Set 1: स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi
Table of Contents
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
१९४७ पूर्वी इंग्रजांनी भारताला गुलाम केले होते. त्यांनी भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. त्यांविरुद्ध मोठमोठ्या देशभक्तांनी बंड केले. त्यांनी चळवळी केल्या; सत्याग्रह केले. त्यामुळे कित्येकांना फासावर लटकावले गेले. या सगळ्यांच्या त्यागामुळे आपला देश स्वतंत्र झाला.
आम्ही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करतो. आम्ही गणवेशात शाळेत जातो. झेंडावंदन करतो. देशाचे रक्षण करण्याची शपथ घेतो. त्या दिवशी आम्ही देशभक्तिपर कार्यक्रम सादर करतो.
स्वातंत्र्यदिनी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. घरोघरी राष्ट्रध्वज उभारतात. सगळेजण राष्ट्रध्वजाचे बिल्ले छातीवर लावतात. आम्ही अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करतो.
Set 2: भारताचा स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi
दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली.
या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला. अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते.
दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते. अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात.
मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो.
Set 3: स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Essay on Independence Day in Marathi
आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत दीडशे वर्षे खितपत पडला a होता. त्या गुलामगिरीतून आपली सुटका १५ ऑगस्ट, १९४७ रोजी झाली. ब्रिटिश इथून निघून गेले. युनियन जॅक खाली उतरला आणि त्या जागी तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखाने वा-यावर लहरू लागला. देशाची जबाबदारी पंतप्रधान ह्या नात्याने पंडित नेहरू ह्यांच्या हाती सोपवण्यात आली तर राष्ट्रपतीपद डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना दिले गेले.
दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंनी त्या दिवशी जे ऐतिहासिक भाषण केले ते कित्येक लोकांनी रेडियोवरून ऐकले. त्या काळात ब-याच लोकांपाशी रेडियोही नव्हता. त्यांना दुस-या दिवशी आलेल्या वर्तमानपत्रातून सगळी बातमी समजली. त्यानंतर आजतागायत दर वर्षी हा दिवस राष्ट्रीय पातळीवर उत्साहाने साजरा केला जातो.
मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर होतो. त्या दिवशी पंतप्रधानांना तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख सलामी देतात. त्यांनी तिरंगा फडकवला की ध्वजाच्या सन्मानार्थ २१ तोफांची सलामी दिली जाते. मग राष्ट्राला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण होते. ह्या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींसोबत परदेशी पाहुणेही हजर असतात. भाषण संपल्यावर राष्ट्रगीत होऊन नंतर समारंभ संपतो.
ह्या दिवशी संपूर्ण देशभर सुट्टी असते. रात्रीच्या वेळेस सरकारी इमारतीवर विजेची रोषणाई केली जाते ती खास बघण्यासारखी असते.सर्व राज्यात आणि गावांत ध्वजारोहण सोहळा होतो.
आमच्या शाळेला ह्या दिवशी सुट्टी असली तरी आम्ही सर्वजण ध्वजवंदन करण्यासाठी शाळेत हजर राहातो. आमचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षिका त्या दिवशी पांढ-या कपड्यांमध्ये येतात. ध्वजवंदन झाले की आम्ही देशभक्तीपर गाणी कोरसमध्ये म्हणतो आणि नंतर घरी जातो.
स्वातंत्र्यदिनाचे महत्व खूप आहे कारण ह्या दिवशी आपण स्वतंत्र झालो. भूतकाळात झालेल्या चुका ह्यापुढे आपण करता कामा नयेत. स्वतंत्र भारताला प्रगतीपथावर नेले पाहिजे, येथील सर्व नागरिक सुखासमाधानाने नांदले पाहिजेत. एकजूटीने संकटांना सामोरे गेले पाहिजे ह्याची आठवण स्वातंत्र्यदिनच आपल्याला करून देतो.
Set 4: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Swatantra Din Nibandh Marathi
इंग्रजांचे राज्य आपल्या देशावर १५० वर्षे होते. त्याविरूद्ध आपण स्वातंत्र्याचा लढा लढला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हाल अपेष्टा सोसल्या. शेवटी १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद खूपच झाला परंतु त्याच सोबत देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले ह्याचे दुःखही झाले.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे होते. सध्या नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वांना सुट्टी असली तरी आम्ही मुले आणि आमचे शिक्षक झेंडावंदन करण्यासाठी आणि राष्ट्रगीत म्हणण्यासाठी शाळेत जातो. तिथे आम्ही देशाचे उत्तम नागरिक बनण्याची आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची शपथ घेतो.
इंग्रज तर निघून गेले परंतु आता आपला लढा आहे भ्रष्टाचाराशी, काळ्या बाजाराशी आणि देशाचे तुकडे करू इच्छिणाया घरातल्याच शत्रूशी ! कारण मिळालेले स्वातंत्र्य टिकवणे आणि देशातील सर्वांचीच प्रगती घडवून आणणे हे उद्दीष्ट कायमच राहाणार आहे. आम्ही मुले असे वचन देतो की ते उद्दीष्ट आम्ही निभावणार आहोत.
Set 4: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी – 15 August Essay in Marathi
भारत देश दीडशे वर्षे पारतंत्र्यात होता. दीडशे वर्षांच्या या काळात इंग्रजांनी भारतीयांचे खूप शोषण केले. या पारतंत्र्यातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक नेत्यांनी रात्रंदिवस कष्ट सोसले, तुरुंगवास भोगला. भगतसिंगासारखे वीर हसतहसत फासावर चढले. त्यांच्या त्यागातून, बलिदानातून आणि परिश्रमातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराला, कंटाळून १८५७ साली इंग्रजांविरुद्ध पहिले बंड झाले; पण हे बंड यशस्वी झाले नाही. इंग्रजांचा जुलूम आणि आर्थिक शोषण वाढतच राहिले. त्यांच्या जुलमाला कंटाळून अनेक क्रांतिकारी लोक संघटित झाले. गांधीजींच्या अहिंसावादी विचारसरणीतून सविनय कायदेभंग करण्यात आला. ८ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने भारत छोडो चा नारा दिला. गांधीजींच्या अहिंसात्मक लढ्याला अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली यश आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाहून अधिक काळ लोटला. आपण स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांचे पोवाडे गातो, त्यांच्या त्यागाची महती सांगतो; पण स्वातंत्र्याचा हा अमूल्य ठेवा चिरकाल टिकण्यासाठी भारतमातेची पूजा करायला नको का? केवळ पूर्वजांचे पोवाडे गाण्यापेक्षा स्वत: देशासाठी काहीतरी त्याग केला पाहिजे आज .
Set 5: 75 वा स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Essay in Marathi
‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उँचा रहे हमारा’ या ओळीतून व्यक्त केली आहे.
भारताचा तिरंगा सतत उंच राहो ही भावना परंतु १५० वर्षे विविध परकीय सत्तांच्या ताब्यात आमचा भारत देश होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. शिरीषकुमार, बाबू गेनू यासारख्यांनीच नव्हे तर ८० वर्षांच्या लाला लजपतराय यांनी, स्त्रियांनी स्वातंत्र्य लढा लढविला आणि शेवटी रूभारत छोडो आंदोलन, ‘चलेजाव’ सारख्या घोषणांनी इंग्रजांना भारतातून जावे लागले. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण भारतात मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. सर्व धर्मांचे, जातीचे लोक, लहानांपासून वृद्धांपर्यंत, गरीब-श्रीमंत सर्वजण हा दिवस साजरा करतात. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते. सर्व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजमध्येही ध्वजारोहण होते. राष्ट्रगीत म्हटले जाते. भाषणेही होतात. अशा प्रकारे १५ ऑगस्ट १९४७ ही दिन ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करतात.
Set 6: स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी – Independence Day Essay in Marathi
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत पारतंत्र्याच्या अंधारातून निघून स्वातंत्र्याच्या प्रकाशात आला. दिडशे वर्षांची गुलामी संपली. ब्रिटिश या देशातुन निघून गेले. देशाची प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे चालविण्यासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना नियुक्त करण्यात आले. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट राष्ट्रीय पर्वाच्या रूपात साजरा केला जातो. मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.
पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंग फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा ‘जयहिंद’च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो.
१५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे वर्णन रेडिओ/दूरदर्शनवर सांगितले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते.
आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू.
Set 7: माझ्या शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम निबंध – असा साजरा केला आम्ही स्वातंत्र्यदिन!
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक वर्तकगुरुजी म्हणाले की, ” उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!”
१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.
आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे ‘सर’ होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता, हे सरांनी आम्हांला सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडून स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.
नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.
Set 8: राष्ट्रध्वजाचे महत्व निबंध मराठी
स्वतंत्र असलेल्या प्रत्येक राष्ट्राला त्याचा राष्ट्रध्वज असतो. हा राष्ट्रध्वज म्हणजे त्या राष्ट्राच्या गौरवाचे, सन्मानाचे आणि अस्मितेचे जणू प्रतिकच असतो. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि आमच्या देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकू लागला. त्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी ध्वजारोहण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतिक असलेला हा ध्वज फडकत आहे.
आपला राष्ट्रध्वज केशरी, पांढरा आणि हिरवा ह्या तीन रंगांचा बनला आहे. ह्या झेंड्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.
ह्या तिन्ही रंगांना विशेष अर्थ आहे. केशरी रंग हा जोश आणि शौर्य ह्यांचे प्रतिक आहे आणि पांढरा रंग हा पावित्र्य आणि मांगल्य ह्यांचे प्रतिक आहे. हिरवा रंग वैभव आणि समृद्धी ह्यांचे प्रतिक आहे.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन ह्या दोन दिवशी समारंभपूर्वक ध्वजवंदन केले जाते. दोन्ही दिवशी ध्वजाला २१ तोफांची सलामी दिली जाते. सैन्याच्या पलटणी ध्वजाला अभिवादन करतात. सर्व राज्यात तेथील मुख्यमंत्री किंवा राज्यपाल ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तर नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते. त्यावेळेस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. तसेच पंतप्रधानांचे भाषणही तेव्हा होते.
आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला तिरंगा सदा सर्व काळ अगदी अनंत काळपर्यंत असाच फडकत राहो अशी प्रार्थनाही केली जाते. खरोखर, आपण आपल्या ध्वजाचे रक्षण प्राणपणाने केले पाहिजे.
ध्वज कधी, कुणी आणि कसा लावावा ह्याचे काही नियम आहेत. ते नियम जर मोडले तर शिक्षा होऊ शकते. पूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस फेरीवाले कागदाचे राष्ट्रध्वज किंवा बिल्ले विकत असत. तो दिवस संपला की हे सगळे कागदी ध्वज कच-यात जमा झालेले दिसत. आपल्या राष्ट्रध्वजाचा हा अपमान आहे.तो कदापी चालू देता कामा नये.
असा आहे राष्ट्रध्वजाचा महिमा.हमी निबंधात बक्षिस मिळते म्हणून मी ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहातो.
प्रश्न 1: भारत स्वतंत्र कधी झाला?
उत्तर: 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.
प्रश्न 2: भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली?
उत्तर: देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली असून, भारत 2023 वर्षी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
पुढे वाचा:
- ◖२६ जानेवारी◗ प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी गाय
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी निबंध
- माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध