केल्याने देशाटन मराठी निबंध – Kelyane Deshatan Nibandh Marathi

‘केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार, ग्रंथ शास्त्र विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार,’ असे आपल्या मराठीत समर्थ रामदास स्वामींनी म्हणून ठेवले आहे ते अगदी यथार्थच आहे.

आपण कामानिमित्त, मनोरंजनासाठी किंवा अन्य सामाजिक कारणांनी प्रवास करीत असतो. प्रवासातील अनुभवांनी आपल्याला खूप काही शिकायला मिळते. गाडी बंद पडण्यासारख्या अनपेक्षित समस्याही समोर अचानकपणे उभ्या राहातात. प्रवासात आपल्याला नेहमीच सतर्क आणि सावध राहावे लागते. तसेच वेगवेगळ्या लोकांचे स्वभावही समजतात. चांगलेवाईट ह्यातील फरक समजतो. व्यापार आणि व्यवसाय कसा करावा हे समजते. आपण निसर्गाच्या जवळ जातो. आपले व्यक्तिमत्व सुधारते. वेगवेगळ्या लोकांशी संपर्क झाल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. एकुणच प्रवास केल्यामुळे आपल्या अंगी व्यवहारचातुर्य येते ह्यात काहीच शंका नाही.

त्याशिवाय हल्ली लोकांना हौसेने पर्यटन करायला फार आवडू लागले आहे कारण एकुणच कुटुंबे छोटी झाल्याने आणि सगळेच कामात व्यस्त असल्याने कुणाच्या घरी जाण्यासारखी परिस्थिती फारशी उरलेली नाही.शिवाय लोकांना कंपनीतून फिरण्यासाठी लीव्ह फेअर कन्सेशन मिळते. तसेच हल्ली पर्यटनकंपन्याही पुष्कळ निघालेल्या आहेत. विमाने, आगगाड्या, हॉटेले अशा सर्व सोयीसुविधाही वाढल्या आहेत. त्यांचे ऑनलाईन बुकींगही करता येत असल्यामुळे लोक हल्ली फिरायला बाहेर पडतात.

खरोखर अधिक प्रवास करणारी व्यक्ती अधिक प्रसंगावधानी होते, अधिक लोकप्रिय आणि बुद्धिमान होते. विद्यार्थ्यांनी तर प्रवासाची प्रत्येक संधी घेतली पाहिजे. शाळांनीही शैक्षणिक सहली आयोजित करून मुलांना किल्ले, लेणी, जुनी ऐतिहासिक मंदिरे दाखवली पाहिजेत, तसेच जंगलात नेऊन त्यांची निसर्गाशी ओळख करून दिली पाहिजे.

प्रवासाचे फायदे मिळण्यासाठी कान, डोळे आणि मन उघडे ठेवून वावरावे. शिकण्याची इच्छा मनात ठेवावी. म्हणजे मग आपण आपले आयुष्य भरभरून जगले ह्याचा आनंद निश्चितच मिळतो.

पुढे वाचा:

Leave a Reply