राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध

“निळ्या नभी फडके तिरंगा, मला त्याचा अभिमान

भारत देश महान, माझा भारत देश महान”

असं माझं गुणगान म्हणजेच तुमच्या या राष्ट्रध्वजाचं गुणगान तुम्ही आताच काही क्षणापूर्वी गायलंत. निमित्त होतं आजचा आपला प्रजासत्ताक दिन. या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही या शाळेच्या सभागृहात जमून दरवर्षी मला वंदन करता, या दिनी गौरवगाथा गाता. पण आज मात्र हे गीत ऐकून मी आनंदी झालो नाही, ही वस्तुस्थिती आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे.

तुम्हाला खरोखर माझा अभिमान आहे का ? नीट विचार करा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांचा इतिहास आठवा. माझ्यामध्ये झालेले बदल आठवा. मला अजूनही आठवते ती १४ ऑगस्टची मध्यरात्र. मध्यरात्री १२ वाजता म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी अभिमानानं मला फडकवलं गेलं. सगळीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा झाला. पुढे २६ जानेवारी १९५० पासून आजच्या दिवसाला ‘गणराज्य दिन’ म्हणून महत्त्व प्राप्त झालं.

आज ज्या जागी अशोकचक्र आहे, त्या ठिकाणी पूर्वी चरखा होता. आज माझे तीन रंग हे तुम्हाला वेगवेगळा संदेश देतात. माझा केशरी रंग क्रांतिकारकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, हिरवा रंग आपल्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे, समृद्धीचे तर माझा पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. माझ्यातल्या अशोकचक्राला २४ आरे आहेत. हे चोवीस आरे म्हणजे दिवसांचे चोवीस तास. हे चोवीस तास ही आपण कार्यरत रहावं, असं मला सांगायचं असतं… पण…

पण आज सगळंच बदललंय. आज कोणाला ना देशप्रेम राहिलंय, ना देशभक्ती ! १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी माझी विक्री केली जाते आणि दुसऱ्या दिवशी मला पायदळी तुडवलं जातं. तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. माझा असा बाजार मांडणं मला मान्य नाही.

मला आठवतं ते बाबू गेनूचं बलिदान.. अंगावरून ट्रक गेला मात्र त्यानं मला हातात घट्ट धरून ठेवलं होतं. जमिनीवर पडू दिलं नव्हतं. आज माझी विटंबना जाते. लोक मला चेहऱ्यावर, पाठीवर, शरीरावर रंगवतात. मला हे पटत नाही. क्रिकेट सामन्यांच्या वेळी तर क्रिकेटप्रेमी रसिक स्वतःचा देशाभिमान दाखवण्याकरिता मला त्यांच्या चेहऱ्यावर स्थान देतात, हे बदलायला हवं.

माझी एक आचारसंहिता आहे. ती पाळली गेलीच पाहिजे. सर्वजण माझा अपमान करतात, असं मी म्हणत नाही. या देशात खरं तर मुंबईत ‘जिंदाल’ नावाचा एक उद्योगपती आहे. पेडर रोडला त्यांचा ‘जिंदाल हाऊस’ नावाचा बंगला आहे. मला आपल्या घरी रोजच्या रोज फडकवता यावं याकरीता ‘जिंदाल’ स्वतः सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. केसचा निकाल त्यांच्या बाजूंनी लागला आणि आज सूर्योदयापासून ते सूर्यास्तपर्यंत मी त्यांच्या बंगल्यावर अभिमानानं फडकत असतो. ज्यावेळी आपला एखदा सैनिक मित्र शहीद होतो, तेव्हा त्याच्या पार्थिवावर मला स्थान देऊन त्याच्या बलिदानाप्रीत्यर्थ फैरी झाडल्या जातात. तेव्हा माझ्या एका डोळ्यात अभिमानाचे अश्रू असतात, तर दुसऱ्या डोळ्यांत दुःखाश्रू ! •

आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या भावना मनात दाटून आल्या. तुम्हाला काही सांगावंस वाटलं, म्हणून बोललो.”

राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply