डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती – Ambedkar Jayanti 2023

जातिभेद आणि अस्पृश्यता या हिंदू धर्मातील अत्यंत वाईट प्रथा आहेत.

शूद्र म्हणजे अगदी खालच्या समजलेल्या जातीतील लोकांना अस्पृश्य म्हणत. ‘सवर्ण’ जातीचे लोक त्यांना स्पर्श करत नसत. अस्पृश्यांना मंदिरात जाऊन देवदर्शन करता येत नसे, तसेच सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नसे. सवर्णांच्या घरात, अगदी सार्वजनिक हॉटेलातही त्यांना प्रवेश नसे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर

महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक पुढार्‍यांनी अस्पृश्यता दूर करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले.

अस्पृश्यांना हीन व अपमानास्पद वागणूक मिळत असतानाच्या काळात १४ एप्रिल १८९१ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महार समाजात झाला. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी अस्पृश्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी चळवळ सुरू केली. १९२४ साली त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ब्रीदवाक्य ‘शिकवा, चेतवा, संघटित करा’ असे होते.

डॉ. आंबेडकर आपल्या बांधवांना शिक्षणाचे महत्त्व सांगत, तसेच त्यांच्यातल्या वाईट चालीरीती त्यांनी सोडून द्याव्यात आणि स्वच्छतेचे महत्त्व समजून घ्यावे, असेही ते सांगत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म सकपाळ कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव भीम असे होते. त्यांचे एक गुरुजी आंबेडकर यांचेच आडनाव त्यांनी लावले व ते भीमराव आंबेडकर झाले. गरिबीमुळे त्यांना मोठ्या कष्टाने शिक्षण घ्यावे लागले. जातिभेदामुळे पदोपदी मानहानी सोसावी लागली. तरीही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले.

‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’, ‘समता’, व ‘प्रबुद्ध भारत’ अशी पाच नियतकालिके त्यांनी सुरू केली. कोल्हापूरला एक परिषदही घेतली आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी सहभोजनासारखे कार्यक्रम सुरू केले. १९२७मध्ये अस्पृश्यांना सर्वांबरोबर पाणी भरता यावे, यासाठी त्यांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. १९३० मध्ये अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करता यावा म्हणून नाशिकला ‘काळा राम मंदिरा’समोर त्यांनी सत्याग्रह केला. मनुस्मृती या ग्रंथात जातिभेद सांगितला आहे, म्हणून त्यांनी सर्वांसमोर मनुस्मृती जाळली.

१९३० ते १९३२पर्यंत ते गोलमेज परिषदेचे सभासद होते. या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळावेत अशी मागणी केली व गोलमेज परिषदेत ती मंजूरही झाली. परंतु त्यावरूनच आंबेडकर व गांधी यांच्यात मतभेद झाले. नंतर दोघांच्या चर्चेतून ‘पुणे करार’ जन्माला आला. या करारानुसार अस्पृश्यांना प्रगती करण्यास वाव मिळावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात, असे ठरले.

१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे ते मुंबई कौन्सिलवर निवडून आले. १९४२ ते ४६ या काळात ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे मजूर मंत्री होते. या काळात त्यांनी अस्पृश्य वर्गाची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याच्या कामी आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले.

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी १९४६ साली स्थापन झालेल्या घटना समितीचे ते सदस्य होते. घटनेच्या मसुद्यासाठी त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळेच त्यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ म्हटले जाते. भारताच्या घटनेत असे नमूद केले आहे की, स्वतंत्र भारतात धर्म, जात अशा गोष्टींमुळे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

भारत स्वतंत्र झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याशिवाय ते घटनेच्या-मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हिंदु कोड बिला-सारखा महत्त्वाचा कायदा त्यांनी मांडला. पण त्याबद्दल आपल्या मंत्रिमंडळातील सह-कार्‍यांशी मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा १९५१मध्ये राजीनामा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माचे आकर्षण वाटू लागले आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी आपल्या अनेक अनुयायांसह बौद्धधर्माची दीक्षा घेतली. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

१४ एप्रिल हा या थोर पुरुषाचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ म्हणून साजरा केला जातो.

पुढे वाचा:

Leave a Reply