काश्मीरचे मनोगत निबंध मराठी

माझ्या भारतवासीयांनो, मी तुमचा लाडका ‘काश्मीर’ तुमच्याशी बोलतो आहे. आता कित्येक वर्षांनंतर माझ्या या निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आहे. आता तरी या स्वर्गभूमीचे भाग्य उजळणार का? पुन्हा प्रवाशांची, पर्यटकांची गर्दी माझ्या भेटीसाठी होईल का? तसे झाले तर मी त्यांचे अवश्य प्रेमभराने स्वागत करीन.

मी त्यांना म्हणेन की, या मुशाफिरांनो, या ! मी काश्मीर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने तुम्ही येथे येता, त्यासाठी एवढा दूरवरचा प्रवास करता, खूप पैसे खर्च करता आणि काय पाहता? उंच हिमाच्छादित पर्वतशिखरे, आकाशाला भिडणारे देवदार वृक्ष आणि हसणारी गुलाबपुष्पे ! पर्यटकमित्रांनो, हे झाले या काश्मीरचे बाह्यांग; पण तुम्ही माझ्या अंतरंगात कधी डोकावून तरी पाहिले आहे का?

मी सुंदर आहे. भारताचा स्वर्ग आहे हे कविजनांनी केलेले माझे वर्णन ऐकून माझे कान आता किटले आहेत. माझ्या डोळ्यांतील अश्रू तुम्हांला दिसत नाहीत; कारण ते पार आटून गेले आहेत. माझे हे पुत्र-काश्मीरचे खरे नागरिक-अगदी दारिद्र्यावस्थेत जीवन कंठत आहेत. त्यांतील बरेचजण या सरोवरातील मोडक्यातोडक्या बोटींवरच राहतात. त्या पाण्यावर शेती करतात. दिवसभर ऊर फुटेस्तोवर प्रवाशांसाठी वल्ही मारतात. गालिच्यांच्या कारखान्यात राब राब राबतात. पण त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही. त्यांच्या अंगावरील जीर्णशीर्ण वस्त्रे पाहिलीत? हे लोक अप्रतिम शाली विणतात, त्यावर सुंदर कशिदा काढतात; पण शालीचे सुख त्यांना किती मिळते? त्यांच्या शरीरावरील गरम कपडे मात्र फाटकेच आहेत.

साऱ्या जगातून येणाऱ्या प्रवाशांनो, आता तर माझे मन अधिकच विदीर्ण झाले आहे. माझे सारे शरीरही रक्तलांच्छित झाले आहे. कारण ज्या माझ्या सौंदर्याचा मला आणि तुम्हांला अभिमान होता, तेच माझे सौदर्य आज माझ्या दुःखाला कारण झाले आहे. माझ्यावर अधिसत्ता गाजवण्यासाठी, माझे लचके तोडण्याच्या कामी आज जगातील अनेक उन्मत्त

सत्ताधीश गुंतले आहेत. त्यामुळे आज माझ्या मातीत अराजक माजले आहे. निरपराध नागरिकांची विनाकारण हत्या होत आहे. त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ आहे. कशी बरे मला माझी हरवलेली शांती पुन्हा गवसेल?”

पुढे वाचा:

Leave a Reply