दूरचित्रवाणी निबंध मराठी – Durchitravani Nibandh in Marathi

महाभारतकाळात जे युद्ध झाले त्या युद्धाची खडानखडा बातमी दिव्य जे दृष्टी लाभलेला संजय अंध धृतराष्ट्रास सांगत असे म्हणतात. मला तर वाटते की आजच्या जगातील दूरचित्रवाणी म्हणजे आपल्याला लाभलेली दिव्य दृष्टीच आहे.

पूर्वीच्या काळी माणसाच्या गरजा अगदी मर्यादित होत्या. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी मिळाल्या की तो समाधान पावत असे. परंतु हळूहळू तो आपल्या बुद्धीचा वापर करून निसर्गावर विजय मिळवू लागला. आपले खडतर जीवन सुसह्य करण्यासाठी त्याने विज्ञानाची कास धरली आणि तो नवीन नवीन शोध लावू लागला. मग त्याच्या गरजाही वाढू लागल्या. रोजच्या जीवनातील कष्ट कमी झाल्यामुळे त्याला फावला वेळही मिळू लागला आणि त्या वेळात आपले मनोरंजन व्हावे म्हणून तो धडपडू लागला. ह्या गरजेतूनच टीव्ही उर्फ दूरचित्रवाणीचा शोध लागला.

१९२५ साली इंग्लंडमध्ये बेसर्ड नामक शास्त्रज्ञाने सर्वप्रथम टीव्हीचा शोध लावला. भारतात दिल्ली येथे १९५७ साली टीव्हीचे आगमन झाले, त्यानंतर मुंबईत दूरदर्शन येण्यासाठी १९७२ साल उजाडावे लागले. गंमत म्हणजे त्यानंतर फारच थोड्या कालावधीत संपूर्ण जगाला टीव्हीने व्यापून टाकले. बहुमजली आलिशान इमारतीपासून तो पार पत्र्याच्या चाळीपर्यंत पोचला.

टीव्ही म्हणजेच दूरचित्रवाणी. दूरवरच्या गोष्टींचे दर्शन घडवणारा म्हणून त्याला दूरदर्शन असेही म्हटले जाते. त्यातून आपल्याला घरबसल्या जगात काय चालले आहे त्याची प्रत्यक्ष चित्रांसह माहिती मिळते. धार्मिक स्थळे, ऐतिहासिक इमारती, वेगवेगळे पुरातत्व अवशेष इत्यादींची माहिती देणारे लघुपट टीव्हीवर प्रदर्शित होतात. टीव्ही कॅमेरे लावूनच जेव्हा समुद्राच्या अंतरंगात काय असते ह्याचे दर्शन आपल्याला घडले तेव्हा आपण आश्चर्याने थक्कच झालो. १९६९ साली नील आर्मस्ट्रॉन्ग जेव्हा सर्वप्रथम चंद्रावर गेला तेव्हा चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत विवरांनी भरलेला आहे हे पाहून आपण अगदी आश्चर्यचकीत झालो होतो.

टीव्ही हे शिक्षणाचे अत्यंत चांगले माध्यम आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यावरून रोज शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जातात. विज्ञानापासून अगदी स्वयंपाकघरापर्यंत कार्यक्रम त्यावर दाखवले जातात. पर्यटनाविषयीही कार्यक्रम दाखवले जातात त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या देशातील लोक, त्यांचे वेष आणि संस्कृती ह्यांची माहिती होते. शेतकी, घरगुती औषधोपचार, पशूजगत, गीत, संगीत, शास्त्रीय शोध, चित्रपट, सणांची माहिती, मुलांचे कार्यक्रम, इतिहास इत्यादी विषयावर माहिती देणा-या वेगवेगळ्या वाहिन्याच हल्ली टीव्हीवर सुरू झाल्या आहेत. त्याशिवाय चोवीस तास ताज्या बातम्या देणा-या वाहिन्याही सुरू झाल्या आहेत.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या राष्ट्रीय दिवसांच्या दिल्लीला होणाया कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवरून देशभर दाखवले जाते. त्याशिवाय प्रसिद्ध नेते, खेळाडू, कलाकार ह्यांच्याही मुलाखती टीव्हीवर दाखवल्या जातात.

घरबसल्या आणि फारसे पैसे खर्च न करता उपलब्ध होणारे मनोरंजनाचे उत्तम साधन म्हणजेच टीव्ही.

परंतु तसे जरी असले तरी टीव्हीचे काही तोटेही आहेत. कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. मुले दिवसभर टीव्ही बघतात, खेळत नाहीत, सिनेमातील वाईट गोष्टींचा, हिंसाचाराचा त्यांच्या कोवळ्या मनावर लगेच परिणाम होतो. टीव्हीवर जाहिरातींचाही भडीमार असतो. त्या पाहून मुले आईवडिलांकडे नको त्या गोष्टींचाही हट्ट धरतात.

टीव्हीवरील चांगले कार्यक्रम न बघता सवंग करमणूक असलेल्या मालिका लोक अधिक आवडीने पाहातात. तसेच चोवीस तास नव्या बातम्या कुठून आणणार म्हणून कधीकधी बातम्या नव्याने निर्माण केल्या जातात.तेही अगदी चुकीचे आहे. थोडक्यात काय, कुठेही तारतम्य हे हवेच.

पुढे वाचा:

Leave a Reply