कर्म हीच पूजा मराठी निबंध

ईश्वराने जीवन कर्मप्रधान बनविले आहे. कर्माशिवाय संसार चालू शकत नाही. हे विश्व ईश्वराचे मंदिर आहे. त्याची फारच सुंदर आकर्षक आश्चर्यजनक निर्मिती आहे. या जगात कार्यरत राहणे हीच त्याची खरी पूजा आहे. पारंपरिक मशीद, मंदिर, चर्चमध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये खरी पूजा होऊ शकत नाही. तिथे जाऊन पूजा करणे हा एक प्रकारचा पलायनवाद आहे. ईश्वर शेतकऱ्यांमध्ये, श्रमिकांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये, सैनिकांमध्ये निवास करतो. कारण हे लोक खरे कर्मयोगी असतात. आपल्या रक्त घामाने हे लोक जीवन आणि विश्वचक्राला गतिमान ठेवतात. अशा प्रकारे हेच लोक ईश्वराला सर्वाधिक प्रिय असतात. आणि ईश्वराच्या जवळ राहतात.

ईश्वराला दरिद्री नारायणही म्हटले जाते. अर्थात ईश्वर त्या सर्वांमध्ये असतो जे कष्ट करतात, मजुरी करतात, शेतात नांगर हाकतात, कारखान्यांत काम करतात आणि आपल्या अथक परिश्रमाने देशाला समृद्ध, शक्तिशाली आणि सुखी करतात. ईश्वराचा वास ना मंदिरात असतो ना मशिदीत, मुल्ला मौलवीमध्ये ना पुजाऱ्यांत. रात्रंदिवस कठोर परिश्रम करणाऱ्यांमध्ये ईश्वर असतो. त्यांचे परिश्रम हीच खरी पूजा असते. हे लोक म्हणजेच जगाचा पाया, आधारशिला, शक्ती आहेत. हे लोक म्हणजेच परमेश्वराची खरी अभिव्यक्ती आहेत. यांच्यामध्येच समाधानरूपी खरे धन आणि प्रामाणिकपणा असतो. ही ईश्वराचीच दुसरी नावे होत. शेठ, सावकार, गिरणीमालक वगैरे श्रीमंत लोक जे ऐषआराम, भोगविलासात आकंठ बुडालेले असतात त्यांच्यात हे गुण कुठे?

श्रीमद भगवद गीतेतही कर्माला प्रधान श्रेष्ठ मानून त्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. गीतेत म्हटले आहे “योग कर्मसु कौशलम” म्हणजे कर्मात पूर्ण कौशल्य असणे म्हणजेच योग, कर्मठपणा, कर्तव्य पालन आणि कार्यतत्परता हे योग्यास असणारे आवश्यक गुण आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एका कर्मयोग्याचे खरे व श्रेष्ठ उदाहरण आहे. ते सतत कर्मरत असूनही ईश्वराची पूजा, उपासना करीत. एक क्षणही ते वाया घालवीत नसत. कोणत्याही कामाला तुच्छ, हीन व निरर्थक समजत नसत. लहानात लहान कामही त्यांच्यासाठी मंदिरातील पूजेइतके पवित्र होते. त्यांनी शौचालये साफ केली. आजारी बकरीवर इलाज केला, चरख्यावर सूत कातले, मुलांबरोबर खेळले. त्याचबरोबर राजकीय सभासंमेलनांतही भाग घेतला. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे नेतृत्व केले. अनेकदा तुरुंगात गेले. त्यांची इच्छाशक्ती जबर होती. सगळी कार्ये त्यांच्यासाठी पवित्र आणि चांगलीच होती. कारण त्यांनी स्वत:ला ईश्वराला व जनता जनार्दनाला समर्पित केले होते. आपणही त्यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून मनापासून कर्मरूप ईश्वराची उपासना केली पाहिजे.

कर्मरत राहिल्यामुळे जो आत्मविश्वास, शांती सुख आणि आनंद मिळतो त्याला उपमाच नाही. जेवढ्या श्रेष्ठ, यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या त्या सर्व कर्मयोगी होत्या. त्यांनी कर्मालाच ईश्वर मानून त्याचा जीवनात स्वीकार केला. कर्मच व्यक्तीला यशस्वी बनविते. कर्मच जीवनाला सार्थक करते. कामाशिवाय जीवन निरर्थक व व्यर्थ जाते. काम नसेल तर व्यक्तीच्या जीवनात निराशा, अंधार, शक्तिहीनता आणि भित्रेपणा येतो. आपण जर निसर्गाकडे पाहिले तर कळते की निसर्ग सतत कार्यरत असतो. सतत सक्रिय असतो. ऋतूंमधील बदल, सूर्योदय, सूर्यास्त, ताऱ्यांचे उगवणे, मावळणे, पक्ष्यांचा किलबिलाट इ. सर्व निसर्गाची सक्रिय अभिव्यक्ती आहे. मुंग्या आणि मधमाशा किती मेहनत करतात किती सक्रिय असतात. मग मनुष्य ही तर ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. म्हणून मनुष्याने सक्रिय तेच सुंदर व श्रेष्ठ उदाहरण सादर केले पाहिजे.

सर्वांसाठी चांगली, हितकारक, नि:स्वार्थ अशी जी कर्मपूजा तीच खरी कर्मपूजा. एखादे कर्म जर संकुचित भावना मनात ठेवून ईर्ष्या, द्वेष, लालसा, स्वार्थाच्या अपेक्षेने केले तर ती कर्मपूजा उपासनेचे पावित्र्य आणि उंची प्राप्त करू शकत नाही, आपले प्रत्येक कर्मसेवा, परोपकार जनहित, राष्ट्रकल्याण, करुणा, अहिंसा, सत्य इ. महान मानवी मूल्यांनी प्रेरित होऊन केलेले असावे. या कसोटीवरच आपण आपल्या कामाची पारख करून घेतली पाहिजे. यावर न उतरणारे कोणतेही काम सार्थक होऊ शकत नाही त्याला पूजा म्हणता येत नाही. कामाचे महत्त्व आणि पवित्र्याबद्दल बायबलमध्ये म्हटले आहे “That if any world not work, neither should be eat”.
एका प्रसिद्ध रशियन लेखकाने कर्माचे श्रेष्ठत्व मान्य करताना म्हटले आहे. *when work is pleasure life is joy! when work is duty life is slavery” इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे. “Empty mind is a devils workshop कामाचा विचाराशी आणि बुद्धीशी घनिष्ठ संबंध आहे. आधी विचार येतो आणि नंतर त्या विचाराला साकार करण्यासाठी कर्म केले जाते. विचार नसेल तर कामही नसते मनुष्य रिकामा आळशासारखा बसून राहतो. निष्क्रिय माणूस, कुटुंब, समाज आणि देशावर ओझे असतो. तो जीवनात काहीही चांगले करू शकत नाही, यशापासून नेहमी दूर राहतो बेकार आणि कर्महीन माणसाला कोणी मित्र, प्रेम करणारा नसतो. म्हणून कधीही आपली मन बुद्धी रिकामी असू नये. अन्यथा त्यात सैतानाची वस्ती होईल. वाईट हानिकारक विचार येतील आणि शेवटी विनाशाच्या गर्तेत ढकलून देतील,

आपली बुद्धी नेहमी सक्रिय असली पाहिजे. मनात नेहमी चांगले, लाभदायक विचार येत राहावेत, म्हणजे आपण चांगली कार्ये करू. कधीही बेकारीला आपल्याजवळ येऊ देऊ नये. विचार हेच व्यक्ती आणि त्याच्या कार्याच्या मुळाशी असतात. चांगल्या विचारांचा अर्थ चांगली संगत, उत्कृष्ट पुस्तकांचे मनन चिंतन, चांगल्या लोकांचे ऐकणे, त्यांच्या म्हणण्यानुसार वागणे असा आहे म्हणून नेहमी चांगले विचार असावेत, त्यांचे मनन चिंतन करावे. ते प्रत्यक्ष कृतीत आणावेत. हाच यश, सुख स्मृद्धी शांतीचा मार्ग आहे.

जर्मनीत हिटलरनामक एक क्रूर हुकूमशहा होऊन गेला. दुसऱ्या महायुद्धाला तोच कारणीभूत होता. तो फार, चलाख, चतुर, शक्तिमान आणि विचारी होता. परंतु त्याचे विचार फार घाणेरडे, घृणास्पद होते. नुकसानकारक होते. म्हणून त्याचे कार्यही. तसेच विनाशक आणि भयानक होते. त्याच्यामुळे लाखो ज्यूंची हत्या करण्यात आली. लाखो लोक अनाथ, बेघर झाले. त्याची सगळी कामे म्हणजे ईश्वराची पूजा नसून सैतानाची उपासना होते. कारण त्यात असत्य, घृणा, स्वार्थ, हिंसा आणि पराकोटीची महत्त्वाकांक्षा याखेरीज काही नव्हते.

चांगल्या विचारातून केली जाणारी कर्मे म्हणजे खरोखरीची पूजा होय. ती आपणास ईश्वराजवळ घेऊन जातात. आपणास शक्ती, सुखसमृद्धी प्रदान करतात. त्यांच्याद्वारेच जगाचा विकास होऊन भले होते. आपण सतत कार्यमग्न राहणे हेच आपले परम कर्तव्य आहे. आपल्या कर्माना पूजेच्या पातळीपर्यंत घेऊन जावे, पूजा प्रार्थना हे एक सात्त्विक पवित्र कार्य आहे. म्हणून आपले प्रत्येकाचे कर्म पवित्र, सात्त्विक, शुभ आणि सर्वांना हितकारक असावे. ज्याला ईश्वराने प्रसन्नतेने स्वीकारावे व आपल्याला आशीर्वाद द्यावा.

पुढे वाचा:

Leave a Reply