ऐतिहासिक वास्तूंच्या सहवासात मराठी निबंध

चार दिवसांच्या सुट्टीत आम्ही पुणे शहर पाहायला आलो होतो. जन्मापासून आम्हा भावंडांचे वास्तव्य मुंबईलाच होते. पण माझी आई आणि बाबा दोघेही पुण्याचे होते. आम्ही आजवर त्यांच्याकडून पुण्याविषयी खूप ऐकले होते. त्यामुळे पुणे शहर पाहण्याची मला खूपच उत्सुकता होती. बाबाही आम्हांला मोठ्या आवडीने पुण्यातील प्रत्येक वास्तू दाखवत होते. त्या वास्तूंचा इतिहास सांगत होते.

आजची संध्याकाळ आम्ही शनिवारवाड्याच्या सहवासात घालवायची असे ठरवले होते. बाबा आम्हांला पेशव्यांचा इतिहास सांगत होते. तो ऐकून आमच्या डोळ्यांसमोर स्वामी’ कादंबरीतील वर्णन मूर्तरूप घेत होते. त्याच वेळी शनिवारवाड्याचे आजचे स्वरूप पाहून मनाला खंत वाटत होती. कारण शनिवारवाड्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार कसेबसे डागडुजी करून सावरलेले दिसत होते.

शनिवारवाड्याच्या आत तर सर्व उजाड झाले होते. केवळ तेथे लावलेल्या पाट्याच सांगत होत्या की, येथे ‘गणेश दरवाजा’ होता, येथे पेशव्यांची ‘मसनद’ होती. या वाड्याची काळजीपूर्वक जोपासना न केल्यामुळे काळाच्या ओघात ही ऐतिहासिक वास्तू पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाली आहे.

शनिवारवाड्याचा कोपरान्कोपरा पाहून आम्ही तेथेच एका पडक्या भिंतीशी टेकलो. थोरले बाजीराव, नानासाहेब, माधवराव यांच्या स्मृतीने सर्वांची मने भरून आली होती. इतक्यात ताई म्हणाली, “बाबा, दिल्लीच्या लाल किल्ल्याप्रमाणे येथे नाही का ध्वनी व प्रकाश योजनेद्वारे इतिहास साकार करता येणार? पेशव्यांचा इतिहास केवढा स्फूर्तिदायक आहे!” ताई अलीकडेच लाल किल्ल्याला भेट देऊन आली होती. बाबा म्हणाले,”एकदा केव्हातरी वर्तमानपत्रात वाचले होते की, अशा प्रकारची योजना येथेही सुरू होणार आहे. पण ती केव्हा साकार होईल कोण जाणे!”

शनिवारवाड्याच्या त्या वास्तूत भटकत असताना मला प्रकर्षाने थोर मुत्सद्दी- नाना फडणवीसांची आठवण झाली आणि मनात आले, ‘आज नाना असते तर त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची प्रगती साधली असती.’ पेशव्यांच्या त्या उज्ज्वल इतिहासात मी रमलेली असतानाच बाबांनी हाक मारली आणि माझी समाधी भंग पावली.

पुढे वाचा:

Leave a Reply