न ऋण जन्मदेचे फिटे कल्पनाविस्तार – Na Run Janmadeche Fite Kalpanavistar

आपल्या भारतीय संस्कृतीत आईला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. ‘मातृदेवो भव’ असं म्हणून आपण आपल्या आईला वंदन करतो. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर, अशा ईश्वरी आत्म्याचा अंश असलेली स्त्री म्हणजे आई, अशी ‘आई‘ या शब्दाची अतिशय सुंदर व्याख्या केली आहे.

महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला, “अशी कोणती गोष्ट आहे की, जी पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ आहे ?” युधिष्ठिराने उत्तर दिले, “आपली आई, कारण ती प्रसुतीवेदना सहन करून मुलाला जन्म देते, त्याला वाढवते, त्याचं संगोपन करते, त्याच्यावर संस्कार करते.”

लहान मुल म्हणजे मातीचा गोळा. त्याला आकार दयावा तशी मूर्ती घडते. मुलांच्या संवेदनशील मनाला आकार देण्याचे कार्य आई करते. वीर जिजामातेने शिवरायांच्या मनावर सुसंस्कार केले. शिवरायांचे चरित्र घडवण्याचे श्रेय अर्थातच जिजाईंना जाते. ‘श्यामची आई‘ चित्रपटात एक छान वाक्य आहे. श्यामची आई आंघोळ करून आलेल्या श्यामला म्हणते, “बाळ श्याम, तू पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप.” ते एक वाक्य खरोखरच संस्कारांचं विद्यापीठ ठरलं. “

आई मुलावर जी माया करते, जे प्रेम करते, ते निरपेक्ष वृत्तीनं करते. कवी फ. मुं. शिंदे यांनी ‘आई’ या कवितेत म्हटलंय,

“आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतील जागा”
‘दिनूचं बिल’ ही कथासुद्धा आपल्यावर संस्कार करणारी आहे. कथेच्या शेवटी आई
दिनूच्या उशीखाली एक बिल ठेवते. त्यात लिहिलेलं असतं,

आईनं दिनूचा अभ्यास घेतला – बिल ‘शून्य’ रूपये
आईने दिनूवर संस्कार केले – बिल ‘शून्य’ रूपये
दिनूच्या आजारपणात त्याची शुश्रुषा केली – बिल ‘शून्य’ रूपये
आईने दिनूला शाळेत सोडले – बिल ‘शून्य’ रूपये – –

हे बिल वाचून दिनूला आपली चूक कळते व तो आईची माफी

आई-मुलाचं नातं आपल्याला निसर्गातही पहायला मिळतं. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ हा संत जनाबाईंचा अभंग काय किंवा ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला” हे सुगरणीच्या घरट्याचं वर्णन करणारं बहिणाबाईचं काव्य. इथे आई-मुलाच्या नात्यातील गोडवा अनुभवता येतो.

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी तर विठ्ठलालाही ‘माऊली’ म्हटलंय. तुळजापूरची भवानी असो किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी, त्या आदिशक्तीच्या रूपांनाही ‘माता’ म्हटलेलं आहे. भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याचा उल्लेख ‘भारतमाता’ असा केला जातो. .

‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ या संस्कृत वचनातही म्हटलंय की आपली माता आणि आपली मातृभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.

श्रावण अमावस्या हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करतात. तर पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे मे महिन्यातील दुसरा रविवार हा ‘मदर्स डे’ म्हणून साजरा करतात. खरोखरच आपल्या आईचं आपल्यावर जे ऋण आहे, ते न फिटणारं आहे.

“आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही

म्हणून ‘श्री’ कारानंतर रे शिक रे अ, आ, ई”

पुढे वाचा:

Leave a Reply