स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी – Vinayak Damodar Savarkar Information in Marathi

अनेक वीरांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्राणांची पर्वा न करता इंग्रजी सत्तेशी लढा दिला. विनायक दामोदर सावरकर हे त्यातील एक अग्रणी. त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ असे म्हणतात.

सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यात भगूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत आणि आईचे नाव राधाबाई. त्यांना दोन भाऊ व एक बहीण अशी भावंडे होती.

विनायक दामोदर सावरकर Color Photo

सावरकर नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या थोरल्या भावाचे लग्न झाले. त्यांच्या वहिनीचे नाव येसूबाई. या आपल्या वहिनीवर सावरकरांचे आईप्रमाणे प्रेम होते.

सावरकरांना लहानपणापासून वाचनाचा फार नाद होता. ते कविताही लिहीत. लोकमान्य टिळकांचे केसरी हे वर्तमानपत्र आणि त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव यांमुळे सावरकरांवर लोकमान्य टिळकांचा फार प्रभाव पडला. त्यांचे मन राजकारणाकडे ओढ घेऊ लागले.

त्याच वेळी प्लेगची साथ आली. सरकारी अधिकार्‍यांनी प्लेग आटोक्यात आणण्याच्या निमित्ताने जनतेवर फार जुलूम केले. त्यामुळे चिडून चाफेकर बंधूंनी पुण्यात रँड आणि आयर्स्ट या इंग्रज अधिकार्‍यांचे खून केले. त्याबद्दल चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली.

या घटनांचा छोट्या विनायकांवर फार परिणाम झाला व त्यांनी ठरवले की, सशस्त्र क्रांती हाच स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे.

मॅट्रिक पास झाल्यावर १९०१ मध्ये सावरकर पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले. याच वर्षी त्यांचे लग्नही झाले. पुण्याला आल्यावर सावरकरांनी ‘अभिनव भारत’ नावाची क्रांतिकारक तरुणांची संघटना स्थापन केली.

बी.ए. पास झाल्यावर सावरकरांनी एल.एल.बी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला व पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्येही त्यांनी ‘अभिनव भारत’ ची स्थापना केली. गुप्तपणे पिस्तुले व बॉम्ब बनवणे व ही पिस्तुले भारतात पाठवणे असे कार्य सुरू केले. लंडनमध्ये मदनलाल धिंग्रांनी वायली या इंग्रज अधिकार्‍याची हत्या केली, तर नाशिकला अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला मारले. या दोघांचेही सावरकर हेच प्रेरणास्थान होते.

‘अभिनव भारत’ ही संघटना आता इंग्रज सरकारच्या लक्षात आली. कान्हेरेला फाशी देण्यात आले. सावरकरांना अटक करून बोटीतून हिंदुस्थानाकडे पाठवण्यात आले; परंतु हिंदुस्थानात येत असताना सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोलमधून उडी टाकली व पोहत पोहत ते फ्रान्सच्या किनार्‍याला पोचले; परंतु तेथील फ्रेंच पोलिसाने त्यांना परत इंग्रज सरकारच्या ताब्यात दिले. सावरकरांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांना अंदमानला पाठवण्यात आले.

आज अंदमान बेट हे मजेने प्रवासाला जाण्याचे ठिकाण झाले आहे; पण तेव्हा अंदमानला इंग्रज सरकारचा एक भयंकर तुरुंग होता व धोकादायक कैद्यांना तेथे पाठवण्यात येई. या शिक्षेला काळे पाणी असे म्हणत. त्या तुरुंगात गेलेला कैदी जिवंत परत येण्याची आशाच नसे. तिथे कैद्यांकडून अतिशय कष्टाची कामे करून घेत. क्रूर शिक्षा व छळ करण्यात येई. एकांतवासात ठेवत. या छळाने कंटाळून काही कैदी आत्महत्या करत, तर काहींना वेड लागे.

पण सावरकरांनी याही परिस्थितीवर मात केली. त्या तुरुंगात कागद किंवा लेखन साहित्य मिळणे शक्य नव्हते. पण सावरकर कविता रचत, त्या भिंतीवर खिळ्याने कोरीत व मग पाठ करत. तुरुंगात त्यांनी कैद्यांना साक्षर करायला सुरुवात केली.

सावरकरांच्या सुटकेचे प्रयत्न लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सेनापती बापट इत्यादी पुढारी करत होते. अखेर ६ जानेवारी १९२४ रोजी सावरकरांची अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाली. मात्र सुटकेनंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातच राहावे व राजकीय चळवळीत भाग घेऊ नये, अशी अट सरकारने घातली.

रत्नागिरीला आल्यावर ही अट पाळण्यासाठी सावरकरांनी सामाजिक सुधारणांचे कार्य सुरू केले.

सावरकर हिंदुत्वाचे अभिमानी होते. जबरीने बाटवून दुसर्‍या धर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू करून घेण्याची शुद्धीकरणाची चळवळ त्यांनी सुरू केली. हिंदूसमाज जातिभेदामुळे फुटलेला होता. तो संघटित व्हावा म्हणून त्यांनी सहभोजनाची चळवळ सुरू केली. सर्व जातींना खुले असलेले ‘पतित पावन मंदिर’ त्यांनी बांधून घेतले, तसेच भाषाशुद्धीची चळवळही त्यांनी सुरू केली.

सरकारने १९३७ मध्ये सावरकरांवरील सर्व निर्बंध उठवले. सावरकरांनी आता हिंदू संघटनेचे कार्य करण्याचे ठरवले व हिंदू महासभा या पक्षात ते सामील झाले. याच वर्षी अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांची अध्यक्षस्थानी निवड झाली. १९४३ पर्यंत लागोपाठ सहा वेळा ते सभेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी सैनिकीकरणाचे महत्त्व सांगितले. देशाच्या फाळणीला त्यांचा विरोध होता.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर काही दिवसांनी नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली. या कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून सावरकरांना अटक झाली; पण चौकशीनंतर ते निर्दोष ठरले.

१९६६ च्या फेब्रुवारीमध्ये सावरकर आजारी पडले व अन्नत्याग करून त्यांनी २६ फेब्रुवारीला आत्मार्पण केले.

सावरकर श्रेष्ठ देशभक्त होते. तसेच उत्तम वक्ते व समाजसुधारक होते.

स्वातंत्र्ययुद्ध आणि समाजकार्य यात महत्त्वाचे योगदान देत असतांनाच त्यांनी बरीच साहित्य निर्मितीही केली आहे.

‘सागरा प्राण तळमळला’ सारखे त्यांचे भावगीत तसेच ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ ही स्वातंत्र्यदेवीची प्रार्थना प्रसिद्ध आहेच. ‘संन्यस्त खड्ग’ हे नाटक, ‘कमला’ हे खंडकाव्य, ‘गोमांतक’ हे दीर्घकाव्य, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘शिखांचा इतिहास’, ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’, ‘काळे पाणी’ आणि ‘मोपल्यांचे बंड’, या कादंबर्‍या आणि ‘माझी जन्मठेप’, ही त्यांची प्रसिद्ध साहित्य निर्मिती.

१९३८ साली ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते. ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, असा संदेश देणारे त्यांचे अध्यक्षीय भाषण खूप गाजले होते.

त्यांनी इंग्रजीतही साहित्य निर्मिती केली आहे. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक त्यांनी मुळात इंग्रजीतच लिहिले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या ओजस्वी व जाज्वल्य लिखाणावर इंग्रज सरकारने बंदी घातली होती.

पुढे वाचा:

Leave a Reply