. सुळी जाण्याच्या आदल्याच रात्री येशू व त्याचे बारा शिष्य एकत्र जेवले. आपले मरण आता निश्चित असल्याची मनोमन पूर्वसूचना येशूला असल्याप्रमाणे त्याने प्रत्येक शिष्याला आग्रहाने वाढले, त्यावेळी मोठ्या प्रेमाचे नाटक करत हाच यहुदा येशूला घास भरवत होता. ‘तुम्हांपैकी एकजण आजच फितुरीने वागून मला मारेकर्यांच्या हाती सोपवणार आहे’ असे येशू या भोजनादरम्यान स्पष्ट म्हणाला; तरी कोणाकडेही बोट न दाखवता त्याने आपल्या शिष्यांचे या ‘शेवटच्या जेवणा’पूर्वी पाय धुतले होते. शिष्यांसोबतचा हा प्रसंग ‘लास्ट सपर’ म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रत्यक्ष अटकेच्यावेळीसुद्धा शिपाई येशूला पकडू लागताच या शिष्यांपैकी एकाने तलवार उपसली व शिपायांपैकी एकावर वार करून त्याचा कान छाटला. पण येशूने तो जमिनीवर पडलेला कान पुन्हा चिकटवून पूर्ववत केल्याची आख्यायिका सांगतात. वर तो त्या शिष्याला म्हणाला, ‘ही घटना टळू नये अशीच पित्याची इच्छा असेल तर तू आडकाठी का आणतोस?’
येशू हा जन्माने ज्यू होता; परंतु त्याने ज्या नव्या धर्माची शिकवण जगाला दिली, तो ‘ख्रिश्चन धर्म’ होय. त्याची शिकवण पटत नसल्यामुळेच ज्यू धर्मप्रमुखांनी येशूला अटक करवून राजाचा जेरूसलेममधील सुभेदार पिलात याच्या हवाली केले. पिलातने त्याला क्रूसावर चढण्याची शिक्षा दिली. हा क्रूस येशूने स्वतःच वधस्थानापर्यंत वाहून न्यायचा होता. येशूला क्रूसावर चढवण्यात आले तो दिवस शुक्रवार होता- हाच गुड फ्रायडे.
येशू त्यावेळी ३२ वर्षांचा होता. तो सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत क्रुसावर होता. मरणाच्या वेदना सोशीत असताना येशू म्हणाला, ‘हे देवा, यांना क्षमा कर. कारण हे काय करत आहेत ते त्यांना समजत नाही.’
संध्याकाळी येशूचे शरीर क्रूसावरून उतरवून त्याचे ज्यूंच्या पद्धतीनुसार दफन करण्यात आले.
ख्रिश्चन लोक या दिवशी उपवास करतात व दिवस प्रार्थनेत घालवतात. कारण ख्रिश्चन लोक असे मानतात की, येशूला या जगात पापी लोकांचा उद्धार करण्यासाठी पाठवण्यात आले होते. पापी लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती देण्यासाठी येशूने वधस्तंभावरील मरण पत्करले. येशूच्या त्या त्यागाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो.
गुड फ्रायडेचा दिवस उपास व प्रार्थना करून येशूचे स्मरण करण्यात घालवतात. वधस्तंभावरील येशूच्या सात उद्गारांबद्दल धर्मगुरू प्रवचने करतात.
तर ईस्टरच्या आधीचा रविवार हा ‘झावळ्यांचा रविवार’ म्हणून पाळला जातो. कारण त्या दिवशी झावळ्यांच्या तोरणाखालून मिरवणुकीने येशू ख्रिस्त जेरूसलेम येथे आला होता.
पुढे वाचा:
- ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
- रमजान ईद माहिती मराठी
- बकरी ईद माहिती मराठी
- मोहरमची संपूर्ण माहिती
- पतेती सण माहिती मराठी
- गुरू नानक जयंती विषयी माहिती
- बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी
- भगवान महावीर जयंती माहिती
- दत्तजयंती माहिती मराठी
- धनत्रयोदशी माहिती मराठी
- नवरात्र – दसरा माहिती मराठी
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- बैल पोळा सणाची माहिती
- नारळी पौर्णिमा माहिती मराठी
- नागपंचमी माहिती मराठी
- गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी
- आषाढी एकादशी माहिती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती
- हनुमान जयंती माहिती
- गुढीपाडवा माहिती
- होळी सणाची माहिती
- दिवाळी सणाची माहिती
- रामनवमी माहिती मराठी