तुम्हाला पावसाळा निबंध मराठी लिहायचा आहे का? तुम्ही Pavsala Nibandh in Marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी पावसाळ्यावरील अनेक लहान आणि मोठे निबंध घेऊन आलो आहोत जे अतिशय सोप्या भाषेत लिहिले आहेत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला पावसाळ्याबद्दलचे हे निबंध आवडतील. हे निबंध तुम्ही शाळा-कॉलेज किंवा स्पर्धा इत्यादींमध्ये लिहू शकता.

पावसाळा निबंध
पावसाळा निबंध

आपला देश हा शेतीवर आधारित देश आहे, त्यामुळे पाऊस पडणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. पावसाशिवाय जीवनाची कल्पना करता येत नाही कारण पावसामुळेच आपल्याला पिण्यायोग्य अमृतसमान पाणी मिळते.

कडाक्याच्या उकाड्यानंतर मान्सूनचे आगमन झाले की सगळीकडे आनंद आणि हिरवळ असते. सर्वत्र थंड वारे वाहत आहेत, शेतात पिके हिरवीगार दिसतात, शेतकऱ्यांचे चेहरे फुलले दिसतात, मुलेही पावसाचा आणि थंड हवेचा आनंद लुटतात.

इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,10, 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये पावसाळी हंगामावर काही निबंध खाली दिले आहेत.

पावसाळा निबंध मराठी – Pavsala Nibandh in Marathi

Table of Contents

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – 10 Lines on Rainy Season in Marathi

  1. पावसाळी हंगाम जो जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत टिकतो.
  2. भारताच्या दक्षिण भागातून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या सुरुवातीपासून पावसाळा सुरू होतो.
  3. जुलै आणि ऑगस्ट हे पावसाळ्यातील सर्वात जास्त पावसाचे महिने आहेत.
  4. पावसाळी ऋतूमध्ये थंड वाऱ्याची झुळूक आणि पावसाच्या सरींनी अतिशय आल्हाददायक हवामान असते.
  5. पावसाळ्यात झाडे, झुडपे आणि गवत अतिशय हिरवेगार आणि आकर्षक दिसतात.
  6. तलाव, नद्या, नाले यांना पावसाळ्यात भरपूर पावसाचे पाणी मिळते.
  7. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे वातावरण स्वच्छ आणि टवटवीत होते.
  8. पावसाळ्यात काळे ढग आणि विजा खूप सामान्य असतात.
  9. पावसाळी हंगाम पिकांच्या चांगल्या लागवडीसाठी आवश्यक पावसाचे पाणी पुरवून शेतकऱ्यांना मदत करतो.
  10. पावसाळ्यात आपल्याला वनस्पती आणि झाडांपासून विविध प्रकारची फळे, फुले आणि भाज्या मिळतात.
पावसाळा निबंध मराठी 10 ओळी-10 Lines on Rainy Season in Marathi
पावसाळा निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines on Rainy Season in Marathi

पावसाळा निबंध मराठी 100 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 100 Words

उन्हाळ्यात खूप ऊष्मा असतो. खूप घाम येतो. पावसाळ्यात पावसामुळे गारवा येतो. मनाला आल्हाद मिळतो. म्हणून मला पावसाळा आवडतो.

पावसाळ्यात पाऊस कधी रिमझिम करत पडतो; तर कधी तो धो-धो कोसळतो. सगळीकडे पाणीच पाणी होते. नदी-नाले भरून वाहतात. विहिरी-तलाव भरून जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते. शेत पिकांनी भरून जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळी सृष्टी जणू आनंदाने हसत असते.

आम्ही मित्र पावसात खूप भिजतो; खूप खेळतो. पावसाळा आला की, बेडकांचा डराँव डराँव आवाज घुमू लागतो. पावसाळ्यातील संध्याकाळ रंगीबेरंगी असते. आकाशातील ढग अनेक रंगांनी सजतात. कधी कधी इंद्रधनुष्य दिसते. असा आनंद देणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही!

पावसाळा निबंध मराठी
पावसाळा निबंध मराठी

पावसाळा निबंध मराठी 110 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 120 Words

येरे येरे पावसा… असे गाणे आठवले की आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्याकडे तीन ऋतु आहेत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा.

उन्हाळ्यातील ऊन म्हटले की शरीर घामाने ओलेचिंब होते आणि हिवाळ्यातील थंडीने तर हातपाय गारठलेले असतात. पण पावसाळा म्हटले की कशी गंमत येते.

जून म्हणजे शाळेच्या नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यातच मृग नक्षत्र म्हटले की पहिल्या पावसाने सुटलेला तो मातीचा सुगंध. वा ! काय छान ! पावसाळ्यात नद्या-नाल्यांना पाणीच पाणी असते. लहान मुले तर कागदी होड्या सोडतात. पावसात बागडतात आणि भिजून ओलेचिंब होतात. पण तीच त्यांची खरी मजा असते.

पावसात कधी कधी ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट यामुळे भीतीही वाटते. पण आकाशातील इंद्रधनुष्य पाहून ती भीती पळूनच जाते. आणि म्हणूनच मला पावसाळा हा ऋतू आवडतो.

Pavsala Nibandh in Marathi
Pavsala Nibandh in Marathi

शहरातील पावसाळा निबंध 120 शब्द – Shaharatil Pavsala Nibandh 125 Words

पावसाळा सुरू झाला की, आम्ही मित्र खूप खूश होतो. पहिल्या पावसात आम्ही भरपूर भिजतो; नाचतो; उड्या मारतो. पावसाळ्यात वातावरण प्रसन्न असते. रस्ते स्वच्छ काळे कुळकुळीत दिसतात. सर्व इमारती स्नान केल्याप्रमाणे स्वच्छ होतात. झाडे हिरवीगार दिसू लागतात. तडतड आवाज करीत पाऊस रस्त्यांवर, घरांवर कोसळतो. पडणाऱ्या थेंबांतून अनेक तुषार उसळतात. रस्त्यावर असंख्य कारंजीच निर्माण होतात.

घरांवरून, रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागतात. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाण्याचे जोरदार फवारे उडवतात. त्या वेळी गाड्यांना जणू पंखच फुटले आहेत, असे वाटते. सगळीकडे रंगीबेरंगी छत्र्यांची गर्दी उसळते. इकडून तिकडे छत्र्याच चालत आहेत, असे वाटू लागते.

कधी कधी मात्र पाऊस खूपच कोसळतो. रस्ते तुंबतात. गाड्या अडकून पडतात, झोपड्यांमध्ये पाणी घुसते. वेगवेगळ्या रोगांच्या साथी पसरतात. लोकांचे खूप हाल होतात. एवढे सोडले, तर पावसाळा खूप आनंददायक असतो.

माझा आवडता ऋतू पावसाळा
माझा आवडता ऋतू पावसाळा

खेड्यातील पाऊस निबंध 125 शब्द – Khedyatil Paus Marathi Nibandh 130 Words

मला आमच्या गावचा पाऊस खूप आवडतो. पहिला पाऊस आला की, आम्ही मित्र रानात धावत सुटतो. भिजत भिजत डोंगरभर हिंडतो. पावसाचा गार गार स्पर्श होतो. मन आनंदित होते.

पावसाची सुरुवात झाली की, शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. शेत नांगरून शेतकरी लगबगीने पेरणी करतात. पावसाळ्यात सर्वत्र वातावरण आल्हाददायक असते. वृक्षवेली हिरवीगार, टवटवीत दिसू लागतात. नदयानाले भरून वाहतात. डोंगरावरून अनेक शुभ्र धबधबे कोसळत असतात. झाडाच्या सळसळणाऱ्या पानांचा व वाहणाऱ्या पाण्याचा आवाजच सर्वत्र भरून असतो. डोंगरावरून, दरीतून खूप खूप हिंडतच राहावे, असे वाटते.

पावसाळ्यात आम्हां मित्रांचा एक आवडता कार्यक्रम असतो, तो म्हणजे नदीत पोहणे आणि मासे पकडणे.

कधी कधी मात्र आभाळ भरून येते. भरदिवसा संपूर्ण काळोख होतो. सोसाट्याचा वारा सुटतो. धुवाधार पाऊस कोसळतो. जवळचेही दिसेनासे होते. डोंगरांवरून, घरांवरून, आजूबाजूने पाण्याचे लोट वाहतात,नदीला पूर येतो. अशा वेळी शाळेला सुट्टी मिळते. मग पावसात भिजण्याचा आणखी आनंद मिळतो.

पावसाळा निबंध मराठी 130 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 130 Words

पाऊस मला खूप आवडतो. तो आपल्याकडे फक्त चार महिन्यांकरिता पाहुणा म्हणून येतो. तेवढ्या काळातही त्याचा लहरीपणा अनुभवावा लागतो. कधी तो शहाण्या मुलासारखा अगदी वेळेवर येतो, तर कधी सर्वांना खूप वाट पाहावयास लावतो! कधी तो जरासे तोंड दाखवतो आणि लगेच आपले तोंड काळे करतो! अशा वेळी सर्वांच्या तोंडचे पाणी पळते!

या पावसाची रूपे तरी किती विविध! ते सर्व त्याचे नखरे असतात. कधी तो मुसळधार कोसळतो; या भूमातेला थंडगार करतो आणि मग गायब होतो. तर कधी हा दिवसरात्र रिमझिम पडत राहतो. कधी हा एवढा चेकाळतो की, धुवाधार कोसळतच राहतो आणि सर्वांना सळो की पळो करतो!

असे असले, तरी हा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो. कारण तो सर्वांना जीवन देतो. पाऊस पडतो म्हणून नदया, विहिरी, झरे यांना पाणी येते. शेते पिकतात. झाडे, फळे, फुले यांना बहर येतो आणि सर्वांच्या जगण्यात चैतन्य येते.

पावसाळा निबंध मराठी 140 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 150 Words

पावसाळा माझा खूप आवडता ऋतू आहे. भर उन्हाळ्यात जग तापून निघते, सूर्याच्या आगीने जमिनीला भेगा पडतात. तेव्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते. तेच पाणी मोसमी वा-यांसोबत जमिनीवर पुन्हा येते. अशा त-हेने पावसाळा सुरू होतो.

पावसाळा सुरू झाला की सगळे चराचर खूप टवटवीत दिसू लागते. सगळीकडे हिरवेगार होते, झाडांना पालवी फुटते तेव्हा हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात.

पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेत नांगरतो, त्यात बी पेरतो.थोडे दिवसांनी शेतात कणसे डोलू लागतात.

आम्हा मुलांना पावसाळा खूप आवडतो कारण पाऊस खूप पडला की आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. मग आम्ही गच्चीवर जाऊन पावसात खूप नाचतो. तसे नाचलो की आई ओरडते आणि ताप येईल असे म्हणते. पण तरी आम्हाला पावसात मज्जा येते. आम्ही वाहात्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतो.

पावसाळ्यात खूप पाऊस पडला की आगगाड्या बंद पडतात. मग बाबा आणि आई कामावर जात नाहीत. आई मस्तपैकी चहा आणि भजी करते.

असा हा पावसाळा मला खूप म्हणजे खूपच आवडतो.

पावसाळा निबंध मराठी 150 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 150 Words

उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. जून महिन्याची चाहूल लागताच आकाशात ढग जमा व्हायला सुरूवात होते. मृगाचा पाऊस म्हणजे पावसाळ्याची सुरूवात. भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. हा पाऊस म्हणजे भारताला वरदान ठरलेला आहे.

पावसाळ्याच्या सुरूवातीला शेतकऱ्यांची पेरणीच्या कामाची खूप धांदल उडते. पावसाची योग्य वेळी सुरूवात झाली की बळीराजा सुखावतो. पेरणीनंतर आंतरमशागतीच्या कामाला लागतो. उन्हाळ्यात उघडे -बोडके झालेले डोंगर पावसाळ्यात हिरवेगार होतात. सारी सृष्टीच खुलून जाते. कवीला कविता सुचतात.

‘नवी लकाकी झाडांवरती, सुखात पाने फुले नाहती
पाऊसधारा झेलित जाती भिरभिरती पाखरे
जिकडे तिकडे पाणीच, पाणी खळखळणारे झरे….’

असे निसर्गरम्य दृश्य पावसाळ्यात पाहायला मिळते. लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. सर्दी-पडसे याचा विचार न करता ती पावसात न्हाऊन जातात. भिजून चिंब होतात. आईने परवानगी दिली नाही तर ‘ए आई मला पावसात जाऊ दे, भिजूनिया ग चिंबचिंब होऊ दे’ असा लडिवाळपणे हट्ट धरतात आणि शेवटी परवानगी मिळवतात.

पावसाळा हा साथींचा ऋतू. सगळीकडे गढूळ पाण्याचे साम्राज्य. त्यामुळे पाण्यातून होणाऱ्या अनेक साथीच्या रोगांपासून आपण सावध असणे नेहमीच चांगले.

वर्षा ऋतू पावसाळा निबंध मराठी 200 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 200 Words

जगात सर्वात जास्त ऋतूंची बहार भारतात पाहावयास मिळते. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत हे ऋतू दोन दोन महिन्यांनी येतात. ऋतूंचे परिवर्तन जीवनासाठी आवश्यक असते. त्याखेरीज जीवन नीरस होईल. हा प्रत्येक ऋतू पृथ्वीला एक अमूल्य उपहार देऊन जातो. जुलै ते सप्टेंबर हे वर्षाऋतूचे महिने असतात. ग्रीष्मातील प्रखर उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते व हीच वाफ थंड झाल्यावर पाऊस पडतो. पावसाळा हा अतिशय महत्त्वाचा ऋतू आहे.

भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी आकाशाकडे नजर लावून पावसाची वाट पाहत बसतो. पाऊस पडताच पिके तरारून उठतात. घाण वाहून जाते. फुलझाडांना बहर येतो. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. नदी नाल्यांना पूर येतो. हेच पाणी मग वर्षभर सिंचनाच्या कामी येते. पाण्याचा साठा जास्त असल्यास जलविद्युत निर्मिती करता येते. पावसात भिजून लहान मोठे सारेच प्रसन्न होतात. लोक बाहेर जाताना पावसाळी कपडे, छत्री, वापरतात. परंतु पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई वाढलेली दिसते.

वर्षा ऋतूत हत्ती मस्त होतात. मोर पिसारा फुलवून नर्तन करतात. शेतात, तलावांत बेडूक डराँव डराँव करतात, आकाशात दिसणारे विविध रंग पाहून आपण आनंदित होतो. वर्षा ऋतूतील आल्हादायक वातावरणामुळे लेखक कवींची उर्मी जागृत होते. कलावंतांना कलानिर्मितीची प्रेरणा मिळते. पाऊस पडला नाही तर सर्वत्र हा हा:कार माजेल, दुष्काळ पडेल. शेती पिकणार नाही व भाज्या, धान्य मिळणार नाही, जीवनच धोक्यात येईल. म्हणून वर्षाऋतूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पावसाळा निबंध मराठी 230 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 250 Words

‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा’

मे महिन्याचा उन्हाचा ताप कधी संपतो, नि गारगार करणारा पावसाळा कधी सुरु होतो याची सर्वजण वाट पाहत असतात. उन्हाने हैराण झालेले पशु, पक्षी, माणसे, मुले, पावसाने तृप्त होतात. म्हणून मुलेही पावसात आनंदाने नाचू लागतात. शाळेची सुरुवात, नवा वर्ग, नवे मित्र यांचे स्वागतदेखील पावसाच्या सुखद शिडकाव्यांनीच होते.

अचानक एके दिवशी पावसाचे थेंब टपकू लागतात आणि सर्वांच्या तोंडून आनंदोद्गार बाहेर पडतात आला, पाऊस आला ! आणि या पावसाचे स्वागत करण्यासाठी लहानथोर सर्वच जण पावसात चिंब भिजतात. जणू काही वर्षाराणीचे आगमन म्हणजे सुखाची पर्वणीच असते. ओकेबोके डोंगरही हिरवा साज चढवितात. रस्त्यावर निरनिराळ्या छत्र्यांची गर्दी दिसू लागते. शेते खूप महिन्यांनी तहान भागवित तृप्त होतात.

खूप पाऊस आला की शाळेला सुट्टी असते. आई गरमगरम वडे तळते. सर्व रस्ते, मैदाने, पाण्याने भरुन जातात. नद्यानाले तुडूंब भरुन वाहू लागतात. अंगणातील तळ्यात मुले कागदी नावा सोडतात, बेडूक डरावऽऽ डरावऽऽ करतात.

पावसाळ्यात मातीचा सुगंध मनाला मोहवतो. झाडांची पाने टवटवीत दिसू लागतात. सारे वातावरण ताजे टवटवीत होते. सर्व तरुण मुले धबधब्यांच्या खाली मनसोकत डुंबून घेतात. सहलींना उधाण येते. आकाशात वीजांचा कडकडाट झाला की लहान बाळे आईला पकडून बसतात. पावसाळ्यात मैदाने हिरव्यागार मऊ शालींचे पांघरुण घेतल्या प्रमाणे दिसतात. जसे काही नववधू आपल्या हरितशालूने सजली आहे. आणि नवा साज पांघरुन बसली आहे.

श्रावणात तरी ऊनपाऊस लपंडाव खेळत असतात. ‘आला पाऊस गेला पाऊस मुले लागली नाचू’. पावसाळ्यात सर्वजण रेनकोट, छत्र्या, गमबूट या वेशात निराळेच दिसतात. पाऊस गरीब-श्रीमंताना सारखाचा आनंद देतो. शेतकरी, कामकरी यांना तो वरदानच वाटतो.

पावसाळा निबंध मराठी 250 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 250 Words

आमचे आजोबा मला त्यांच्या लहानपणची एक कविता म्हणून दाखवतात. त्या कवितेची सुरूवात अशी आहे—- ‘ नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक तू जाण बाळा.’

खरोखर, दर वर्षी पाऊस पडतो म्हणजे पडतोच. कधी तो जास्त पडतो तर कधी तो कमी पडतो. परंतु पडल्याशिवाय मात्र राहात नाही. त्यामुळेच एखाद्या माणसाचे वय सांगताना त्याने पन्नास पावसाळे पाहिले आहेत, साठ पावसाळे पाहिले आहेत असे म्हणण्याची पद्धत आहे.

आपला देश हा मौसमी हवामानाचा प्रदेश असल्याने येथे ठराविक मोसमातच म्हणजे जून ते सप्टेंबर ह्या काळात पाऊस पडतो. म्हणून आपल्याकडे पावसाळा हा वेगळा ऋतू मानण्याची पद्धत पडली आहे. जगातील अन्य देशात तसे नसते.

नैऋत्येकडून आणि ईशान्येकडून येणारे मौसमी वारे भारतात पाऊस आणतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. चार महिन्यांच्या काळात पडलेल्या पावसामुळे जे पाणी मिळते ते पुढे पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरता येते.

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. म्हणूनच तर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतात. पाऊस पडताच पिके जोमाने उगवू लागतात, झाडाफुलांना बहर येतो, वारा सगळीकडे फुलांचा सुगंध वाहून नेतो. नदीनाल्यांनाही ह्याच काळात पूर येतो. पाणी अडवून साठवलेल्या जलाशयात जलविद्यूत निर्माण करता येते. पावसात भिजल्यामुळे सगळ्यांची मने प्रफुल्लित होतात. लोक बाहेर जाताना रेनकोट किंवा छत्री नेतात. परंतु हल्ली पावसाळ्यात रोगराईसुद्धा वाढलेली दिसते.

पावसाळ्यात मातीच्या गंधाने मन उत्फुल्ल होते. मोर नाचू लागतात. निसर्गाच्या ह्या सुंदर रूपामुळे लेखक आणि कवींना स्फुर्ती मिळते. कलावंतांना नव्या कलेची प्रेरणा मिळते.

पाऊस पडला नाही तर सगळीकडे मोठा हाहाःकार माजेल. दुष्काळ पडला तर शेती पिकणार नाही, भाज्या आणि धान्य न मिळाल्यामुळे लोकांची उपासमार होईल.

एकुणच काय तर पावसाळा नेमेचि येतो मग पावसाळा हे वाक्य किती खरे आहे? नेमाने आलाच पाहिजे तो.

पावसाळा निबंध मराठी 300 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 300 Words

जगात सर्वात जास्त ऋतूंची बहार भारतात पाहावयास मिळते. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत हे ऋतू दोन दोन महिन्यांनी येतात. ऋतूंचे परिवर्तन जीवनासाठी आवश्यक असते. त्याखेरीज जीवन नीरस होईल. हा प्रत्येक ऋतू पृथ्वीला एक अमूल्य उपहार देऊन जातो.

जुलै ते सप्टेंबर हे वर्षाऋतूचे महिने असतात. ग्रीष्मातील प्रखर उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. इंद्र देवतेमुळे पाऊस पडतो. इंद्र ही पावसाची देवता मानली जाते. भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी आकाशकडे नजर लावून पावसाची वाट पाहत बसतो.

पाऊस पडताच पिके तरारून उठतात. घाण वाहून जाते. फुलझाडांना बहर येतो. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. नदी नाल्यांना पूर येतो. हेच पाणी मग वर्षभर सिंचनाच्या कामी येते. पाण्याचा साठा जास्त असल्यास जलविद्युत निर्मिती करता येते. पावसात भिजून लहान मोठे सारेच प्रसन्न होतात. लोक बाहेर जाताना पावसाळी कपड़े, छत्री, वापरतात. परंतु पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई वाढलेली दिसते.

चातक पक्षी तर केवळ पावसाच्या थेंबावरच जगत असतो. या दिवसांत सणांची, भाजीपाल्यांची रेलचेल असते. नागपंचमीला स्त्रिया नागाची पूजा करतात आणि झोके खेळतात.

वर्षा ऋतूत हत्ती मस्त होतात. मोर पिसारा फुलवून नर्तन करतात. शेतात तलावात बेडूक डराँव डराँव करतात, आकाशात दिसणारे विविध रंग पाहून आपण भावविभोर होतो. कालिदासाच्या मेघदूत’ या संस्कृत नाटकातील यक्ष प्रियकराचा संदेश मेघच त्याच्या प्रेयसीकडे घेऊन जातो असे वर्णन आले आहे. मेघांना पाहून तो प्रियकर इतका विरह व्याकुळ होतो की त्याला जड आणि चेतन यातील फरकच समजत नाही.

वर्षा ऋतू मरुस्थळाला पल्लवीत करतो. त्याचबरोबर अति पावसामुळे मोठे पूर येतात. अस्वच्छता, रोगराई पसरते. पुरामुळे प्राणहानी व वित्तहानीही होते.

वर्षा ऋतूतील आल्हादायक वातावरणामुळे लेखक कवींची लेखनोर्मी जागृत होते. कलावंतांना कलानिर्मितीची प्रेरणा मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याला पाहून बालकवी म्हणतात.

“वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे।
मंगल तोरण काय बांघिले नभोमंडपी कुणी भासे॥

पाऊस पडला नाही तर सर्वत्र हा हा:कार माजेल. दुष्काळ पडेल. जीवनच धोक्यात येईल म्हणून वर्षाऋतूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 500 शब्द – Pavsala Nibandh in Marathi 500 Words

उन्हाळ्याच्या त्रासाने धरती त्रासून गेली होती. जमिनीला भेगा पडल्या होत्या. विहिरी, तळे आटली होती. नदीला कुठे कुठे थोडेसे पाणी दिसत होते. पाण्यासाठी दूरवर वणवण हिंडावे लागत होते. गुरांना चाऱ्यापाण्याविणा अवकळा आली होती. सगळ्यांच्या मनात एक विचार कधी संपणार हा उन्हाळा! सगळ्यांची नजर आकाशाकडे, कधी येणार गडद निळे जलद आणि सगळ्यांना एकच प्रतीक्षा.. वरुणराजाच्या आगमनाची !

मानवी जीवनात सुखदुःखाचा लपंडाव चालतो. तसाच निसर्गातही. निसर्गाचे ऋतुचक्र फिरत असते. कधी घामाच्या धारांनी नाकीनऊ आणणारा उन्हाळा, कधी चिंब भिजवून तृप्त करणारा पावसाळा आणि बोचऱ्या थंडीचा हिवाळा… पुनः .. पुन्हा हे ऋतुचक्र चालू आहे म्हणून मानवी जीवनाचा प्रवास सुखरूप सुरू आहे.

आषाढ महिन्यात मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पावसाचे, वर्षाऋतूचे, माझ्या आवडत्या ऋतूचे आगमन होते. तप्त धरणी तृप्त होते. वैराण शेते हिच्या वर्षावाने हिरवीगार होऊन डोलू लागतात. एखाद्या नववधूप्रमाणे वसुमती ऋतुमती होते. तेजाने बहरते. हिरवे वैभव दिमाखात मिरवू लागते. मन बेभान होऊन नाचू लागते. मातीचा मृद्गंध मनाचा गाभारा भरून टाकतो अन् समाधानाने डोळे भरून येतात.

होय, सगळ्यांचा जीवनदाता आनंददाता हा पावसाळा. हाच माझा आवडता ऋतू आहे! त्याच्या येण्याने सारेच आनंदित होतात.

पावसाच्या धारा येती झराझरा, झाकोळले नभ सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ
पावसाच्या धारा डोईवरी मारा, झाडाचिया तळी गुरे शोधीती निवारा

अशी अनेक दृश्ये पाऊस सुरू झाला की दिसू लागतात. पावसाळा सुरू झाला की सारेच वातावरण बदलून जाते. धरित्री नवस्नान केल्याप्रमाणे ताजीतवानी दिसते. नद्या दुथडी भरून वाहू लागतात. सारी राने हिरवी दिसू लागतात. गवताच्या हिरव्या लाटा वाऱ्यावर डोल डोल डोलतात. रंगीबेरंगी फुलांचा त्यावरील गालिचा मन मोहून टाकतो. चराचर चैतन्याने न्हाऊन निघते.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे साऱ्यांच्या मुखी अन्नाचा घास भरविणाऱ्या या पावसाने कोण आनंद होतो? अन्नब्रह्माच्या पूजेसाठी तो वरुणराजाची प्रार्थनाच करत असतो कारण त्याच्या कृपेनेच शेते पिकणार, धान्य तयार होणार, तेव्हा शेतकऱ्याचा हा आवडता वर्षा ऋतू… धरतीमातेला तृप्त करून हिरव्या अंकुरांना प्रेरणा देणारा, मला फार फार आवडतो.

चातक पक्षी तर या पावसाच्या थेंबासाठी किती आतुरलेला असतो. वर्षाराणीच्या आगमनानं आनंदित, प्रफुल्लित होणारा मोर तर पिसारा फुलवून आपली कृतज्ञता व्यक्त करतो.

श्रावणमासी हर्ष मानसी। हिरवळ दाटे चोहीकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे । क्षणात फिरुनी ऊन पडे।

बालकवींनी किती यथार्थ वर्णन केले आहे या पावसाळ्याचे. सर्वत्र उसळता उत्साह व चैतन्य! डोंगरावरून चांदीच्या राशी ओघळत असतात. गावाबाहेरची माळरानं पाचूचं वैभव मिरवत असतात. या ऋतूत रंग, रूप, गंध यांची सुरेख आरास पहावयास मिळते.

अर्थात माझा हा आवडता ऋतू लहरीसुद्धा आहे बरं! कधी कधी तो इतका पडतो की तोंडचे पाणी पळते. शेत नांगरून बियाणं पेरण्याच्या मेहनतीवर पाणी पडतं. नद्या सीमा पार करून वाहू लागतात. तीरावर रहाणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. कधी रोगांच्या साथीलाही हा आमंत्रण देऊन येतो.. अन् कधी कधी तो अजिबात पडत नाही.

पण सुखाबरोबर दुःख असणार. सृष्टीला सौंदर्याचं वैभव बहाल करणारा, निसर्गातील वातावरण एकदम यक्षिणीच्या कांडीप्रमाणे बदलून टाकणारा हा ऋतू मला आवडतो तो मनसोक्त भिजण्यासाठी. छत्री नको, रेनकोट नको. आईबाबांचा ओरडा खाऊनही पावसात भिजण्याची गंमत काही औरच !

आकाशातील मेघांचा गडगडाट, सौदामिनीचे नृत्य आणि धरतीवरच्या लहान, वृद्धांच्या आशा पल्लवित करणारा पावसाळा साहित्यिकांच्या प्रतिभेतूनही सुटला नाही,

“गडद निळे, गडद निळे जलद भरूनी आले
आला पाऊस मातीच्या वासात गं”
‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे ‘

अशा कितीतरी काव्यपंक्ती या ऋतूचा आनंद सांगत आपल्या ओठावर मिरवत असतात. आहे ना माझा आवडता ऋतू छान ?

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी, Pavsala Nibandh in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न 1 – पावसाळी हंगाम का महत्त्वाचा आहे?

उत्तर – पावसामुळे हवामान आल्हाददायक होते, पिकांना सिंचनासाठी मदत होते, वाळलेल्या नदीच्या पाण्याचे तलाव आणि पावसाच्या पाण्यावर आधारित नद्या भरतात.

प्रश्न 2 – पावसाळा कधी येतो?

उत्तर – पावसाळा जून-जुलै महिन्यात येतो.

प्रश्न 3 – पावसाळ्यात कोणती पिके पेरली जातात?

उत्तर – तूर, भात, मका, भुईमूग, सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी पावसाळ्यात केली जाते.

प्रश्न 4 – पावसाळ्यात पेरलेल्या पिकांना काय म्हणतात?

उत्तर – पावसाळ्यात पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply