कटू कधी बोलू नये मराठी निबंध

समर्थ रामदास म्हणून गेले आहेत की । पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कटू बोलावे ते काये निमित्य’

खरोखरच, किती सार्थ बोलून गेले आहेत ते. दुस-याचे मन विनाकारण दुखावणे ही फार मोठी हिंसा आहे. धनुष्यातून निघालेला बाण एक वेळ मागे घेता येईल परंतु तोंडावाटे निघालेला शब्द मागे घेणे केवळ अशक्य असते. म्हणूनच दुस-याला कटू बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे.

देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा वापर करून मानवाने अनेक भाषा निर्माण केल्या. ह्या भाषा म्हणजे जणू आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करण्याचे एक माध्यमच बनले. इतिहास, साहित्य, कला, ज्ञान, संस्कृती ह्या सर्व गोष्टी ह्या भाषेचेच योगदान म्हणूनच आपल्याला मिळाल्या आहेत. आपण जर पशूसारखे काही ठराविक आवाजच काढू शकत असतो तर हे संभव होते का? निश्चितच नाही.

परंतु देवानं आपल्याला दिलेली वाणी ही दुधारी तलवारीसारखी आहे. वाचारूपी ही दुधारी तलवार प्रत्येकाकडे असते परंतु तिचा योग्य वापर करता आला पाहिजे. सगळेच लोक बोलत असतात पण कधी, कुठे आणि काय बोलायचे किंवा बोलायचे नाही ह्याचे भान फार थोड्या लोकांना ठेवता येते. ह्याच वाचेचा उपयोग करून माणसे निंदा, अपमान, कुचाळक्या आणि भांडणे करीत असतात आणि सर्वत्र अशांती माजवत असतात. परंतु समंजस माणसे मात्र आपल्या गोड बोलण्याने दस-याचे मन जिंकतात. त्याला आपला र मित्र बनवतात. कित्येक महान नेते आणि राजे असे होऊन गेले ज्यांना दुसयाचे मन वाचता येत होते. दुस-याचे मन वाचता येणे आणि कटूता न आणता त्याला आपले बोलणे ऐकायला लावणे ह्यासाठी खूप मोठे कौशल्य लागते.

नाहीतर बरेचदा तात्पुरता फायदा बघून माणसे इतरांना दुखावतात. शत्रू निर्माण करतात. एकदा तुम्ही एखाद्याचा अपमान केलात तर तो माणूस ते आयुष्यभर विसरत नाही. तो इतरांना तुमच्याबद्दल सांगतो. तसेच ज्यांच्यासमोर हा प्रसंग घडतो त्यांचेही मत तुमच्याबद्दल कलुषित होते. म्हणूनचशब्द ह्या शस्त्राचाजपून वापर करावा.

आपले सांगणे समोरच्याला कदाचित आवडणारे नसेलही परंतु कधीकधी ते सांगणे गरजेचे असते. अशा वेळेस अपमानास्पद शब्द न वापरता, शांतपणे ते सांगता आले पाहिजे. तसे केले तर समोरची व्यक्ती दुखावलीही जात नाही आणि त्याच वेळेस आपले कामही होते. म्हणूनच लक्षात ठेवावेकी कटू बोलणे सर्वथा अयोग्यच.

पुढे वाचा:

Leave a Reply