आंब्याचे झाडाचे मनोगत निबंध मराठी – Zhadache Manogat Marathi Essay

मी आहे एक आंब्याचे झाड. आत्ताच माझ्या थंडगार सावलीत बसला होतात ना तुम्ही ? जरा माझ्या हिरव्यागार पानांकडे, डेरेदार खोडाकडे पाहा तरी. माझ्या फांदीच्या आड दडून गाणं म्हणणा-या कोकिळेचे कूजनही तुम्ही आत्ताच तर ऐकले होते. त्यावरून तुम्हाला समजले असेल की वसंतऋतूचे आगमन झाले आहे आणि माझ्यावर मोहरही फुलला आहे.

तर, माझी कहाणी ऐका जरा.. माझा जन्म कुणीतरी सहज टाकलेल्या आंब्याच्या कोयीतून ह्या रस्त्याच्या कडेला झाला. ह्या रस्त्याच्या कडेला असे मी जरी म्हणत असलो तरी माझा जन्म झाला तेव्हा हा रस्ता नव्हता. माझा जन्म होऊन साठ सत्तर वर्षे झाली आहेत. माझे सुदैव म्हणून नंतर तुम्ही माणसांनी बनवलेल्या रस्त्याच्या वाटेत मी आलो नाही. नाहीतर तुम्ही मला कुहाड चालवून केव्हाच गारद करून टाकले असते. कोय जमिनीत पडली, तिला पाऊस, ऊन, माती सगळे काही पोषण मिळाले आणि जमिनीतून एक छानसे रोपटे बाहेर आले. मला कुणी कधी मुद्दाम पाणी दिले नाही की खतही टाकले नाही.

भूगर्भातील पाण्याचा स्त्रोत शोधत माझी मुळे जमिनीत जात होती आणि त्यांनी आणलेले पाणी पिऊन मी प्रकाशाच्या दिशेने वाढत जात होतो. आननु ह्या ठिकाणी मी खूप आनंदात राहातो आहे. माझ्यापासून थोड्याच अंतरावर नदी झुळझुळ वाहाते. अनेक पक्षी माझ्या आश्रयाला येतात. पोपटांचे तर थवेच्या थवे माझ्या अंगाखांद्यावर बागडतात. कावळे तर माझ्या फांद्यांवर हमखास घरटी बांधतात. कोकिळा कावळ्यांची नजर चुकवून आपली अंडी त्यांच्या घरट्यात कशी काय नेऊन टाकते तेही मी पाहिले आहे. मी माणसांच्या आणि पक्ष्यांच्या उपयोगी पडतो म्हणून मला फार आनंद होतो. मला कै-या लागल्या की माझ्यावर वांदरांचे कळप येतात, तसेच लहान मुलेही मला कै-या पाडण्यासाठीदगड मारतात.तेमात्र मला आवडत नाही.

परंतु हल्ली काय झाले आहे की दिवसेंदिवस माझ्या बाजूचा रस्ता वाहनांनी भरून जात आहे. त्या वाहनांच्या प्रदूषणाचा मलाही खूप त्रास होतो. आता तर माझ्या तळाशी कुणीही वाटसरू बसत नाही. त्याऐवजी एका चहावाल्याने चहाची टपरी टाकलेली आहे. तिथे नुसता गजबजाट चाललेला असतो. मध्यंतरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले तेव्हा मला भीती वाटली की माझ्या मुळांभोवती आळे करतात की नाही? अन्यथा माझी मुळे गुदमरतील आणि कमजोरही होतील. कंत्राटदाराला तसे आळे करण्याचा खर्च करायचा नव्हता परंतु सुदैवाने ते काम पाहाणारा साहेब चांगला होता म्हणून त्याने माझ्या मुळांभोवती त्याला आळे घालायला लावले आणि माझा जीव वाचला असेच म्हणावे लागले.

खोरखरच मानवजातीने विचार करण्याची वेळ आली आहे की हवा शुद्ध हवी असेल तर त्यासाठी भरपूर झाडे लावली पाहिजेत. नाहीतर सगळा रखरखाट होऊन जाईल आणि त्याचे परिणाम केवळ मानवालाच नव्हे तर संपूर्ण चराचर सृष्टीला भोगावे लागतील.

झाडाचे मनोगत मराठी निबंध – Zadache Manogat Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply