ग्रंथालयाचे मनोगत निबंध मराठी – Grantha Che Manogat in Marathi

“मित्रांनो, मी आहे एक ग्रंथालय. या सप्ताहात येथे जी मोठमोठी भाषणे झाली, त्यांनी तुम्हांला माझा इतिहास ऐकवला, तो संपूर्ण असत्य नाही; पण त्यातील काही भ्रामक सत्याने तुम्हा श्रोत्यांची दिशाभूल झाली. ही दिशाभूल दूर करण्यासाठीच मी आज बोलत आहे. एका विद्वानाच्या वैयाक्तिक ग्रंथसंग्रहातून माझा जन्म झाला. ग्रंथ खरेदी करून त्याचे वाचन करण्याचे त्या माणसाला विलक्षण वेड होते.

तो त्याचा छंदच होता. स्वत:च्या मृत्यूपूर्वी हजारो पुस्तकांचा संग्रह असलेले आपले ग्रंथालय त्याने सर्वांसाठी खुले केले. पुढे या ग्रंथालयाची जबाबदारी शासनाने उचलली आणि हे ‘शासकीय सार्वजनिक नगरवाचनालय’ बनले. या घटनेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली.

या नव्या रूपात माझा खूप विस्तार झाला. माझ्यासाठी ही स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. येथे पुस्तके ठेवण्यासाठी खास कपाटे बनवण्यात आली. ग्रंथांची देखभाल करण्यासाठी माणसे नेमण्यात आली. तरीही जीवन सार्थकी लागल्याचे समाधान मला वाटत नाही.

येथे येणाऱ्या लोकांपैकी किती जण खरेखुरे वाचनाचे भोक्ते असतात ! काही जण वळ नित्यनियमाची सवय म्हणून येतात, तर काही जण केवळ रिकामा वेळ घालवण्यासाठी येतात. हे ठिकाण कित्येकांच्या भेटीचे संकेतस्थळ बनले आहे. असा अनिष्ट हेतू ठेवून येणाऱ्या लोकांचे ‘ग्रंथां ‘शी सोयरसुतकही नसते.

आता वाचक म्हणून येणारा बराच मोठा वर्ग हा दैनिके, मासिके, नियतकालिके यांच्यापाशीच घुटमळणारा असतो. त्यांना नैमित्तिक राजकारण व गावाच्या परिसरातील भानगडी यांतच रस असतो. रीतसर वर्गणी भरून घरी वाचायला पुस्तके नेणारा दुसरा एक वर्ग आहे. हे लोक स्वत:ला मोठे वाचक, विद्वान समजतात. पण यांची मागणी असते ती कथा-कादंबऱ्यांच्या पुस्तकांची, क्वचित कवितासंग्रहांची.

माझे दुःख हेच आहे. या नगरवाचनालयातील खऱ्या ज्ञानाचा साठा असणाऱ्या ग्रंथसागराकडे कोणी वळत नाही. किती तरी अमूल्य ग्रंथ आज वर्षानुवर्षे धूळ खात पडले आहेत. आजसुद्धा पाहा, या इमारतीची रंगसफाई झाली; पण ते ज्ञानमय ग्रंथ कोणी झटकले देखील नाहीत.

त्यामुळे मग त्यांना वाळवी लागते; कसर लागते. अहो, येथील कित्येक ग्रंथ गहाळ झाले आहेत. ज्या माणसांनी ते नेले त्यांनी ते परतच केले नाहीत. ‘ग्रंथालये म्हणजे ज्ञानाची सदावर्ते,’ असे साहित्यसम्राट न. चिं. केळकर सांगून गेले; पण या सदावर्तीकडे कोणी ज्ञानपिपासू फिरकत नाही, हीच माझी व्यथा आहे.”

ग्रंथालयाचे मनोगत निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply