Pune District Information in Marathi : पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या काठावर वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सार्वजनिक सुविधा आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे आघाडीवर आहे.

अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे पुणे हे शहर ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यात अनेक तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल उद्योग आहेत, त्यामुळे पुणे भारताचे “डेट्रॉईट” वाटते. अतिशय प्राचीन ज्ञात इतिहासापासून पुणे शहराला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ मानले जाते. मराठी भाषा ही या शहराची प्रमुख भाषा आहे. आज आपण या लेखात पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती करून घेणार आहोत.

पुणे जिल्ह्याचा नकाशा-pune jilha nakasha
पुणे जिल्ह्याचा नकाशा

पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती – Pune District Information in Marathi

Table of Contents

पुणे जिल्ह्याचा इतिहास

साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात पुणे शहराचा उल्लेख आढळतो. या शहराची पूर्वीची अनेक नावे इतिहासात आढळतात. जसे की पुन्नाटा, पुनवडी, पुण्य याचेच नंतर पुणे अशी उत्पत्ती झाली असावी असा तर्क मांडला जातो.

अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्वज्ञान गाथेतील अभंगाच्या माध्यमातून सांगणाऱ्या संत तुकारामांची पुणे जिल्हा हीच जन्मभूमी व कर्मभूमी होती.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे होय. म्हणूनच पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित झाली आहे.

पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवार वाडा ही भव्य किल्लासदृश्य वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नाना साहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे हिंदूस्थानचे सत्ताकेंद्र बनले. त्यांनी पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. पर्वती देवस्थान, सारसबागेची निर्मिती केली. हौद, वाडे, मंदिरे, रस्ते इत्यादींचा विकास केला.

सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला व पुढील काळात १८१८ मध्ये शनिवार वाड्यामध्ये इंग्लंडचा युनियन जॅक फडकविला गेला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुण्याच्या शनिवारवाड्यावरील युनियन जॅक काढून तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

पुणे जिल्ह्याचा भौगोलिक स्थान व विस्तार

पुणे जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पूर्व रेखावृत्तापर्यंत आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमेस उत्तरेस व पुर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेय सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा व वायव्येला ठाणे जिल्हा आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यास अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे या पाच जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत.

पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ

पुणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १५,६४२ चौ.किमी. आहे. क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. महाराष्ट्र राज्याचे ५.१० क्षेत्र पुणे जिल्ह्याने व्यापलेले आहे.

पुणे जिल्ह्याची प्राकृतिक रचना

जिल्ह्याचा पश्चिम भाग सह्याद्री पर्वताचा आहे. जिल्ह्याच्या या भागात शिंगी, तसुबाई, मांडवी, ताम्हीणी, अंबाला इत्यादी डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे. जिल्ह्यात माळशेज, बोर, ताम्हीणी, वरंधा, कात्रज, दिवे इत्यादी प्रमुख घाट आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर, तसुबाई, शिंगी इत्यादी शिखरे आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पुरंदर टेकड्या आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्वभाग पठारी प्रदेशाचा आहे.

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ९४ लाख २६ हजार ९५९ इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या ४९ लाख ३६ हजार ३६२ म्हणजेच ५२.३६ टक्के इतकी आहे तर स्त्रियांची लोकसंख्या ४४ लाख ९० हजार ५९७ म्हणजेच ४७.६४ टक्के इतकी आहे. लोकसंख्येनुसार पुणे जिल्हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे जिल्हा होता. परंतु ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झाल्यामुळे सद्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा पुणे ठरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे अनुक्रमे पुणे, ठाणे, मुंबई उपनगर हे होत.

पुणे जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण हे ९१० इतके आहे व शहरी/नागरी लोकसंख्येचे प्रमाण ६०.९ टक्के इतके आहे. याशिवाय लोकसंख्येची घनता ६०३ चौ.किमी. आहे व साक्षरता ८६.२ टक्के इतकी आहे. तसेच सन २०११ च्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुके

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १४ तालुके आहेत. यामध्ये हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, पुणे शहर यांचा समावेश होतो.

पुणे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना

पुणे जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात मोडतो. पुणे प्रशासकीय विभागमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात २ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ३ कटक मंडळे, १४ तालुके, १३ पंचायत समित्या, ८ महसूल उपविभाग, १४७८ गावे आणि १४०७ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, बारामती, मावळ व शिरूर असे ४ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक ३ आहेत. यामध्ये पुणे- एमएच १२, पिंपरी-चिंचवड एमएच -१४ आणि बारामती एमएच – ४२ असे विभाग आहेत.

राजकीय व प्रशासकीय रचना :

संस्था संख्या नावे
महापालिकापुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
नगरपरिषदा१३भोर, लोणावळा, जुन्नर, आळंदी, सासवड, जेजुरी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, तळेगाव-दाभाडे, राजगुरूनगर, चाकण
पंचायत समित्या१३हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ
कटक मंडळेपुणे कॅन्टोनमेंट, खडकी कॅन्टोनमेंट व देहूरोड कॅन्टोनमेंट
महसूल उपविभागहवेली, पुणे-शिरूर, भोर-वेल्हे, मावळ-मुळशी, दौंड-पुरंदर, जुन्नर-आंबेगाव, खेड, बारामती-इंदापूर

पुणे लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेन्ट (अ. जा.) आणि कसबा पेठ या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

बारामती लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

शिरूर लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मावळ लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांचा आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड व पिंपरी (अ.जा.) या ३ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

पुणे महानगरपालिका

पुणे नगरपालिकेची स्थापना २० मे १८५७ रोजी झाली. १८७६ ते १८८२ या काळात महात्मा फुले नगरपालिकेचे सदस्य होते. नंतर पुणे नगरपालिकेचे रुपांतर पुणे महापालिकेत १५ फेब्रुवारी १९५० रोजी झाले. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस हे होते. तर पुण्याचे पहिले म्युनिसिपल कमिशनर स.गो.बर्वे हे होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना ४ मार्च १९७० मध्ये झाली. त्यानंतर या नगरपालिकेचे रुपांतर ११ ऑक्टोबर १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पहिले महापौर श्री.ज्ञानेश्वर लांडगे होते व देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका ओळखली जाते.

पुणे जिल्हा परिषद

पुणे जिल्ह्यामध्ये असणारी जिल्हा परिषद स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये स्थापन करण्यात आली. स्व. शंकरराव दशरथराव उरसळ यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी दि. १२/८/१९६२ ते ११/८/१९७२ पर्यंत अध्यक्षपद भूषविले तेव्हा पासून आजअखेर २१ अध्यक्ष झाले आहेत. पुणे जिल्ह्यात ७५ जिल्हापरिषद मतदार संघ आहेत.


पुणे जिल्ह्यातील नद्यांची नावे आणि माहिती

भीमा नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी भीमाशंकर येथे उगम पावते. घोड, मुळा, मुठा, इंद्रायणी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. पुणे हे शहर मुळा-मुठा नदीच्या संगमावर आहे. जिल्ह्यात बारामती तालुक्यात शिर्राफळ व इंदापूर तालुक्यात शेटफळ हे तलाव आहेत. नद्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

भिमा नदी : भिमा ही पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी आंबेगाव तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असणाऱ्या भिमाशंकर येथील मंदिरामध्ये उगम पावते. ही नदी जिल्ह्याच्या पूर्व सिमेवरुन वाहत जाते. या नदीचा प्रवास आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यांमधून तसेच दौंड व इंदापूर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागातून होतो. घोड, मुळा, मुठा, इंद्रायणी, निरा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. भिमा व निरा या नद्यांचा संगम निरा-नरसिंहपूर जवळ होतो.

इंद्रायणी नदी : लोणावळा कुरवडेजवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो. ही एक पवित्र नदी समजली जाते.

निरा नदी : निरा जिल्ह्याच्या दक्षिण सिमेवरुन साधारणत: पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. या नदीने पुणे-सातारा व पुणे-सोलापूर या जिल्ह्यांचे सिमेचे कार्य केले आहे. वीर धरण (ता.पुरंदर) हे निरा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे. कन्हा ही निरेची उपनदी आहे.

कहा नदी : पुणे जिल्ह्यातील सासवड आणि बारामती ही दोन प्रमुख ठिकाणे या नदीच्या काठावर वसली आहेत. सासवड हे आचार्य अत्रेचे मूळ गाव असल्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ही ‘कव्हेचे पाणी’ असे आहे.

मुळा नदी : या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील मुळशी धरणातून होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. पुणे शहरात मुळेला आधी रामनदी व नंतर पुणे रेल्वे स्टेशन जवळ मुठा नदी येवून मिळते. पुढे मुळामुठा यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भिमा नदीस मिळतो.

मुठा नदी : मुठा या नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगेत होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. खडकवासला येथे या नदीवर मोठे धरण आहे. पुणे शहराला पाण्याचा मुख्य पुरवठा येथूनच होतो. पुणे शहराच्या पुर्व बाजूस मुळा मुठा नद्यांचा संगम झाला आहे. म्हणजेच मुळा व मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर वसले आहे.

पवना नदी : पवना नदी पुणे व पिंपरी-चिंचवड येथून वाहते. या नदीवर पवनानगर येथे धरण आहे.

कुकडी नदी : जुन्नर शहराच्या पश्चिमेस असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्रीघाट माथ्यावरील नाणेघाटात कुकडी नदीचा उगम झालेला आहे. ही नदी जुन्नर, शिरुर या गावाजवळून वाहत जावून घोडनदीला मिळते. उत्तरेस हरिश्चंद्र गडावर उगम पावणारी पुष्पावती ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडी नदीस जुन्नरच्या पूर्वेस असलेल्या येडगाव जवळ मिळते. कुकडी नदीवर येडगाव, माणिकडोह ही धरणे बांधली आहेत.

आंबी नदी : ही नदी मुठा नदीची एक उपनदी आहे. पानशेत चे मातीचे धरण याच आंबी नदीवर बांधलेले आहे.

मांडवी नदी : या नदीचा उगम ओतूर गावाच्या उत्तरेस असलेल्या मांडवे गावात होतो आणि ही नदी ओझर (ता.जुन्नर) गावाजवळ सरस्वती नदीस मिळते. जुन्नर पासून २० कि.मी. अंतरावर मांडवी नदीवर चिल्हेवाडी हे मातीचे धरण आहे.

मोसे नदी : मोसे नदी किंवा मोशी नदी ही मावळ तालुक्यातील एक नदी आहे. या नदीवर वरस गाव येथील वरसगाव धरण (बाजी पासलकर धरण) आहे. हे धरण आंबी नदीवर असलेल्या पानशेत धरणाला अगदी लागून आहे.

वेळवंडी नदी : वेळवंडी ही मावळ तालुक्यातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी निरा नदीची उपनदी आहे. मावळ मध्ये हिच्या वर वेळवंडी धरण आहे. तसेच भोर तालुक्यातही या नदीवर भाटघर धरण आहे.

घोड नदी : या नदीच्या खोऱ्यात पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग येतो. कुकडी, मीना या घोडनदीच्या उपनद्या आहेत.

मीना नदी : मीना ही घोडनदीची उपनदी आहे. वडज हे मातीचे धरण कुकडी प्रकल्पांतर्गत मीना नदीवर आहे.

पुणे जिल्ह्यातील नद्या व संगमस्थाने

नदीसंगमस्थान
मुळा-मुठापुणे (शहर)
भिमा-निरानिरा नरसिंहपूर (ता.इंदापूर)
भिमा-भामा-इंद्रायणीतुळापूर
कऱ्हा-निरासोनगाव
पुणे जिल्ह्यातील नद्या व संगमस्थाने

पुणे जिल्ह्यातील नद्या व काठावरील ठिकाणे

नदीकाठावरील ठिकाणे
भीमाराजगुरुनगर, दौंड
कऱ्हाबारामती
मुळापौड
घोडआंबेगाव, घोडेगाव, शिरूर
भीमा-निरा संगमनिरा नरसिंगपूर
नीराभोर, निरा
कुककी जुन्नर
इंद्रायणीदेहू, आळंदी
मुळा-मुठा संगमपुणे
पुणे जिल्ह्यातील नद्या व काठावरील ठिकाणे

पुणे हवामान

पुणे जिल्ह्यातील हवामान साधारणत: उष्ण व कोरडे आहे. पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व उंच आहे. त्यामुळे तेथील हवामान थंड असते. लोणावळा, खंडाळा ही जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. या भागात उंच डोंगरामुळे ढग अडविले जाऊन पाऊस जास्त पड़तो. याउलट जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे असते. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. जिल्ह्यात सरासरी पाऊस ६५० ते ७०० मी. मी. इतका पडतो.

पुणे जिल्ह्यातील धरणे व सिंचन प्रकल्प

पुणे जिल्ह्यात ६ मोठे सिंचन प्रकल्प, ९ मध्यम सिंचन प्रकल्प तर २५३ लघु सिंचन प्रकल्प आहेत. मोठ्या सिंचन प्रकल्पामध्ये भाटघर धरण, वीर धरण, खडकवासला धरण, पानशेत, वरसगाव, पवना धरण, येडगाव, माणिकडोह इ. धरणे आहेत. याशिवाय घोडनदीवरील डिंभे (ता. आंबेगाव), चासकमान, वडज, पिंपळगाव, घोडप्रकल्प, नाझरे ही धरणेही पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जाते. तर पिंपरी-चिंचवडला पवना प्रकल्पातून पाणी पुरविले जाते.

खडकवासला धरण : मुळशी येथे मुठा नदीवर १८७९ मध्ये खडकवासला हे धरण बांधण्यात आले. या धरणातून पुणे शहर व उपनगरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यात येते.

पाणशेत धरण : आंबी नदीवर असणाऱ्या या धरणातून पुणे शहर व उपनगराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. १२ जुलै १९६१ रोजी पाणशेत धरण फुटले होते. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येवून १९७२ सालापासून पाणी साठवण सुरू करण्यात आले.

नदीधरणजलाशयाचे नाव
वेळवंडीभाटघर (लॉईड धरण) (ता.भोर)येसाजी कंक जलाशय
अंबीपानशेत (ता.मुळशी)तानाजी सागर जलाशय
मोसीवरसगाव (ता.मुळशी)वीर बाजी पासलकर
अंबी, मोसी, मुठाखडकवासला
पवनापवना धरण (फागणे, ता.मावळ)
घोड नदीचिंचणील (ता.शिरुर)
कुकडीमाणिकडोह (ता.जुन्नर)शहाजीसागर
भीमाचासकमाण प्रकल्प (ता.खेड)
निरावीर धरण (ता. पुरंदर)
पुणे जिल्ह्यातील धरणे व सिंचन प्रकल्प

पुणे जिल्ह्यातील मृदा

पश्चिमेकडील डोंगराळ भागात तांबडी मृदा आढळते. पूर्वेकडील पठारी प्रदेशात तपकीरी मृदा आढळते. इंदापूर, बारामती या सारख्या तालुक्यांमध्ये काळी कसदार मृदा आढळते. यामुळे येथील शेतीचा विकास झाला आहे. भीमा आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील जमीन सुपीक आहे.

पुणे जिल्ह्यातील वनसंपदा व वन्यजीव

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात वने आहेत. या वनांमध्ये नीम, चंदन, खैर, हिवर, आपटा, कळंब, साग, इत्यादी वृक्ष आहेत. जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात गवत, घायपात, बाभूळ, शमी इत्यादी वनस्पती आढळतात. जिल्ह्यात पाळीव प्राण्यांशिवाय बिबट्या, लांडगा, हरिण, सर्प, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. भीमाशंकर येथील अभयारण्यात शेकरू हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो.

पुणे जिल्ह्यातील अभयारण्ये

पुणे जिल्ह्यात भिमाशंकर अभयारण्य, मयुरेश्वर अभयारण्य आणि राजीव गांधी (कात्रज) सर्पोद्यान या अभयारण्याचा समावेश होतो.

भिमाशंकर अभयारण्य : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात भिमाशंकर येथे अभयारण्य आहे. या अभयारण्याचा काही भाग ठाणे जिल्ह्यात पसरला आहे. या अभयारण्यात भारतातील सर्वात मोठी शेकरु ही उडणारी खार आढळते. ‘शेकरु’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. या अभयारण्यात भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदीर आहे. या अभयारण्यात विविध औषधी वनस्पती आणि कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.

मयुरेश्वर अभयारण्य : सुपे येथे मोरांसाठी प्रसिद्ध असलेले मयुरेश्वर अभयारण्य आहे. याच अभयारण्यात चिंकारा (भारतीय हरीण) आढळते.

राजीव गांधी (कात्रज) सर्पोद्यान : या उद्यानात सापाच्या १६० हून अधिक प्रजाती आहेत. येथे साप, कासव, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे जतन केले जाते. येथे प्राणी संग्रहालयही आहे.

पुणे जिल्ह्यातील शेती व इतर पूरक व्यवसाय

या जिल्ह्याचा पश्चिम भाग हा जास्त पावसाचा आहे. या भागात तांदूळ हे प्रमुख पीक आहे. या भागात आंबेमोहोर, कमोद इत्यादी तांदळाच्या जाती प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात ज्वारी व बाजरी ही पिके सर्वत्र घेतली जातात. गहू हे पूर्वेकडील भागात महत्त्वाचे पीक आहे. दौंड व शिरूर तालुक्यात संत्री व मोसंबीच्या बागा आहेत. पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळाच्या बागा आहेत.

जुन्नर, हवेली, दौंड इत्यादी तालुक्यात फुलांची शेती केली जाते. याशिवाय जिल्ह्यात आंबा, डाळिंब, केळी इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर, द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, अंजिर संशोधन केंद्र राजेवाडी (पुरंदर), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड (पुणे)इ. महत्त्वाची संशोधन केंद्रे पुणे जिल्ह्यात आहेत. तसेच पुणे येथे मधुमक्षिका पालन व अंडी उबवणी केंद्र आहे.

पुणे जिल्ह्यातील उद्योगधंदे

पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) एकूण ११ वसाहती आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, रांजणगाव, कुरकुंभ, बारामती, जेजुरी, भिगवण, पांढरी यांचा समावेश होतो. दारुगोळा बनविण्याचे कारखाने खडकी व देहुरोड येथे आहेत. त्याचबरोबर स्कूटर, रिक्षा, ट्रक इत्यादी तयार करण्याचे कारखाने चिंचवड येथे आहेत. पिंपरी येथे पेनिसीलीन व मोटारी तयार करण्याचे कारखाने आहेत. चिंचवड येथे स्कूटर व रिक्षाच्या कारखाना आहे.

मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे काच सामान व थर्मास बनविण्याचे कारखाने आहेत. पिंपरी, लोणी काळभोर येथे रेडिओ तयार करतात. भोर तालुक्यात भोर येथे मेणकापड, मच्छरदाण्या, सूत, रंग इ. चे उद्योग आहेत व सारोळे येथे कागद कारखाना आहे. इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे यंत्र निर्मिती कारखाना आहे. शिरुर तालुक्यात शिक्रापूर जवळ यंत्राचे कारखाने आहेत. मुंढवा येथे लोखंडी सामानाचा तसेच लोणी, भोसरी व लोणावळे येथे रेडिओचे कारखाने आहेत. उत्तरेकडील जुन्नर, खेड या भागात तेल गिरण्या आहेत.

पुण्यात अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती तंत्रज्ञान संस्था एकवटल्या आहेत. भारतीय ॲग्रो फाऊंडेशन, उरळीकांचन (ता.हवेली), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (मांजरी, पुणे) या कृषिविषयक संस्था पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व-उत्तर भागात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत. यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिरोली, मुळशी तालुक्यातील हिंजवडी, भोर तालुक्यातील निगडे, शिरूर तालुक्यातील न्हावरे, दौंड तालुक्यातील मधुकरनगर, बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर व बीजवडी, हवेली तालुक्यातील थेऊर, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक यासारखे १३ साखर कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत. याशिवाय जिल्ह्यात काही खाजगी कारखाने आहेत. यामध्ये दौंड, यवत, पाटेठाण, बारामती या ठिकाणच्या कारखान्यांचा समावेश होतो.

पुणे जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण

पुणे जिल्ह्यातून ३ राष्ट्रीय महामार्ग व एक द्रुतगती मार्ग जातो. पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (पूर्वीचे नाव क्र. ९) व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०, हे तीन राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून जातात.

पुणे जिल्ह्यातून मुंबई-सोलापूर, पुणे-मिरज, दौंड-बारामती असे लोहमार्ग आहे. मुंबईसोलापूर लोहमार्गावर लोणावळा, पुणे व दौंड ही मुख्य स्थानके आहेत. पुणे व दौंड ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहेत. पुणे येथे लोहगाव विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत. याशिवाय खेड तालुक्याजवळ आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहू केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

पुणे जिल्ह्यातील लोकजीवन

जिल्ह्यातील लोक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, पुलोत्सव, वसंत व्याख्यानमाला, सवाई गंधर्व संगीत महोत्सव , शनिवारवाडा महोत्सव, दहिहंडी उत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पीफ), आषाढी-कार्तिकी वारी इत्यादी उत्सव आणि दसरा, दिवाळी इत्यादी सण साजरे करतात. शेतकरी बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करतात. लेझीम, तमाशा या सारख्या लोककलांचा वापर मनोरंजनासाठी केला जातो. जिल्ह्याच्या उत्तर व पश्चिमेकडील डोंगराळ भागात जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये भिल्ल, ठाकर, कातकरी व महादेव कोळी हे आदिवासी राहतात. ते होळी सण साजरा करतात. मनोरंजनासाठी ते पारंपरिक लोकनृत्य करतात.

जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वे

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक मान्यवरांची जन्मभूमी व कर्मभूमी ही पुणे हीच होती. यामध्ये संत ज्ञानेश्वर (पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी), संत तुकाराम महाराज (पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले), छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे इत्यादींची ही शौर्य भूमी आहे. त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, चाफेकर बंधू, पं.रमाबाई, विष्णुशास्त्री चिपळूणकर,पु.ल.देशपांडे, बालगंधर्व,यदुनाथ थत्ते,एस.एम.जोशी, न.चि.केळकर, धनंजयराव गाडगीळ, नानासाहेब गोरे, मोहन धारीया, भिमसेन जोशी, हमीद दलवाई, डॉ.बाबा आढाव, डॉ.वसंतराव गोवारीकर इ. कितीतरी मान्यवरांचा उल्लेख करता येईल.

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे

जिल्ह्यात लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. शिवनेरी, सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर, लोहगड, विसापूर इत्यादी किल्लेही पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. भीमाशंकर येथील शंकराचे मंदिर आहे. येथे भीमा नदीचे उगमस्थान व अभयारण्य आहे. कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहे. पुणे येथे केळकर संग्रहालय, आगाखान पॅलेस, पुणे विद्यापीठ इत्यादींना पर्यटक भेट देतात. पुणे शहराला लागून महाळुगे-बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आहे.

पुणे शहरातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. चाकण येथे भुईकोट किल्ला, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, देहू येथे संत तुकाराम महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. मोरगाव, रांजणगाव, ओझर, थेऊर, लेण्याद्री ही अष्टविनायकातील पाच ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत.
मोरगावजवळ सुपे येथे मयुरेश्वर अभयारण्य आहे. कात्रज येथे सर्पोद्यान आहे. जेजुरी येथे खंडोबाचे भव्य मंदिर डोंगरावर असून हे यात्रेचे ठिकाण आहे. निगडी येथील अप्पुघर प्रसिद्ध आहे. खेड-शिवापूर येथे कमरअली दरवेश दर्गा आहे.

भोर येथील भाटघर धरण, बनेश्वर ही पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. जुन्नर तालुक्यातील आर्वी हे ठिकाण उपग्रहाकडून येणारे संदेश प्राप्त करण्याचे केंद्र आहे. तसेच खोडद येथे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी मोठी दुर्बिण बसवलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील किल्ले व गड

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सिंहगड, शिवनेरी, रायरेश्वर, राजमाची, राजगड, विसापूर, लोहगड, मल्हारगड, तोरणा, दुर्ग-ढाकोबा, तुंग, तिकोना, जीवधन, कोरीगड-कोराईगड, चावंड, भोरगिरी, सिंदोळा, चाकणचा किल्ला, रायरीचा किल्ला, हडपसर हे किल्ले पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. .

१) पुरंदर किल्ला (ता.पुरंदर) : हा किल्ला पुण्याचा अग्नेय दिशेला व सासवडच्या नैऋत्य दिशेला आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांश प्रदेश सपाट आहे. तर पश्चिमेचा प्रदेश डोंगराळ आहे. या किल्ल्याच्या वायव्येला सिंहगड तर पश्चिमेला राजगड आहे. काही वर्षे हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होती. तसेच हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी होता. पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत आहे. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत असे मानले जाते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर १६६५ साली झाला. तसेच सवाई माधवरावांचा जन्मही याच किल्ल्यावर झाला. याच किल्ल्यावर मुरारबाजीने दिलेरखानशी निकराची झुंज दिली. या गडावरील बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्मावती तळे, शेंदऱ्या बुरुज, केदारेश्वर इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

२) सिंहगड किल्ला (ता. हवेली) : पुण्याच्या नैऋत्येला साधारणत: २५ किमी. अंतरावर हवेली तालुक्यात डोणजे गावात हा किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग व दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो दृष्टीस पडतो. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होतो. शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांना या किल्ल्यावर लढताना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देवून हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’ हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. याच गडावर राजाराम महाराजांचे निधन झाले. या गडावरील दारूचे कोठार, टिळक बंगला, कोंढाणेश्वर, श्री अमृतेश्वर भैरव मंदिर, देवटाके (पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग), कल्याण दरवाजा, उदयभानचे स्मारक, झुंजार बुरुज, डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा, राजाराम महाराजांचे स्मारक, नरवीर तानाजीचे स्मारक इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

३) शिवनेरी किल्ला (ता.जुन्नर) : शिवनेरी हा प्राचीन किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावाजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला. या किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदीर व जिजाबाई आणि बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. किल्ल्यात शिवाईदेवीचे मंदिर असल्यामुळे त्यास शिवनेरी हे नाव पडले. या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदीर, अंबरखाना, पाण्याची टाकी, बौद्धांच्या गुहा, शिवरायांचे जन्मस्थान इ. ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

४) रायरेश्वर किल्ला (ता.भोर) : पुणे जिल्ह्यातील वाई-सातारा डोंगर रांगेमधे भोर जवळ हा किल्ला आहे. शिवरायांनी स्वराज्याची शपथ याच रायरेश्वराच्या डोंगरावर घेतली होती. येथील रायरेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हे रायरेश्वराचे पठार रानफुलांनी भरून जाते.

५) राजमाची : उल्हास नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात मुंबई-पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस राजमाची किल्ला वसलेला आहे. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणं आहे. यालाच कोंढाणे लेणी असे म्हणतात. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोकणचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे.

६) राजगड (ता.वेल्हे) : राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील गुंजवणे या गावात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची २५ वर्षे राजगड हीच राजधानी होती. राजाराम महाराजांचा जन्म ही याच किल्ल्यावर झाला. महाराणी सईबाई यांची समाधी येथेच आहे. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणूनच राजांनी राजगड ही राजधानी म्हणून निवडली. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडु लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐसपैस-दुर्गम अशा रायगडावर नेली.

७) विसापूर (ता.मावळ) : मावळ तालुक्यात लोहगडच्या शेजारी असलेला किल्ला म्हणजे विसापूर होय. हा किल्ला भाजे गावात गेल्यावर दिसतो. पायऱ्याच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे मंदीर आहे.

८) लोहगड (ता.मावळ) : लोहगड किल्ला भाजे व भेडसे बौद्ध लेण्यांच्या जवळच आहे. ही लेणी ज्या काळात निर्माण झाली त्याही आधी किल्ल्यांची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या गडावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, महादरवाजा पाहण्यासारखे आहे.

९) मल्हारगड : महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगडचा उल्लेख केला जातो. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड, तोरणा हे किल्ले आहेत. तर दुसरी डोंगररांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. या रांगेवर पुरंदर, वज्रगड, सिंहगड, मल्हारगड हे किल्ले आहेत. मल्हारगडच्या पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पाणसे यांनी केली. पाणसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. या पाणसेंचा चिरेबंद वाडा किल्ल्याखालच्या सोनेरी गावामध्ये आहे.

१०) तोरणा (ता.वेल्हे) : हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना घेतलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण या गडावर बांधले म्हणून या गडाचे नाव ‘तोरणा’ असे पडले. गडावर तोरणा जातीची पुष्कळ झाडे असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ पडले असेही मानले जाते. तोरणा किल्ल्याचा विस्तार मोठा असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले.

११) दुर्ग-ढाकोबा : ढाकोबा जवळच दुर्ग हा एक जुळा किल्ला आहे. जुन्नर परिसरातील घाटाच्या ) माळशेज डोंगररांगेत हा किल्ला आहे. किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे म्हणजे कोकणात उतरणारा रौद्र कडा आणि ढाकोबाचे मंदीर. शेजारीच दाऱ्या घाट नावाची कोकणात उतरणारी घाट वाट आहे.

१२) तुंग किल्ला (ता.मुळशी) : पवन मावळ प्रांतातील या किल्ल्याचा पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी उपयोग होत असे. या किल्ल्यावर तुंगी देवीचे मंदीर आहे.

१३) तिकोणा (ता.मुळशी) : पवना नदीवरील धरणापासून ३ ते ४ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोणा असे नाव पडले. येथील गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदीर, बालेकिल्ल्याच्या खालील भागात तुळजाईचे मंदीर ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

१४) जीवधन : घाटघरच्या परिसरात असलेला हा किल्ला प्राचीन नाणे घाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणे घाटापासून जीवधन किल्ला अगदी जवळ आहे. जीवधन किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर होय. या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा ‘वानरलिंगी’ नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे.

१५) कोरी-कोराई गड : लोणावळ्याच्या पूर्वेला साधारणत: २५ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. गडावर कोराई देवीचे मंदीर आहे.

१६) चावंड : जुन्नर तालुक्यातून कुकडी नदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड किंवा प्रसन्नगड असेही म्हणतात. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही केला जातो.

१७) भोरगिरी किल्ला : भिमा नदीच्या खोऱ्यामध्ये भवरगिरी किंवा भोरगिरी नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव ही आहे. राजगुरुनगर पासून साधारणत: ५५ किमी. अंतरावर हा किल्ला आहे.

१८) सिंदोळी किल्ला : हा किल्ला जुन्नरच्या वायव्येला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे.

१९) चाकणचा किल्ला : ऐतिहासिक महत्त्व असलेला चाकण गावातील संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिलेला आहे. हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावरआहे.

२०) हडसर किल्ला : जुन्नर तालुक्यामध्ये हडसर हा सुंदर किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वत गड होय.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख घाट

प्रमुख मार्गघाटाचे नाव
बोरघाटपुणे – मुंबई
कात्रज घाटपुणे – सातारा
वरंधा घाटभोर – महाड
माळशेज घाटआळेफाटा – कल्याण
खंबाटकी घाटपुणे – सातारा
दिवे घाटपुणे – बारामती
नाणेघाटजुन्नर – कल्याण
ताम्हीणी घाटमुळशी-माणगाव (रायगड)
पुणे जिल्ह्यातील प्रमुख घाट

पुणे जिल्हा शैक्षणिक माहिती

पुणे जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (स्थापना १९४९), भारती विद्यापीठ (स्थापना १९६४), टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (१९८५) ही विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु बॅ.एम.आर. जयकर हे होते. संपूर्ण महाराष्ट्राला पाठ्यपुस्तके पुरविणारी ‘बालभारती’ ही संस्था पुण्यातच आहे. याशिवाय पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज (१८५१), इंजिनिअरींग कॉलेज (१८५४), फर्ग्युसन कॉलेज (१८८५), कृषि महाविद्यालय (१९०७), स.प. महाविद्यालय (१९१६), लॉ कॉलेज (१९२४), वाडीया कॉलेज (१९३२), भारत इतिहास संशोधक मंडळ (१९१०), तसेच गोखले इन्स्टिट्यूट, भंडारकर प्राच्यविद्या संस्था, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.), ज्ञान प्रबोधिनी, सिम्बॉयसिस कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्थांमुळे पुण्याला शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.

अलिकडील काळात पुण्याची आय.टी. क्षेत्रातील कामगिरीही उल्लेखनिय आहे. यामध्ये हिंजवडी, मगरपट्टा इत्यादी आय.टी. पार्क प्रसिद्ध आहेत. याशिवाय श्री शिवछत्रपती क्रीडानगरी किंवा बालेवाडी क्रीडासंकुल हे पुणे शहराच्या बालेवाडी या उपनगरामधील एक मोठे क्रीडासंकुल आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या संरक्षण शिक्षण संस्था

 1. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग, दापोडी.,
 2. आर्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (ए.एफ.एम.सी.)
 3. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी-एनडीए), खडकवासला (पुणे),
 4. आयएनएस शिवाजी, लोणावळा (जि. पुणे),
 5. कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे.
 6. आर्मी स्कूल ऑफ फिजीकल ट्रेनिंग, पुणे.
 7. इंटेलिजन्स कोअर ट्रेनिंग, पुणे.
 8. सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय, पुणे.

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वैज्ञानिक व इतर शिक्षण संस्था

 1. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्युट- नारी), भोसरी (पुणे)
 2. आघारकर संशोधन संस्था
 3. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी-एनआयव्ही), पुणे
 4. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी-एनसीएल), पुणे.
 5. प्रगत संगणन विकास केंद्र (सीडीसी) ६) प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (डीआयटी)
 6. खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतर-विद्यापीठ केंद्र (आयुका)
 7. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम)
 8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (आयसर, पुणे)
 9. नॅशनल नॅचरोपॅथी, पुणे.
 10. केंद्रीय जल आणि विद्युत अणुसंसाधन केंद्र (सेंट्रल वॉटर अॅन्ड पॉवर रिसर्च स्टेशन), खडकवासला

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या इतर संस्था

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी उदयोग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, महाराष्ट्र कृष्णा-खोरे विकास महामंडळ, कृत्रिम अवयव केंद्र वानवडी, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, भारतीय इतिहास संशोधन केंद्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था मांजरी, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी), यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), इंडियन ड्रग लॅबोरेटरी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, नॅशनल फिल्म अर्कायु, अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भारती अंग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन उरळीकांचन (जि. पुणे), आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), राजा केळकर वस्तु संग्रहालय इ.

पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थळापैकी पाच स्थळे पुणे जिल्ह्यात येतात. ती पुढीलप्रमाणे :

 1. श्री मोरेश्वर, मोरगाव (ता.बारामती)
 2. श्री चिंतामणी, थेऊर (ता.हवेली)
 3. श्री गिरीजात्मक, लेण्याद्री (ता. जुन्नर)
 4. श्री विघ्नहर, ओझर (ता.जुन्नर)
 5. श्री महागणपती, रांजणगाव (ता.शिरुर)

पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग मंदिर

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. व महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी भिमाशंकर हे एकमेव ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. येथील ज्योतिर्लिंगाचे महादेवाचे मंदिर नाना फडणीसांनी बांधले आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

पुणे जिल्ह्यातील लेणी

पुणे जिल्ह्यात कार्ले, भाजे (ता.मावळ), भेडसा, पाताळेश्वर लेणी ही प्रसिद्ध लेणी आहेत. पुण्याच्या पश्चिमेस मुंबई रस्त्यावर ही लेणी आहेत. 2

पुणे शहरातील महत्त्वाची स्थळे

पुणे शहरामध्ये श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती, ओंकारेश्वर मंदीर, पर्वती, लालमहाल, शनिवार वाडा, आकुर्डीचे भवानी मंदिर, चतुःश्रृंगी मंदिर, मृत्युंजय मंदिर, नानासाहेब पेशवे स्मारक, नारायणरावांचे स्मारक, लाकडी पूल, चिमाजीआप्पाची समाधी, वानवडी , येथील शिंदयांची छत्री, टिळक स्मारक मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कस्तुरबा स्मारक (आगाखान पॅलेस), महात्मा फुले संग्रहालय, राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, कात्रजचे सर्पोद्यान, विश्रामबागवाडा, सारसबाग, संभाजी पार्क, बंडगार्डन, पेशवे उद्यान इ. ठिकाणी प्रसिद्ध व पाहण्यासारखे आहे.

आगाखान पॅलेस : पुणे-नगर मार्गावर भव्य अशी आगाखान पॅलेस ही पुण्यातील ऐतिहासिक इमारत आहे. ही इमारत खोजा जमातीचे धर्मगुरू प्रिंस आगाखान यांची आहे. नंतर प्रिंस आगाखान यांनी हा राजवाडा गांधी राष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्राला अर्पण केला. इ.स. १९४२ च्या भारत छोडो चळवळीत याच वास्तुत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य होते. गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई यांचे १५ ऑगस्ट १९४२ रोजी व कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी याच राजवाड्यात बंदीवासात असताना निधन झाले. त्यामुळे याठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले आहे. १९७२ मध्ये येथे संग्रहालय स्थापन करण्यात आले. यात गांधीजींनी वापरलेल्या अनेक वस्तु ठेवण्यात आल्या आहेत.

शनिवारवाडा : पहिला बाजीराव पेशवा यांनी सन १७३६ मध्ये शनिवारवाडा बांधला. शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने ओळखले जाते. शनिवारवाड्यासमोर पहिल्या बाजीरावाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे. सन १९२८ मध्ये आगीमध्ये शनिवारवाडा नष्ट झाला. आता फक्त या वाड्याची तटबंदीच शिल्लक आहे.

लाल महाल : दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा लाल महाल शनिवार वाड्याजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई येथे काही काळ वास्तव्यास होते. येथेच शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाची बोटे कापली होती. शिवकालीन लाल महाल सध्या अस्तित्वात नाही तर सद्याचा लाल महल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने १९८८ साली उभारली आहे.

पर्वती : पर्वतीची टेकडी पुण्याच्या दक्षिण भागामध्ये आहे. या टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. नानासाहेब पेशवे यांनी देवदेवतेश्वर मंदिर बांधून घेतले. .

कात्रज सर्पोद्यान : पुण्यापासून आठ किमी. अंतरावर पुणे-सातारा रोडवर हे सर्पोद्यान आहे. या उद्यानामध्ये साप, सरपटणारे प्राणी, कासवे यांचा संग्रह आहे. श्री निलमकुमार खैरे यांनी सन १९८६ मध्ये या उद्यानाची स्थापना केली. त्यानंतर हे उद्यान १९९९ मध्ये राजीव गांधी उद्यानामध्ये समाविष्ट करण्यात आले.

संभाजी पार्क : ही पुण्यामधील अतिशय सुंदर बाग आहे. येथील मत्सालय व छोटासा किल्ला हे प्रमुख आकर्षण आहे.

पेशवा पार्क : ही बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे.

अप्पूघर : पुण्यातील निगडी येथे असणारे अप्पूघर लहान मुलांचे व पर्यटकांचे केंद्र झाले आहे. येथील दुर्गामातेचे मंदीर प्रसिद्ध आहे. हे दिल्लीच्या अप्पुघरासारखेच आहे.

चाफेकर वाडा : चिंचवड गावात राहणारे चाफेकर बंधू दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण व त्याचे सहकारी महादेव रानडे या क्रांतीकारकांनी पुण्यातील गणेश खिंडीत ब्रिटीश अधिकारी रॅन्ड याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणात एकाच घरातील तीन सख्खे भाऊ फाशी जाण्याची पहिलीच घटना घडली. चिंचवड गावात त्यांच्या राहत्या वाड्यात त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात स्वातंत्र्य चळवळीचा व त्यांचा संपूर्ण चित्रमय जीवनपट दाखविण्यात आला आहे.

कसबा गणपती : कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. हा गणपती लाल महलाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली.

श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती : श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांनी स्वखर्चाने मुर्तीची स्थापना केली. हा गणपती पुण्यातील एक मानाचा गणपती आहे. गणेशोत्सवात या गणपतीची व देखाव्यांचे दृश्य बघण्यासाठी लोकांची गर्दी असते.

चतु:श्रृंगी मंदिर : चतुःशृंगी मंदिर हे एक लहान टेकडी आहे. हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले आहे.

महात्मा फुले स्मारक : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुण्यात ज्या वाड्यात राहत होते. त्या वाड्यास १९७२ मध्ये राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. त्यानंतर १९९१ मध्ये या वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. सद्या या वाड्याचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक स्मारक : हे स्मारक नारायण पेठेत टिळक वाड्यात आहे. पूर्वीचा हा गायकवाड वाडा लोकमान्य टिळकांनी १९०५ मध्ये विकत घेतला होता. यात केसरी प्रेस व कार्यालय असल्यामुळे याच वाड्यातून लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सूत्रे हालविली.

पुणे विद्यापीठ : या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. ब्रिटीश काळात गव्हर्नरच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये सद्याचे पुणे विद्यापीठ कार्यरत आहे. ही इमारत १८७१ मध्ये पुर्ण झाली. या विद्यापीठाच्या परीसरात डॉ.विजय भटकर यांनी सी-डॅक या संस्थेची स्थापना करून महासंगणकाची यशस्वी निर्मिती केली. त्याचबरोबर डॉ. जयंत नारळीकर यांनी आयुका ही संस्था स्थापन करून खगोलशास्त्रावरील संशोधन येथे सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे व पाहाण्यासारखी ठिकाणे

१) भिमाशंकर (ता. आंबेगाव) : हे ठिकाण भिमा नदीचे उगमस्थान आहे. भिमाशंकर हे देवस्थान १२ ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. नाना फडणीसांनी या ठिकाणच्या शंकराच्या मंदीराचा जिर्णोद्धार केला. भिमाशंकर येथील अभयारण्यही प्रसिद्ध आहे. या अभयारण्यातील प्रसिद्ध शेकरू खार महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानला जातो.

२) आळंदी (ता.खेड) : आळंदी हे इंद्रायणी नदीकाठी वसलेले ठिकाण आहे. येथे इ. स. १२९६ साली संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी समाधी घेतली होती. संत कवी ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर व समाधी स्थळ या ठिकाणी आहे. हे मंदीर सन १५१७ मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठी भाषेमध्ये रुपांतर केले त्याला ‘ज्ञानेश्वरी’ असे म्हणतात. आषाढ महिन्यात यात्रेकरू पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर साधारणत: १५० कि.मी. अंतर चालत जातात. इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला लागून पश्चिमेस हरीहरेंद्र या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. आळंदीच्या जवळच मरकळ येथे विपश्यनेचे ध्यान केंद्र आहे.

३) देहू (ता. हवेली) : देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असून ते इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे चोखामेळ्याचे मंदिर आहे.

४) केतकावळे : येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.

५) नारायणपूर : नारायणपूर गावात संत चांगदेव व श्री दत्त महाराजांचे प्रसिद्ध मंदीर आहे. या मंदीरातील शिल्पाकृती यादव कालीन आहे. या मंदीरापासून जवळच केतकावळे येथे प्रसिद्ध बालाजी मंदीर आहे. ६) जेजुरी (ता.पुरंदर) : येथील खंडोबाचे प्राचीन मंदीर असल्यामुळे हे ठिकाण खंडोबाचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदीरातील दिपमाला प्रसिद्ध आहे. जेजुरीचा खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावस्या या दिवशी येथील यात्रेला लाखो भाविक येतात. खंडोबाची मल्हार, खंडोबा, मार्तंड-भैरव, म्हाळसापती अशी नावे आहेत. मणिमल्लासूराचा हत्या करण्यासाठी महादेवाने मार्तंड भैरवनाथाचा अवतार धारण केला होता. खंडोबाच्या ११ प्रमुख पवित्र स्थानापैकी ६ महाराष्ट्रात तर ५ स्थाने कर्नाटकात आहेत.

७) वढुबुद्रुक (ता. शिरुर) : हे गाव पुणे-नगर मार्गावर असून भिमा-कोरेगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात भिमानदीच्या काठावर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. ८) तुळापूर (ता. शिरुर) : भिमा, भामा व इंद्रायणी येणाऱ्याच्या संगमावरील असणारे हे पवित्र व ऐतिहासिक स्थान आहे. येथेच औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली.

९) सासवड : सासवड हे पुरंदर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. येथे सोपानदेव महाराजांचे समाधीस्थळ आहे. येथून जवळच ‘कोठीत’ हे आचार्य अत्रे यांचे जन्मगांव आहे.

१०) बारामती : बारामती हे कवि मोरोपंत यांच्या वास्तव्याचे ठिकाण असून त्यांचे मूळ नाव रामचंद्र पराडकर असे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे याच मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात. हे शहर कहा नदीकाठी वसले आहे.

११) मांजरी : ग्रामसेवक/ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र.

१२) लोणावळा व खंडाळा : मावळ तालुक्यातील लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिक आहेत. येथून जवळच कार्ले, भाजे, बेडसा येथे प्राचीन लेणी आहेत. तसेच आय.एन.एस. शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र याच ठिकाणी आहे. लोणावळ्यातील चिक्की देशभर प्रसिद्ध आहे. येथे ‘भूशी डॅम’ आहे. लोणावळ्यापासून जवळच खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे.

१३) आर्वी (ता.जुन्नर) : येथे ‘विक्रम’ हे उपग्रह प्रक्षेपण दळणवळण- संदेश ग्रहण केंद्र आहे. १४) खोडद (ता.जुन्नर): खोडद येथे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी मोठी दुर्बीण बसविलेली आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण आहे.

१५) पिंपरी चिंचवड : पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड ही एक स्वतंत्र महापालिका आहे. चिंचवड येथे गणेशभक्त मोरया गोसावी या सत्पुरुषाची संजिवन समाधी आहे. तसेच निगडी येथील ‘अप्पूघर’ हे करमणूकीचे केंद्र आहे.

१६) उरळीकांचन (ता.हवेली) : येथे महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे. भारतीय अॅग्रो इंडस्ट्रिज फाऊंडेशन ही संस्था येथेच आहे.

१७) राजगुरुनगर (ता.खेड) : हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. राजगुरू यांचे मूळ नाव शिवराम हरी राजगुरू असे होते.

१८) चाकण (ता.खेड) : येथे सुप्रसिद्ध भुईकोट किल्ला आहे. कांद्याची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. १९) खेडशिवापूर (ता.हवेली) : येथे कमरअली दरवेश हा सुप्रसिद्ध दर्गा आहे. हिंदू-मुस्लिमांचे हे श्रद्धास्थान आहे.

२०) बनेश्वर : येथे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेले महादेवाचे मंदिर आहे.

पुणे जिल्हा माहिती, Pune District Information in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न १. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो.

उत्तर – पहिला

प्रश्न २. पुणे जिल्ह्यात एकूण इतके किती महसूल उपविभाग आहेत.

उत्तर – ८ (आठ)

प्रश्न ३. पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना कधी झाली.

उत्तर – ११ ऑक्टोबर १९८२

प्रश्न ४. पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली.

उत्तर – १० फेब्रुवारी १९४९

प्रश्न ५. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदार संघ आहेत.

उत्तर – चार

प्रश्न ६. केंद्र सरकारचा दारुगोळा बनविण्याचा कारखाना पुणे जिल्ह्यात कुठे आहे.

उत्तर – देहुरोड

प्रश्न ७. पुणे जिल्ह्यातील ही थंड हवेची ठिकाणे कोणती आहेत.

उत्तर – लोणावळा व खंडाळा

प्रश्न ८. पुणे जिल्ह्यातील सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

उत्तर – मोर

प्रश्न ९. पुणे शहराला धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

उत्तर – खडकवासला

प्रश्न १०. शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे.

उत्तर – जुन्नर

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

This Post Has One Comment

 1. विकास हनपुडे

  नमस्कार सर, आपल्या माहिती मुळे पुणे मनपाची परीक्षा सोपी गेली. परंतु वाचन करत असताना आपल्या पिडिफ मधील एक चूक खटकली. आपण वढू बुद्रुक ठिकाणची माहिती देताना औंगजेबने छत्रपती संभाजीराजे यांची निर्घृण हत्या केली होती. परंतु आपण हत्या ऐवजी वध केला असा शब्दप्रयोग केला आहे. ते चुकीचं आहे. माझी आपणास विनंती आहे की आपणं सदर चूक त्वरीत सुधारावी.
  धन्यवाद.. !

Leave a Reply