चलचित्रपटांचा प्रभाव मराठी निबंध

विज्ञानाची सातत्याने प्रगती चालू आहे. नित्य नवे शोध लावण्याची स्पर्धा चालू आहे. मानवाचे जीवन सुखमय बनविण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवनवे शोध लावले. त्यापैकीच एक म्हणजे चलचित्रपट अर्थात सिनेमा.

चित्रपटाचा शोध अमेरिकेतील थॉमस अल्वा एडिसन याने १८६० मध्ये लावला. भारतात दादासाहेब फाळके चित्रपटाचे जनक मानले जातात. त्यांनी १९१३ मध्ये पहिला मूक चित्रपट, ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. तर १९३१ मध्ये मुंबई येथे ‘आलमआरा’ या पहिल्या बोलक्या चित्रपटाची निर्मिती झाली. हळूहळू चित्रपट खूप लोकप्रिय झाले. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्राससारख्या महानगरांत चित्रपटगृहांचे जाळेच तयार झाले. अगदी लहान गावातसुद्धा चित्रपटगृहे झाली आहेत.

चित्रपट आपल्या समाजात इतक्या खोलवर जाईल असे कुणाला वाटलेही नसेल. सिनेमाची तिकिटे महाग झाली तरी गर्दी कमी झाली नाही. उलट ती वाढतच गेली. चित्रपटगृहाच्या बाहेर लागलेले ‘हाऊसफुल्ल’ चे बोर्ड पाहिले की चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. लोकप्रिय चित्रपटाचे ‘अॅडव्हान्स बुकिंग’ आधीच केले जाते. इतकेच नव्हे तर ब्लॅकने तिकिटे विकली जातात.

चित्रपटामुळे मनोरंजनाबरोबरच आपली ज्ञान वृद्धी होते. एखादी गोष्ट डोळयांनी प्रत्यक्ष पाहिल्यावर ती चटकन समजते. भौगोलिक, ऐतिहासिक, नैसर्गिक इत्यादी विषयांची माहिती चित्रपटांद्वारे सहजपणे होते. सरकार जनतेला जर काही विशेष संदेश देऊ इच्छित असेल तर त्या विषयावर वृत्तचित्र तयार करून ते सिनेमा सुरू होण्यापूर्वी दाखविले जाते. शिक्षणाच्या प्रसारासाठी चित्रपट हे सर्वात प्रभावशाली माध्यम आहे. विदेशांतही शिक्षणाच्या प्रसारासाठी चित्रपटांचा आधार घेतला जातो.

समाजसुधारणेच्या कार्यातही चित्रपट मागे नाहीत. भारतातील बहुतांश जनता अशिक्षित व अंधविश्वासू आहे. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना दुसऱ्यांनी समजावून सांगितल्या तरी त्यांना कळत नाहीत. अशा परिस्थितीत चित्रपटांचीच मदत घेतली जाते. आपल्या देशात अनेक नैतिक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदा. भगतसिंह, जागृती, अछूत कन्या, शिकलेली बायको इ. असे चित्रपट सामाजिक आणि आर्थिक समस्या मांडतात व तिची सोडवणूकही करून दाखवितात. चित्रपटाच्या द्वारे आधुनिक शेतीच्या पद्धती, शास्त्रीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती दाखविली जाते. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकार कुटुंब नियोजनावर लघुपट तयार करून दाखविते. अशिक्षितांना असे चित्रपट चटकन समजतात.

चित्रपटाचा माणसावर प्रत्यक्षपणे परिणाम होतो. मनोरंजनाचे हे सर्वात स्वस्त साधन आहे. अडीच तीन तास चालणाऱ्या चित्रपटात आपण सगळे विसरून मग्न होतो. दुसऱ्याच जगात विहार करू लागतो. म्हणून चित्रपट निर्देशकांनी समाजाला विकृत करणारी दृश्ये दाखवू नयेत. कारण माणूस वाईट गोष्ट चटकन आणि ज्ञानवर्धक गोष्टी उशिरा ग्रहण करतो.

व्यापारी वर्ग आपल्या मालाच्या जाहिरातीसाठी चित्रपटगृहांची मदत घेतात. जाहिराती चित्रपटाच्या सुरवातीला, मध्यंतरात दाखविल्या जातात. यात त्यांचा उद्देश जनतेने तो माल पाहावा व विकत घेण्यासाठी उत्सुक व्हावे हा असतो. यामुळे त्यांचा प्रचारही होईल आणि आर्थिक फायदाही होईल.

हिंदी व इतर भाषांच्या प्रचाराचे कामही चित्रपट करतात. यासाठी चित्रपट निर्मात्यांनी भाषेच्या शुद्धतेकडे लक्ष देणे जरूर आहे. आज सर्वश्रेष्ठ देशी-विदेशी चित्रपटांचे हिंदीत रूपांतर केले जात आहे. चित्रपटांमुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत झाली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी हजारो लोकांची गरज असते. अनेक नट नट्या अभिनयाची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळवितात.

आपल्या देशात दरवर्षी चित्रपट महोत्सव साजरा केला जातो. चित्रपटाच्या लोकप्रियतेचेच हे द्योतक आहे. महोत्सवात देशी, विदेशी सर्वश्रेष्ठ चित्रपट दाखविले जातात. भारत आणि हॉलिवूडमध्ये चित्रपटनिर्मितीची स्पर्धा चालू आहे. जो जो आपल्या जीवनात चित्रपटाचा प्रवेश होत गेला तो तो समाजाने त्याला विरोधही केला. तो अनावश्यकही नाही कारण यामुळे नैतिक मूल्यांचा-हास होतो. लोक नट-नट्यांचे वेडे होतात. त्यांची नक्कल करतात. चोरी, दरोडेखोरी, खुनाच्या नव्या पद्धती शिकतात. चित्रपटातील अश्लील दृश्ये पाहून तरुण पिढी भ्रष्ट होत आहे. नट-नटी बनण्यासाठी मुले मुली घरातून पळून जातात. त्यापैकी काही जण यशस्वी होतात तर काही जणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. चित्रपटामुळेच एक वेगळी प्रेमसंस्कृती उदयाला आली.

कित्येक वृत्तपत्रे, मासिके केवळ चित्रपटांवरच जिवंत आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकषून घेण्यासाठी मुखपृष्ठावर नट-नटीचे चित्र ते छापतात. त्यांच्या भानगडी छापतात. चित्रपट पाहून कोणी सेवा करीत नाही की हुंडा घेण्याचे सोडत नाही. असे कोणी करत असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. इच्छा असूनही आपण चित्रपटाचा प्रवाह रोखू शकत नाहीत. परंतु त्यात अश्लीलता येऊ नये, हिंसक दृश्ये येऊ नयेत म्हणून सरकारने सेंसॉर बोर्ड नेमले आहे. परंतु चित्रपट निर्माते या ना त्या मार्गाने त्यांचे समाधान करून अशी दृश्ये कापू देत नाहीत.

विज्ञानाने मानवाला चित्रपटाच्या रूपाने आजच्या युगातील सर्वात विराट शक्ती दिली आहे. चित्रपटाचा सदुपयोग करून आपण निखळ मनोरंजनाद्वारे भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्यांचे रक्षण करून महाशक्तिशाली राष्ट्र बनवू शकतो.

पुढे वाचा:

Leave a Reply