Tennikoit Information in Marathi: टेनिकोइट किंवा रिंग टेनिस असेही म्हटले जाते हा एक प्रकारचा खेळ आहे जो बॅडमिंटन प्रकार कोर्टवर गोलाकार रबर रिंग ( कोइट रिंग ) सह खेळला जातो . सर्वप्रथम, खेळाडूचे मुख्य उद्दीष्ट प्रतिस्पर्धी बाजूने कोइट रिंग पकडणे आणि फेकणे आहे , जोपर्यंत एखाद्या खेळाडूला रिंग पकडता येत नाही आणि तो एक गुण गमावतो.

तसेच, या खेळाचा शोध लावणाऱ्या अनेक देशांवर अनेक खोट्या अफवा पसरवल्या जातात, परंतु असे मानले जाते की जर्मनीने या खेळांचा शोध लावला आहे. टेनीकोईट सहसा एकल आणि दुहेरी खेळाडू स्वरूपात खेळला जातो. सिंगल आणि डबल प्लेअर फॉरमॅट भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जर्मनी आणि ब्राझील सारख्या बहुतेक देशांनी स्वीकारले आहे.

रिंग टेनिस खेळाची माहिती Tennikoit Information in Marathi
रिंग टेनिस खेळाची माहिती Tennikoit Information in Marathi

रिंग टेनिस खेळाची माहिती – Tennikoit Information in Marathi

रिंग टेनिस नियमांचे वर्णन

रिंग टेनिस इनडोअर स्टेडियम किंवा आउटडोअर स्टेडियम दोन्हीवर खेळला जाऊ शकतो. इनडोअर सामने खेळताना, जवळजवळ प्रत्येक खेळ फ्लडलाइट अंतर्गत आयोजित केले जातात तर मैदानी सामन्यांसाठी दिवसाचा प्रकाश वापरला जातो. या व्यतिरिक्त, तीन प्रकारचे सामने प्रामुख्याने खेळले जातात जे एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी आहेत.

एकेरी दोन खेळाडू खेळतात; त्यापैकी प्रत्येक कोर्टाच्या विरुद्ध अर्ध्या बाजूने नेटद्वारे विभक्त केला जातो. चार खेळाडूंमध्ये दुहेरी खेळली जाते; दोन-दोन खेळाडू त्यांची टीम कोर्टाच्या विरुद्ध बाजूने बनवतात. मिश्र दुहेरी देखील चार खेळाडूंमध्ये खेळली जाते परंतु या सामन्यात पुरुष आणि महिला खेळाडूची जोडी बनवली जाते.

रिंग टेनिस क्रीडांगण

 • ४० फूट × १८ फूट (दुहेरीसाठी)(१२.२०×५.५० मी.)
 • ४० फूट × ९ फूट (एकेरीसाठी)(१२.२०×२.७५ मी.)

रेषांची जाडी – ३ सें.मी. ते ५ सें.मी.दरम्यान असते.

रिंग टेनिस क्रीडांगण, रिंग टेनिस मैदान माहिती

रिंग टेनिस न्यूट्रल ग्राउंड (Neutral Ground)

मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ३ फूट (९० सें.मी.) असे एकूण ६ फूट (१.८० मी) रुंदीचे न्यूट्रल ग्राउंड असते.

रिंग टेनिस जाळे (Net)

 • लांबी – १८ फूट ते २० फूट (५.५० मी. ते ६.१० मी.)
 • रुंदी – १८ इंच (४५ सें.मी.) मध्यभागी
 • उंची – ६ फूट (१.८० मी.) (ज्यूनिअर गटासाठी १.६७ मी.)

रिंग टेनिस अँटेना

मैदानावरील जाळ्याच्या ५.५० मी. बाहेर लागूनच अँटेना बसवलेले असतात. दोन अँटेनांमध्ये ५.५० मी. अंतर असते. (एकेरीसाठी अँटेनामधील अंतर २.७५ मी. असते.) नेटची वरची पट्टी नेटच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाची असते.

खांब-उंची – ६ फूट ४ इंच. (१.९० मी.)

बाजूची अंतिम रेषा व खांब यांच्यामध्ये ३० सें.मी. अंतर असते.

रिंग टेनिस -रिंग

रबरी व पृष्ठभाग गुळगुळीत.

 • व्यास – ७ इंच. (१७.७८ सें.मी. व्यास)
 • जाडीस – ११/४ इंच. (३.१२ सें.मी. जाडी)
 • वजन – १९० ग्रॅ. ते २२० ग्रॅ.
 • रंग – पांढरट / पिवळसर

टीप –

 1. एकेरी सामन्यासाठी क्रीडांगणाचा कोणताही अर्धा भाग (१२.२० × २.७५ मी.) वापरावा.
 2. सर्व्हिसचा क्रम‚ क्रीडांगणाची मापे यांखेरीज इतर नियम एकेरी व दुहेरी सामन्यांसाठी सारखेच आहेत.

रिंग टेनिस खेळाचे नियम

१) नाणेफेक जिंकणारा खेळाडू / संघ सर्व्हिस किंवा बाजू याची निवड करील.

२) मागील अंतिम रेषेच्या पाठीमागून सर्व्हिस करावी. उभ्या स्थितीत चालत किंवा धावत येऊन सर्व्हिस करता येईल. मात्र‚ हातातून रिंग सुटताना सर्व्हिस करणाऱ्याचे पाय अंतिम रेषेच्या पाठीमागे असले पाहिजेत. या वेळी त्याच्या किमान एका पायाचा मागील अंतिम रेषेबाहेरील जमिनीस संपर्क पाहिजे.

३) सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूने सर्व्हिस करताना कोणताही नियमभंग न होऊ देता फेकलेल्या रिंगचा जाळ्याला स्पर्श झाला तर तो नियमभंग आहे. सर्व्हिसची रिंग जाळ्याला स्पर्श होऊन सर्व्हिस करणाऱ्याच्या अंगणाबाहेर पडली किंवा न्यूट्रल ग्राउंडवर पडली किंवा प्रतिस्पर्ध्याचा रिंगला स्पर्श न होता मैदानाबाहेर पडली‚ तर तो सर्व्हिस करणाऱ्याचा फाउल मानला जातो.

४) प्रतिस्पर्धी तयार नसताना सर्व्हिस केली‚ तर पुन्हा सर्व्हिस करावयास सांगावे.

५) रॅली चालू असताना खेळाडूने प्रतिस्पर्ध्याकडे फेकलेल्या रिंगचा नेटला स्पर्श होऊन ती रिंग स्वत:भोवती गिरक्या घेत (wobbling) प्रतिस्पर्ध्याकडे गेली तरी चालते.

६) दुहेरी सामन्यात सर्व्हिस करणाऱ्या संघाचा अंगणाच्या उजव्या बाजूचा खेळाडू प्रथम सर्व्हिस करील. त्याचा साथीदार त्या वेळी अंगणाच्या डाव्या बाजूला उभा राहील.
अंगणाच्या उजव्या बाजूने सर्व्हिस करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या उजव्या अंगणातील (तिरकस क्षेत्रातील) खेळाडूकडे नियमानुसार रिंग फेकील. त्या वेळी सर्व्हिस स्वीकारणाऱ्याचा साथीदार आपल्या अंगणाच्या डाव्या बाजूला उभा असेल.

सर्व्हिस करताना फेकलेली रिंग उजव्या अंगणातील प्रतिस्पर्धीच पकडील व परत टाकताना प्रतिस्पर्ध्याच्या अंगणाच्या कोणत्याही भागात टाकील. सर्व्हिसची रिंग परतविल्यावर खेळाडूंनी आपल्या अंगणाच्या कोणत्याही भागात उभे राहून खेळावे आणि कोणत्याही क्रमाने खेळावे.

सर्व्हिस करणाऱ्या संघास एक गुण मिळाल्यावर पूर्वीचाच सर्व्हिस करणारा खेळाडू आपल्या अंगणाच्या डाव्या बाजूने सर्व्हिस करील आणि त्याचा साथीदार आपल्या अंगणाच्या उजव्या भागात उभा राहील. याप्रमाणे गुण मिळताच कोपरे बदलून सर्व्हिस केली जाईल. सर्व्हिस स्वीकारणारे खेळाडू मात्र त्या वेळी आपल्या अंगणातील बाजू बदलणार नाहीत.

सर्व्हिस बदल झाल्यावर प्रथम सर्व्हिस स्वीकारणारा खेळाडू सर्व्हिस करील व पहिल्या संघाचा प्रथम सर्व्हिस करणाऱ्याचा साथीदार सर्व्हिस स्वीकारील.

७) सर्व्हिस करताना फेकलेली रिंग स्वत:भोवती गिरक्या खात जाणे हा फाउल आहे. रिंग प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात जाताना अगदी सरळच गेली पाहिजे असे नाही. ती ३ सें.मी.पर्यंत लटपटत किंवा हेलकावत गेली तरी चालते.

८) रिंग कोणत्याही एका हाताने पकडावी आणि विनाविलंब त्याच हाताने परत टाकावी. दोन्ही हातांनी रिंग पकडता येणार नाही.

९) रिंग पकडल्यावर पुढे चालत जाऊन रिंग टाकता येणार नाही.

१०) रिंग हातात धरून ठेवली किंवा हातातून खाली पडली‚ तर फाउल आहे.

११) रिंग जमिनीस स्पर्श होण्यापूर्वी पकडली पाहिजे. पकडलेल्या रिंगचा जमिनीस स्पर्श झाला‚ तर तो फाउल आहे.

१२) दुहेरी सामन्यात रिंगला दोघांचा स्पर्श झाला‚ पण त्यांपैकी एकाने विनाविलंब रिंग परत फेकली‚ तर तो फाउल नाही. तसेच एकाचा रिंगला स्पर्श झाला आणि दुसऱ्याने ती पकडून परत फेकली‚ तर तो फाउल नाही. (अपवाद – सर्व्हिस करताना टाकलेली रिंग.)

१३) सर्व्हिसव्यतिरिक्त फेकलेल्या रिंगचा जाळ्याला स्पर्श होऊन रिंग प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात गेली‚ तर खेळ सुरू राहील.

१४) फेकलेली रिंग हातातून सुटल्यावर किमान ६ इंच (१५ सें.मी.) वर गेली पाहिजे. (Upward tendency)

१५) मैदानाबाहेर रिंग पकडणे फाउल नाही. मात्र‚ मैदानाबाहेर खेळाडूचा रिंगला स्पर्श झाला आणि रिंग जमिनीवर पडली‚ तर तो त्या खेळाडूचा फाउल होय.

१६) ओव्हर हँड (Over hand) पद्धतीने रिंग टाकता येणार नाही. तसेच रिंग उचलून खाली टाकता येणार नाही.

१७) रिंग टाकणाऱ्याचा हात जाळ्याच्या पलीकडे जाऊ नये.

१८) अंगविक्षेप करून‚ फसवून रिंग टाकू नये.

१९) दोन अँटेनांमधून व जाळ्याच्या वरून रिंग पलीकडे गेली पाहिजे. खांबाच्या‚ अँटेनाच्या बाहेरून रिंग पलीकडे गेल्यास तो रिंग फेकणाऱ्याचा फाउल आहे.        

२०) रिंग जमिनीवर पडताना तिचा पहिला स्पर्श रेषेवर असेल‚ तर तो रिंग फेकणाऱ्याचा फाउल नाही.

२१) रिंग न्यूट्रल ग्राउंडवर पडली‚ तर तो फाउल आहे.

२२) खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा न्यूट्रल ग्राउंडमध्ये स्पर्श झाला तर तो त्याचा फाउल आहे. (रेषेला केवळ स्पर्श झाला तर तो फाउल मानू नये. न्यूट्रल ग्राउंडवर हवेत शरीराचा कोणताही भाग असला तर तो फाउल नाही.)

२३) दुहेरीमध्ये संघाकडे सर्व्हिस आल्यावर एकाच खेळाडूला त्याचा / त्यांचा नियमभंग होईपर्यंत सर्व्हिस करता येते. सर्व्हिसनंतर ती रॅली जिंकणारा खेळाडू / संघ एक गुण मिळवितो आणि पुढील सर्व्हिस त्याच्याकडे राहते / प्रतिस्पर्ध्याकडे जाते.

२४) प्रतिपक्षापेक्षा किमान २ गुणांच्या आधिक्याने प्रथम किमान २१ गुण मिळविणारा खेळाडू / संघ विजयी होतो. उदा. – २१-१५‚ २१-१९ दोघांचेही २०-२० गुण झाले‚ तर प्रथम २२ वा गुण मिळविणारा खेळाडू/संघ विजयी ठरतो.

२५) पहिला गेम जिंकणारा खेळाडू / संघ पुढील गेममध्ये प्रथम सर्व्हिस करील. पुढील गेमसाठी दुहेरी सामन्यामध्ये सर्व्हिस करणारा व सर्व्हिस स्वीकारणारा यांचा क्रम बदलता येईल. दोन गेममध्ये तीन मिनिटांची विश्रांती राहील.

२६) नवीन गेमसाठी खेळाडू / संघ मैदान बदलतील. अंतिम किंवा तिसऱ्या गेममध्ये ८ गुणांनंतर मैदान बदलले जाईल.

२७) तीनपैकी दोन गेम्स जिंकणारा खेळाडू / संघ सामना जिंकतो.

रिंग टेनिस एकेरी व दुहेरी सामने

एकेरी व दुहेरी सामन्यांमध्ये गुण देणे‚ सर्व्हिस बदल‚ खेळाडूंचा अंगणबदल इत्यादी बाबतींत बदल करून विविध पद्धतीने सामने खेळविले जातात. त्यांपैकी एका पद्धतीचा खाली उल्लेख केला आहे.    

एकेरीमध्ये नाणेफेक केल्यावर सर्व्हिस करण्याचा पर्याय निवडणारा खेळाडू प्रथम सलग पाच सर्व्हिसेस करतो. प्रत्येक सर्व्हिस केल्यानंतर ती रॅली जिंकणाऱ्या खेळाडूस एक गुण मिळतो. त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडू सलग पाच सर्व्हिसेस करतो. रॅली जिंकणाऱ्या खेळाडूस एक गुण मिळतो. याप्रमाणे सेट संपेपर्यंत खेळ चालू राहतो. तीनपैकी दोन सेट्स जिंकणारा खेळाडू विजयी होतो.

दुहेरीमध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी दोन खेळाडू असतात. प्रथम सर्व्हिस कोणी करावयाची किंवा प्रथम सर्व्हिस कोणी स्वीकारावयाची हे खेळाडू परस्पर ठरवतील.

सेट सुरू होताना सर्व्हिसचा पर्याय निवडणाऱ्या संघाचा उजव्या अंगणातील खेळाडू प्रतिस्पध्र्याच्या उजव्या अंगणातील खेळाडूकडे सलग पाच सर्व्हिसेस करतो. रॅली जिंकणाऱ्या संघास एक गुण मिळतो. त्यानंतर पुढील सलग पाच सर्व्हिसेस प्रतिस्पर्धी संघ करतो. यावेळी पहिल्या पाच सर्व्हिसेस स्वीकारणारा उजव्या अंगणातील खेळाडू प्रतिस्पध्र्याच्या उजव्या अंगणात उभा असलेल्या प्रथम सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूच्या साथीदाराकडे सलग पाच सर्व्हिसेस करतो. रॅली जिंकणाऱ्या संघास गुण दिला जातो. याप्रमाणे सेट संपेपर्यंत खेळ सुरू राहतो. तीनपैकी दोन सेट्स जिंकणारा संघ विजयी होतो.

रिंग टेनिस चॅम्पियनशिप

रिंग टेनिसचे सामने आयोजित करताना चॅम्पियनशिप ठरविण्यासाठी वैयक्तिक व सांघिक अशा दोन पद्धतींचा अवलंब केला जातो. वैयक्तिक चॅम्पियनशिपसाठी पुरुष एकेरी‚ महिला एकेरी‚ पुरुष दुहेरी‚ महिला दुहेरी आणि मिश्र पद्धतींचा अवलंब केला जातो. सांघिक चॅम्पियनशिप ठरविण्यासाठी डेव्हिस कप पद्धतीचा अंगीकार केला जातो. दोन संघांमध्ये दोन एकेरी‚ एक दुहेरी आणि दोन एकेरी (रिव्हर्स सिंगल्स) अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

रिंग टेनिस सामनाधिकारी

एकेरी‚ दुहेरी व मिश्र दुहेरी सामन्यासाठी सरपंच हे मुख्याधिकारी असतात आणि दोन रेषापंच त्यांना मदत करतात. मुख्याधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो.  

रॅली चालू असताना संघाच्या मार्गदर्शकाने आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करावयाचे नाही.

सामना चालू असताना मार्गदर्शक किंवा खेळाडू यांच्याकडून अखिलाडू वृत्तीचे वर्तन घडू नये म्हणून सरपंच दक्ष राहतील.

सरपंचाच्या निर्णयाबाबत त्यांच्याशी हुज्जत घालणे‚ सरपंचाच्या निर्णयावर असभ्य भाषेत टीका‚ प्रतिस्पर्धी खेळाडू‚ प्रेक्षक आणि सरपंच यांच्याविषयी अपमानकारक शब्दांचा वापर‚ असभ्य शारीरिक हावभाव‚ आक्रमक आणि उद्धट वर्तन अशा प्रकारचे अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन घडत असेल तर सरपंच संबंधित मार्गदर्शकाला व खेळाडूंना तसे न करण्याविषयी एकदा ताकीद देतील. अखिलाडू वृत्तीची पुनरावृत्ती होत राहिली तर सरपंच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतील.

पुढे वाचा:

Leave a Reply