Sangli District Information in Marathi: सांगली जिल्हा हा 1949 च्या उत्तरार्धात तयार झालेला अलीकडचा भाग आहे. तेव्हा तो दक्षिण सातारा म्हणून ओळखला जात होता आणि 1961 पासून त्याचे नाव बदलून सांगली असे ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्हा काही तालुक्यांचा मिळून बनलेला आहे ज्यांनी एकेकाळी जुन्या सातारा जिल्ह्याचा भाग बनवला होता. आणि काही अंशी पटवर्धन आणि डफल्स यांच्या मालकीची राज्ये आणि जहागीर जी स्वातंत्र्योत्तर काळात विलीन झाली.

सांगली जिल्हा माहिती मराठी-Sangli District Information in Marathi
सांगली जिल्हा माहिती मराठी-Sangli District Information in Marathi

सांगली जिल्हा माहिती मराठी – Sangli District Information in Marathi

Table of Contents

सांगली जिल्ह्याचा इतिहास

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने १ ऑगस्ट १९४९ रोजी दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. पुढे दक्षिण सातारा जिल्ह्यात नवीन तालुक्यांची भर घालून २१ नोव्हेंबर १९६० रोजी सांगली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. पूर्वीच्या सातवाहन घराण्यातील सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या कारकीर्दीमधील काही नाणी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे सापडली आहेत. ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा सांगली हे मराठ्यांचे संस्थान होते. पटवर्धन संस्थानिक होते. आज त्यांचे वंशज विजयसिंगराव माधवराव पटवर्धन इथले राजे आहेत. १९३०-३२ मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील शिराळा तालुक्यातील बिळाशीचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील याच जिल्ह्यात क्रांती झाली होती.

सांगली जिल्हा नकाशा-SANGLI JILHA NAKASHA
सांगली जिल्हा नकाशा-SANGLI JILHA NAKASHA

सांगली जिल्ह्याचे भौगोलिक स्थान व विस्तार

सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्यात दक्षिण भागात आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्याचा भाग येतो. कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगाव हे जिल्हे लागून आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, उत्तरेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, जिल्ह्याच्या पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, जिल्ह्याच्या नैऋत्येस व दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा वसला आहे. जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार उत्तरेला १७.५ ते १८.११ अक्षांस आणि रेखावृत्तीय विस्तार पूर्वेला ७३.३३ ते ७४.५४ रेखांश असा आहे. जिल्ह्याची पूर्वपश्चिम लांबी २०५ कि. मी. व उत्तर-दक्षिण लांबी ९६ कि. मी. आहे.

सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ

सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८ हजार ५७८ चौ. कि. मी. इतके आहे. राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या २.८० टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे.

सांगली जिल्ह्याची लोकसंख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये स्त्रियांची लोकसंख्या १३ लाख ८६ हजार ४१५ म्हणजेच ४९.१३ टक्के इतकी आहे तर पुरुषांची लोकसंख्या १४ लाख ३५ हजार ७२८ म्हणजेच ५०.८७ टक्के इतकी आहे. या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८१.४८ टक्के, लोकसंख्येची घनता ३२९ चौ. घ. मी. आणि लिंग गुणोत्तर ९६६ इतके आहे.

सांगली जिल्ह्यातील तालुके

सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत. यामध्ये तासगाव, कडेगाव, मिरज, पलूस, खानापूर (मुख्यालय विटा), कवठेमहांकाळ, जत, वाळवा (मुख्यालय इस्लामपूर), आटपाडी, शिराळा यांचा समावेश होतो. २६ जून १९९९ रोजी पलूस या तालुक्याची निर्मिती करण्यात आली आणि एप्रिल २००२ रोजी कडेगाव हा तालुका अस्तित्वात आला.

सांगली जिल्ह्याची राजकीय व प्रशासकीय रचना

सांगली जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात व पश्चिम महाराष्ट्र या प्राकृतिक विभागात मोडतो. सांगली जिल्ह्यामध्ये १ महानगरपालिका, ६ नगरपालिका, ४ नगरपंचायती, १० तालुके, १० पंचायत समित्या, ५ महसूल उपविभाग, ७२८ गावे व ६९९ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात सांगली व हातकणंगले असे २ लोकसभा मतदार संघ व ८ विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्याचा आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक एमएच 7 -१० आहे.

संस्था संख्या नावे
महानगरपालिकासांगली-मिरज-कुपवाड महापालिका (स्थापना ९ फेब्रुवारी १९९८)
नगरपालिकाइस्लामपूर, तासगाव, विटा, आष्टा, जत, पलूस
नगरपंचायतीकवठेमहांकाळ, शिराळा, कडेगाव, खानापूर
पंचायत समित्या१०तासगाव, कडेगाव, मिरज, पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, वाळवा, आटपाडी, शिराळा
महसूल उपविभागमिरज, विटा, वाळवा, कडेगाव, जत
सांगली जिल्ह्याची राजकीय व प्रशासकीय रचना

सांगली लोकसभा मतदार संघ : या मतदार संघात मिरज (अ. जा.), सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

हातकणंगले लोकसभा मतदार संघ : या मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदार संघव सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे २ विधानसभा मतदार संघ येतात.

सांगली जिल्ह्याची प्राकृतीक रचना

सांगली जिल्ह्यातील दक्षिण व पश्चिमेकडील काही भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे. दक्षिणेकडील भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्ह्याच्या मध्य भागात शुक्राचार्य डोंगर, बेलगबाड डोंगर, आडवा डोंगर तसेच रामगड, मुचंडी इत्यादी टेकड्या आहेत. पश्चिमेस काळभैरव डोंगर, आष्टा डोंगररांग आहे. जिल्ह्याच्या मध्य भागात होनाई डोंगर, दंडोबा डोंगर आहेत. हा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे.

सांगली जिल्ह्यातील किल्ले व दुर्ग

गणेशदुर्ग (ता. सांगली), प्रचितगड (ता. शिराळा), भूपाळगड (ता. खानापूर) याशिवाय बागणी व मिरज येथे भुईकोट किल्ले आहेत.

सांगली जिल्ह्यातील नद्या

कृष्णा नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी जिल्ह्यातून साधारणत: १०५ कि. मी. प्रवास करते. ही नदी जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. सांगली हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कृष्णा नदीकाठी वसले आहे. याशिवाय बहे, औदुंबर, नरसिंगपूर ही पवित्र स्थळे कृष्णा नदीच्याकाठी वसली आहेत. उत्तरेकडून येरळा व पश्चिमेकडून वारणा या नद्या कृष्णा नदीस येऊन मिळतात. या कृष्णेच्या उपनद्या आहेत.

कृष्णा व येरळा नद्यांचा संगम ब्रह्मनाळजवळ होतो. तसेच हरिपूर येथे वारणा व कृष्णा नद्यांचा संगम झाला आहे. जिल्ह्यातून माण, बोर, अग्रणी या प्रमुख नद्या वाहतात. जिल्ह्याच्या उत्तर भागात आटपाडी तालुक्यातून माण किंवा माणगंगा नदी वाहते. पूर्व भागात बोर ही नदी जत तालुक्यातून नैऋत्य-ईशान्य अशी वाहते. अग्रणी ही नदी कवठेमहांकाळ तालुक्यातून वाहते. अग्रणी नदी बलवडीजवळ खानापूर पठारावर उगम पावते. या उगमस्थानी अगस्त्य ऋषींचे मंदिर आहे.

सांगली जिल्ह्याचे हवामान

सांगली जिल्ह्यात हवामान हे सामान्यपणे उष्ण व कोरडे आहे. येथील डोंगराळ भागातील हवामान थंड असून जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान जास्त असते. तसेच पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाऊस जास्त पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. जिल्ह्याच्या मध्यभागी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो. मिरज, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्यांचा समावेश अवर्षण प्रवण क्षेत्रात होतो.

सांगली जिल्ह्यातील धरणे

सांगली जिल्ह्यातील नद्यांवर मध्यम व लहान धरणे बांधून पाणी अडवले जाते. जिल्ह्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, विहिरी, बंधारे आहेत. यातून जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.

नदी धरणाचे ठिकाण (तालुका)
वारणानदी चांदोली (ता. शिराळा)
अग्रणी नदीवज्रचौंडे (ता. कवठेमहांकाळ)
येरळा नदीबलौडी

सांगली जिल्ह्यातील तलाव

आटपाडी (ता. आटपाडी), रेठरे (ता. वाळवा), कुची आणि लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ), अंजनी (ता. तासगाव), खंडेराजुरी (ता. मिरज), कोसारी (ता. जत).

मृदा : कृष्णा नदीच्या खोऱ्यात जिल्ह्याचा बराच भाग येतो. येथील जमीन सुपीक व मैदानी आहे. मध्य भागातील व पश्चिमेकडील डोंगराळ भागात जमीन खडकाळ आहे.

खनिज संपदा : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईडचे साठे आहेत. या जिल्ह्यात काही ठिकाणी चुनखडक आढळतो.

सांगली वनसंपदा व वन्यजीव

सांगली जिल्ह्यात ४२०.८० चौ. कि. मी. इतके वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी ही टक्केवारी ४.९ इतकी आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असून या ठिकाणी दाट वने आहेत. वनामध्ये साग, खैर, करंज, हिवर, बेहडा इत्यादी वृक्ष आढळतात. काही भागात बाबूंची बेटेही आहेत. दंडोबाच्या डोंगरावर वनखात्याने अनेक झाडे लावली आहेत.

जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने घायपात, गवत, बाभूळ, कडुलिंब इत्यादी वनस्पती आढळतात. या वनांतून बांधकामासाठी व इंधनासाठी लाकूड मिळते. याशिवाय मध, डिंक, कात, मेण, हिरडा, बेहडा इत्यादी वनोत्पादने मिळतात.जिल्ह्यातील वनांमध्ये हरिण, ससा, माकड, साळिंदर, साप, बिबट्या, तरस, कोल्हे इत्यादी प्रकारचे प्राणी तसेच पोपट, मोर, ससाणा, कोकीळ इत्यादी प्रकारचे पक्षीही आढळतात. चांदोली आणि कोयना अभयारण्याचा भाग मिळून ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ जानेवारी २०१० रोजी निर्माण करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील अभयारण्ये

जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिराळा तालुक्यात चांदोली हे अभयारण्य आहे. तसेच देवराष्ट्रे येथे हरणांसाठी प्रसिद्ध असणारे सागरेश्वर हे अभयारण्य आहे.

चांदोली अभयारण्य : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकास चांदोलीजवळ वारणा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. हे नैसर्गिक अभयारण्य सांगली-कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या अभयारण्यास आता राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा . देण्यात आला आहे.

सागरेश्वर अभयारण्य : कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रे येथे सागरेश्वर अभयारण्य निर्माण करण्यात आले आहे. या अभयारण्यामध्ये अनेक जातींची हरणे सोडण्यात आली आहेत. हे अभयारण्य हरिणांसाठी राखीव आहे. यात अनेक प्रकारचे वृक्ष आणि प्राणी या अभयारण्यात आढळतात. .

दंडोबा अरण्य : मिरज तालुक्यात सांगली-पंढरपूर रस्त्यावर देशिंग गावच्या हद्दीत दंडोबाच्या डोंगरावर वनोद्याने असून येथे महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. डोंगर पोखरून तेथे देवालय बांधले असून त्यावर शिखर देखील आहे.

सांगली जिल्ह्यातील शेती व्यवसाय

या जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस भरपूर प्रमाणावर पडतो. तर पूर्व भागाकडे पाऊस कमी कमी होत जातो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तांदूळ तर पूर्व भागात ज्वारी, बाजरी व मका ही पिके महत्त्वाची आहेत. रब्बी ज्वारीला या जिल्ह्यात ‘शाळू’ असे म्हणतात. “मालदांडी’ ही शाळुची जात येथे प्रसिद्ध आहे. गहू हे पीक मुख्यत: जिल्ह्याच्या मध्य भागात घेतले जाते. याशिवाय सूर्यफूल, ऊस, हळद, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, ही पिकेही घेतली जातात.

हळदीसाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. हळद व बेदाणा उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंबे, पपई, पेरू बोरे, लिंबू, केळी, चिकू, आंबा इत्यादी फळांचे उत्पादने घेतली जातात. अलिकडे द्राक्षे उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध झाला आहे. तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. मिरज तालुक्यातील विड्याची पाने प्रसिद्ध आहेत. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. अलिकडील काळात फुलांची शेतीही केली जाते. काही भागात विशेषत: कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात तंबाखुचे पीक घेतले जाते. सांगली जिल्हा हळद, गुळ, द्राक्ष व बेदाणे यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. मिरज येथील तंतुवाद्ये प्रसिद्ध असून ही उत्पादने इतर ठिकाणी पाठविली जातात. भिलवडी येथील दुग्धव्यवसाय प्रसिद्ध आहे. तसेच सांगली व मिरज येथे गुरांचा मोठा बाजार भरतो.

सांगली जिल्ह्यातील उद्योगधंदे

ऊस व द्राक्षे ही जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. या जिल्ह्यात साखर कारखाने व मनुका तयार करणे हे महत्त्वाचे उद्योग आहेत. सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा कारखाना आहे व आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग चालतो.

सूत गिरण्या, लोखंडी अवजारे तयार करण्याचे कारखाने देखील याच जिल्ह्यात आहेत. सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे शेतीची लोखंडी औजारे तयार करण्याचा कारखाना आहे. सांगली, मिरज, विटा, कवठेमहांकाळ व इस्लामपूर येथे आद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात माधवनगर व मिरज येथे कापडगिरण्या आहेत तर सांगली येथे सूतगिरणी आहे. तंतुवाद्याच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील मिरज हे तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असून येथील सतार, तंबोरा, सारंगी, वीणा घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. ‘बागणे’ हे गाव अडकित्ते तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लघुउद्योग आहेत. येथे घोंगड्या विणणे, हातमाग इत्यादी उद्योग चालतात.

सांगली जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण

सांगली जिल्ह्यातील वाहतूक मुख्यत: रस्ते व लोहमार्गांनी केली जाते. सांगली जिल्ह्यातून पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गेला आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील कासेगाव, नेर्ले, पेठ, कामेरी इत्यादी प्रमुख गावामधून गेला आहे. या जिल्ह्याला तीन लोहमार्ग आहेत. भिलवडी, मिरज, किर्लोस्करवाडी ही महत्त्वाची लोहमार्ग स्थानके आहेत. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे लोहमार्ग जंक्शन आहे.

सांगली जिल्ह्यातील लोकजीवन

या जिल्ह्यातील बहुसंख्य समाज हा ग्रामीण लोकजीवनाशी संबंधित आहे. शेती या प्रमुख व्यवसायाशी येथील लोकांचे जीवन जोडलेले आहे. जिल्ह्यात सर्वत्र सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. तमाशा, लेझीम, गोंधळ इत्यादी विविध लोककलांचा वापर मनोरंजनासाठी केला जातो. सांगली जिल्ह्यात नागपंचमी, तासगावचा रथोत्सव, कवठे एकंदचा दसरा महोत्सव, विट्याच्या पालखी शर्यती या प्रसिद्ध आहेत.

शिराळ्याची नागपंचमी : जिवंत नागाच्या पूजेमुळे शिराळ्याची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. यासाठी श्रावण महिन्यामध्ये देशातील विविध पर्यटक शिराळ्याकडे येतात.

तासगावचा रथोत्सव : तासगावचे श्री गणेश मंदिर त्याच्या गोपुराच्या रचनेमुळे प्रसिद्ध आहे. संस्थानिक T श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. कवठे एकंदचा दसरा महोत्सव: येथील बि-हाड सिद्धराज महाराजांच्या पालखीमुळे दसऱ्याला शोभेच्या दारुची आतषबाजी सुमारे ३५० वर्षे होत आहे. .

विट्याच्या पालखी शर्यती : या जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथे विजयादशमीच्या दिवशी देवांच्या पालख्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते.

सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वे

सांगली जिल्ह्यातील वसंतदादा पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, व्ही. एस. पागे, गोविंद बल्लाळ देवल, चिंतामणराव पटवर्धन, विष्णुदास भावे, वि. स. खांडेकर, बालगंधर्व, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, गोपाळ गणेश आगरकर, आर. आर. पाटील या प्रसिद्ध व्यक्तिंची जन्मभूमी व कर्मभूमी सांगली हीच राहिली आहे.

वसंतदादा पाटील : जन्म तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी झाला. ते १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतदादा पाटील काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते.

क्रांतीसिंह नाना पाटील : जन्म बहे बोरगाव (येडे मच्छिंद्र) येथे झाला. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात नानांनी सातारा व सांगली जिल्ह्यातील काही गावांमध्ये प्रति सरकारची स्थापना केली. सन १९४२ मध्ये त्यांनी ‘तुफान सेना’ नावाचे सेनादल उभारले होते. ६ डिसेंबर १९७६ रोजी त्यांचे मिरज येथे निधन झाले.

वि. स. पागे : वि. स. पागे म्हणजेच विठ्ठल सखाराम पागे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील बामणी येथे झाला. ते विधान परिषदेचे सदस्य व विधान परिषदेचे सभापतीही होते.

चिंतामणराव पटवर्धन : चिंतामणराव आप्पाराव पटवर्धन हे सांगली संस्थानचे अधिपती होते. सांगली परिसरावर दीर्घकाळापर्यंत पटवर्धन घराण्याची सत्ता होती.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व : यांचा जन्म २६ जून १८८८ मध्ये सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यातील नागठाणे येथे झाला. स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. अण्णाभाऊ साठे: यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.

ग. दी माडगुळकर : यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगुळ या गावी झाला. त्यांचा ‘गीत रामायण’ हा ग्रंथ लोकप्रिय आहे.

आर. आर. पाटील : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील यांचा जन्म तासगाव तालुक्यातील अंजनी या गावी झाला.

सांगली जिल्ह्यातील पर्यटन

जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य, चांदोली अभयारण्य, दंडोबा अरण्य, चौरंगीनाथ पर्यटन केंद्र, वाळवा येथील रामलिंग बेट, आरवडे येथील इस्कॉन मंदिर, औदुंबर येथील दत्तात्रयाचे क्षेत्र, खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिर, सांगली येथील गणेश मंदिर, तासगाव येथील गणेश मंदिर, वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे स्मारक इत्यादी महत्त्वाची पर्यटन स्थळे व तीर्थस्थळे असल्यामुळे पर्यटक नेहमी या स्थानांना भेटी देत असतात.

सांगली जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे

सांगली : सांगली हे शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे. या शहरात गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेश मंदिर प्रसिद्ध आहे.

तासगाव : तासगाव तालुका द्राक्षोत्पादनासाठी आणि द्राक्षांपासून मनुके तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिराळा : शिराळा तालुक्यात नागपंचमी प्रसिद्ध आहे. येथील नागपंचमीस जीवंत नागांची मिरवणूक काढली जाते.

मिरज : सांगली जिल्ह्यातील मिरज हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. येथील भुईकोट किल्ला व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. मिरज येथे कापड गिरणी असून तंतुवाद्य निर्मितीच्या उद्योगासाठीही मिरज प्रसिद्ध आहे.

देवराष्ट्र : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे हे गाव स्व. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे. येथील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे.

बहे-बोरगाव : सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव हे क्रांतीसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव आहे. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात सातारा-सांगली भागात प्रतिसरकारची स्थापना केली होती.

औदुंबर : वाळवा तालुक्यातील औदुंबर हे दत्तात्रयाचे जागृत ठिकाण कृष्णानदीकाठी वसले आहे.

वाटेगाव : वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव आहे.

सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती, पर्यटन आणि धार्मिक स्थळे

पुढे वाचा:

प्रश्न १. सांगली जिल्ह्यात प्रमुख नदी कोणती आहे?

उत्तर – कृष्णा नदी

प्रश्न २. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

उत्तर – सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत. यामध्ये तासगाव, कडेगाव, मिरज, पलूस, खानापूर (मुख्यालय विटा), कवठेमहांकाळ, जत, वाळवा (मुख्यालय इस्लामपूर), आटपाडी, शिराळा यांचा समावेश होतो. २६ जून १९९९ रोजी पलूस या तालुक्याची निर्मिती करण्यात आली आणि एप्रिल २००२ रोजी कडेगाव हा तालुका अस्तित्वात आला.

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply