कागदाचे आत्मवृत्त मराठी निबंध – Kagda Che Atmavrutta Nibandh Marathi

मुलांनो, मी आहे कागद.मी जर नसतोच, तर तुम्ही तुमची उत्तरपत्रिका कशावर लिहिली असती, सांगा बरे! मग तुम्ही तुमची अभ्यासाची पुस्तकं तरी कशी वाचली असती? सगळं काही केवळ ‘पाठांतर’ ह्याच स्वरूपात लक्षात ठेवायचं म्हणजे फारच कठीण काम आहे बुवा ! खूप खूप पूर्वी जेव्हा माझा शोध लागला नव्हता तेव्हा आपल्या भारतात वेद रचले गेले. सुरूवातीला ते श्रृती म्हणजे ऐकलेले आणि स्मृती म्हणजे लक्षात ठेवलेले- अशा स्वरूपात होते.

फार पूर्वी माणसाला लेखनकला अवगत नव्हती त्यामुळे जे काही तोंडी सांगितले जाई ते पाठ करून ठेवले जाई आणि पाठांतर केलेले ज्ञान अशा त-हेने एका पिढीकडून दुस-या पिढीत जात होते. परंतु पुढे भूर्जपत्राचा शोध लागला आणि मानवाला लेखनकला अवगत झाली. ह्या भूर्जपत्रांवर तो लाकडी बोरूच्या सहाय्याने लिहू लागला. महाभारतसुद्धा व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहून घेतले अशी संकल्पना आहे. भूर्जपत्रांवर लिहिलेली प्राचीन पुस्तके आजही भारतात काही ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत.

जुन्या काळी झाडांच्या पानांबरोबर चामड्याचासुद्धा लेखनासाठी उपयोग करीत होते. त्या कागदाला पार्चमेंट असा शब्द होता. मेंढीच्या चामड्यापासून चौकोनी पार्चमेंट तयार करून त्यांची पुस्तकी बांधणी केली जात असे. पार्चमेंटवर लिहिलेले बायबल इतिहाससंशोधकांना सापडले आहे. त्याशिवाय माणूस दगडांवर, खडकांवरही शिलालेख कोरून ठेवत असे. ४००० वर्षांपूर्वी इजिप्तमधील लोक पेपिरसच्या झाडाच्या सालीचा उपयोग करून लिहित होते.पेपर हा शब्द पेपिरस ह्या नावावरूनच निर्माण झाला आहे.

परंतु कागदाचा शोध लागला तेव्हा लेखनयुगात मोठी क्रांतीच झाली. आत्ता आपण जो कागद वापरतो त्याचा शोध चीनमध्ये लागला. चिनी प्रवाश्यांनी आणि व्यापा-यांनी ही कागद बनवण्याची कला समरकंद येथे नेली. तिथल्या मध्य आशियाई लोकांनी ती कला शिकून घेतली. त्यांच्याकडून ती कला स्पेन येथे गेली.तिथून ती इंग्लंड आणि अन्य युरोपात पसरली. पुढे पुढे कागद बनवण्यासाठी यंत्रांचा वापर होऊ लागला. कागद तयार करण्याचे यंत्र सर्वप्रथम फ्रान्स येथे१७९८ साली बनवण्यात आले.

आज कागद बनवण्यासाठी मोठमोठी यंत्रे उपलब्ध आहेत. ह्या कागदगिरण्यांतून हजारो टन कागद निर्माण केला जातो. त्यासाठी रद्दी कागद, गवत, जुने कपडे, चिंध्या आणि बांबूंचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या दर्जाचा कागद लागतो. उदाहरणार्थ, वृत्तपत्रासाठी हलक्या प्रतीचा कागद लागतो तर चलनी नोटा बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारचा कागद लागतो.

कागदाचा वापर जपूनच करायला हवा कारण त्यापायी जंगले तुटतात. तसेच हल्ली संगणक, इंटरनेट, क्रेडिट कार्ड ह्यांच्या माध्यमातून बरेचसे पत्रव्यवहार आणि आर्थिक व्यवहार कागदाशिवायच होऊ लागले आहेत ही एक स्तुत्य गोष्ट आहे. हल्लीच्या परीक्षासुद्धा ऑनलाईन होतात. बँकेचे व्यवहार, कंपन्यांचे अहवाल अशा ब-याच गोष्टी हल्ली ईमेलनेच पाठवल्या जातात.

हे सर्व चांगले आहे. दिवसेंदिवस माझा उपयोग तुम्ही कमीत कमी केलात तरते निसर्गाच्यादृष्टीनेही चांगलेच आहे, नाही का?

पुढे वाचा:

Leave a Reply