खेळ आणि खिलाडूपणा मराठी निबंध

लहान मुलांना खेळायला खूप आवडते. त्यांना मुळी हे सारे जगच नवे असते, त्यातच त्यांच्या शरीराचीही वाढ होत असते. ही वाढ होत असताना त्यांच्या शरीरात प्रचंड उर्जा ठासून भरलेली असते. त्या उर्जेचा निचरा होण्यासाठीच मुलांला खेळायला मिळाले पाहिजे, भरपूर खेळायला मिळाले पाहिजे. पण आजकाल तसे होत नाही. कारण आजकाल मुलांना सोसायटीत खेळायला जागा नसते. दोन इमारतींच्या मधल्या भागात खेळले की तळमजल्यावर राहाणा-या लोकांच्या घरांच्या काचा फुटून ओरडा खावा लागतो.

आसपास मैदाने किंवा बागा नसतात. मग घरात बसून टीव्ही पाहाणे किंवा मोबाईलवर खेळ खेळणे ह्यात त्यांना त्यांचा वेळ घालवावा लागतो. त्यातच भर म्हणून शाळा लांब असल्याने रोज दोन दोन तास शाळेत जाण्यायेण्यातच वाया जातात. शिवाय अभ्यास, शिकवणी ह्या सगळ्या रगाड्यातून वेळ मिळाला तर ती मुले मैदानावर जाणार ना?

अर्थात् हे मी शहरात राहाणा-या मुलांबद्दल सांगतो आहे. इतर ठिकाणी मुलांना खेळायला मिळत असेलच. माझ्या बाबांना ह्याची जाणीव असल्यामुळे ते आम्हाला दर सुट्टीत फुटबॉलच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याशिवाय दर रविवारी त्यांच्यासोबत आम्हाला पोहायला घेऊन जातात.

कधीकधी बॅडमिंटनचे कोर्ट बुक करून आम्ही सोसायटीतील मुले तिथे खेळायला जातो.सायकलही चालवतो. मुलांना खेळाची आवड लावली की ती बहकत नाहीत, वाममार्गाला लागत नाहीत. म्हणून सर्वच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.

मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही खेळले पाहिजे. कारण त्यामुळे व्यायाम घडतो. सर्व स्नायू लवचिक होतात. हृदयाचे स्नायूही बळकट झाल्यामुळे हृदयविकारा- सारखा आजार होत नाही. खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहातेच. मग अशा ह्या तंदुरूस्त शरीरातले मनही घट्ट, समतोल आणि आनंदी का बरे राहाणार नाही?

त्याशिवाय खेळ खेळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्व फार आहे. लहानपणी तर सर्वांनाच खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply