कागदाची गोष्ट मराठी निबंध – Kagdachi Gosht Nibandh In Marathi

कागद हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सर्व जण जाणतात. कागद नसलेल्या जगाची कल्पना आज आपण करूच शकत नाही. लिहिल्या-वाचण्याखेरीज कागदाचे अन्य किती तरी उपयोग आहेत. अतिप्राचीन काळात मनुष्य दगडावर, खडकावर खोदकाम करून आपली लेखनवाचनाची हौस पुरवीत असे, पाषाणयुगानंतर मनुष्याने मातीच्या पाट्या व स्लेटांचा लिहिण्यासाठी उपयोग केला. मानव झाडांची पाने व सालींचा उपयोग लिहिण्यासाठी करू लागला. ४००० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये लोक पेप्यिरसच्या झाडाच्या सालीचा उपयोग लिहिण्यासाठी करू लागले होते. पेपर हा शब्द त्याच ‘पेप्यिरस’ पासून निर्माण झाला आहे.

भारतात भोजपत्र आणि ताडपत्रांचा उपयोग प्राचीन काळापासून लिहिण्यासाठी केला जात असे. भोजपत्रावर लिहिलेली अनेक प्राचीन पुस्तके व ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. या हस्तलिखितांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. झाडाची पाने आणि सालीखेरीज चामड्यांचा उपयोगही लिहिण्यासाठी केला जात असे. त्यास पार्चमेंट म्हणत. मध्ययुगात शेळ्या मेंढ्यांच्या कातडीपासून पार्चमेंट बनवून त्याला चौकोनी आकारात कापले जाई. नंतर त्याची पुस्तकाच्या आकारात बांधणी केली जाई. अशा प्रकारे पुस्तकाची निर्मिती सुरू झाली. ही मध्ययुगीन पुस्तके प्रारंभी केवळ धार्मिक असत. नंतर कायद्याची, औषध-शास्त्राची इतिहासाची पुस्तके तयार होऊ लागली. कागदाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागला.

चिनी प्रवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी ही कला समरकंदला नेली. तेथील अरबी लोकांनी ती शिकून घेतली. त्यांनी कागद बनविण्याची कला स्पेनमध्ये नेली. तिथून ती इंग्लंड व साऱ्या युरोप खंडात पसरली. हळूहळू या कलेचा विकास होत गेला आणि मग यात यंत्रांचा वापर होऊ लागला. १७९८ मध्ये सर्वप्रथम फ्रान्समध्ये कागद बनविण्याचे यंत्र तयार करण्यात आले. आज कागद तयार करण्याची मोठमोठी यंत्रे उपलब्ध आहेत. त्याद्वारे हजारो टन कागद तयार केला जातो. आज कागद तयार करण्यासाठी रद्दी कागद, गवत, जुने कपडे, चिंध्या, बांबू इत्यादींचा वापर केला जातो. आजही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हात कागद तयार केला जातो. परंतु व्यापक प्रमाणावर यंत्रांनीच कागद तयार करतात. त्याचा खपही खूप असतो.

कागदाचा पहिला कारखाना इंग्लंडमध्ये काढण्यात आला. कागद बनविण्यासाठी सर्वप्रथम गवत, बांबू, चिंध्या इ. कुटून खूप बारीक करतात. नंतर त्यात वेगवेगळे मसाले (रसायने) टाकून त्याला घुसळण्यात येते. त्यामुळे त्याचा लगदा तयार होतो. नंतर याचाच कागद बनतो. ही सर्व कामे मोठ-मोठ्या यंत्रांद्वारे केली जातात. अशाप्रकारे आपणास कागदाचे थान मिळतात. आवश्यकतेनुसार ते कापून रीम, दस्ते बनवितात. आज आपण जो कागद वापरतो तो चोपडा व मजबूत असतो. गुणवत्ता आणि उपयोगाच्या दृष्टीने अनेक प्रकारचा कागद तयार केला जातो. उदा. वृत्तपत्रे आणि नोटांसाठी वेगवेळ्या प्रकारचा कागद वापला जातो. कागद जसे वरदान आहे तसा तो शापही आहे. कारण त्याच्या उत्पादनासाठी वनसंपत्तीचा विनाश होतो,

आज कागद उद्योग जगातील एक अत्यंत विकसित व महत्त्वाचा उद्योग झाला आहे. लाखो लोकांना यात रोजगार मिळाला आहे. परंतु कागदाचा उपयोग आपण विचारपूर्वक केला पाहिजे. जो वाया न घालविला पाहिजे. एकापेक्षा जास्त वेळा त्याचा वापर केला पाहिजे. झाडांच्या बेसुमार कापणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. संगणक, क्रेडिट कार्ड यामुळे कागदाचा वापर कमी होत आहे. कार्यालयात कागदविहीन काम केले जात आहे. तरी ही कागदाचे महत्त्व, उपयोग आणि वैशिष्ट्ये कायम राहतील. कागद, आपणासाठी वरदान असले तरी त्याचा उपयोग विचारपूर्वक काटकसरीनेच केला पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply