प्रत्येक घर बने किल्ला
कविवर्य वसंत बापट यांची एक कविता आहे, ‘उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू’ या कवितेतील पहिल्या कडव्यात असं म्हटलय, ‘परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला.’
याठिकाणी ‘घर’ आणि ‘किल्ला’ या संकल्पना स्पष्ट करणं आवश्यक वाटतं.’घर’ म्हणजे फक्त चार भिंती व एक छप्पर नव्हे. किल्ला म्हटलं की डोळ्यासमोर येते ती संरक्षक, अभेद्य अशी तटबंदी, भक्कम बुरूज ! घर काय किंवा किल्ला काय, नुसतं बांधकाम भक्कम असून चालत नाही, वर दोन्ही ठिकाणची माणसं सत्शील प्रवृत्तीची असावी लागतात.
‘घर’ एकमेकांना जोडून ठेवत असतं. पण त्यासाठी घरातील माणसं सुशिक्षीत आणि सुसंस्कृत असावी लागतात. घरामध्ये सुसंवाद असावा लागतो. एकमेकांबद्दल प्रेम असावं लागतं.
‘किल्ला’ म्हटलं की त्या किल्ल्यावर राज्य करणारा राज्यकर्ता उत्तम नेता असला पाहिजे. त्याच्या मनात प्रजेबद्दल प्रेम हवं, प्रजेबद्दलचा कनवाळा हवा.
वसंत बापट यांनी जी कविता लिहिली, त्यात त्यांना ‘परके’ म्हणजे ‘शत्रू’ असा अर्थ अभिप्रेत असावा. पण जर का आपण सद्यपरिस्थितीचा विचार केला,तर काय दिसतं तर आपल्या भारतावर पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण झालेलं दिसतं. म्हणजे ‘परक्यांचा’ म्हणजे नुसतं शत्रूचाच नव्हे तर आज घरांघरातून जनजागृतीची व समाजप्रबोधनाची गरज आहे. आज आपल्या मराठी माणसाच्या घरातही आई-बाबांऐवजी मम्मी-डॅडींनी प्रवेश केला आहे.
आज घरात चित्र काय दिसतं, तर दोन भावडांचं एकमेकांशी पटत नाही. तिथं राष्ट्रीय एकात्मता तर दूरच राहिली. आपल्या भारताच्या राज्यघटनेत असं म्हटलंय की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मात्र त्याच भारतात ६ डिसेंबर १९९२, ६ जानेवरी १९९३ या दिवशी उसळलेल्या जातीय दंगलीत कित्येकांचे प्राण गेले. .
१ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स जागृती दिन’ म्हणून साजरा करतात यंदाच्या १ डिसेंबर रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सुमारे साडे सात लाख लोक एच.आय.व्ही. ने बाधित असल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. एड्सचा राक्षस आला कुठून? अर्थात परकीय भोगवादी संस्कृतीतूनच.
‘मिलेनिअम’ च्या नावाखाली आज प्रत्येकजणच चंगळवादी झालाय. मुळात नवीन सहस्त्रक सुरू होणार ते दोन हजार एक साली. आम्ही मात्र ते आधीच साजरं करतो… युवकांपैकी अनेकांना आकर्षण आहे ते परदेशात जाऊन पैसा कमावण्याचं ! भारत माझा देश आहे. अशी आपण फक्त प्रतिज्ञा घेतो. या वाक्यापुढं सद्यस्थितीनुसार मला एक प्रश्नचिन्ह घ्यावंसं वाटतं. अशा अनेक गोष्टीविरूद्ध आज आपल्याला लढादयायचाय. मात्र त्याची सुरूवात आपल्या घरापासून व्हायला हवी.
घर असावें घरासारखें – नकोत नुसत्या भिंती –
तिथे असावा प्रेमजिव्हाळा – नकोत नुसती नाती
पंख असावे आकांक्षांचे – दिव्य घेऊनी शक्ती –
सूर जुळावे परस्परांचे – उंबरठ्यावर भक्ती या ओळींप्रमाणं प्रत्येकजण जर वागला, तर खरंच ‘प्रत्येक घर बनले आहे किल्ला’ असं म्हणावं लागेल.
पुढे वाचा: