माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी – Maza Avadta Mahina Shravan Nibandh
मराठी महिन्यांप्रमाणे सृष्टीच्या ऋतुचक्रात सलग येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना. आषाढ महिन्यातला कोसळणारा पाऊस थोडासा शांत झालेला असतो. श्रावण महिन्यात ऊनपावसाचा लपंडाव सुरू होतो. श्रावण महिन्याबद्दल बोलताना बालकवींच्या ‘श्रावणमास’ कवितेला विसरून कसं चालेल !
“श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे”
श्रावण महिन्यात लतावेली, वृक्ष बहरून येतात. वातावरण खरोखरच आल्हाददायी असतं; मनाला सुखावणारं असतं.
श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना आहे, सण उत्सवांचा महिना आहे, नाती जोडणारा महिना आहे. नागपंचमी’ च्या दिवशी नागाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा उत्सव. ‘दहिहंडी’ हा सण एकात्मता’ शिकवतो. उंच बांधलेली हंडी हे उच्चतम ध्येयाचं प्रतीक आहे. श्रावण महिन्यात गावाकडे हिंदोळ्याचा खेळ रंगतो.
“फांदयावर बांधिले गं मुलींनी हिंदोळे
पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले”
असं त्या सणाचं वर्णन केलं जातं.
श्रावण पौर्णिमा म्हणजे राखी-पौर्णिमा. बहीण-भावाचं पवित्र नातं जपणारा हरा सण. हीच पौर्णिमा नारळी पौर्णिमा’ म्हणूनही ओळखली जाते. कोळी बांधव समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. या दिवसापासून सागरी वाहतूक सुरू होते. कारण आषाढ महिन्यात खवळलेला समुद्र आता शांत झालेला असतो. श्रावण महिन्यात अमावस्येला गावाकडे बैलपोळा साजरा होतो. बैलांची पूजा केली जाते. हाच दिवस ‘मातृदिन’ म्हणूनही साजरा होतो.
श्रावण महिन्यातलं आणखी एक महत्त्वाचं व्रत म्हणजे मंगळागौरीचं व्रत. कवयित्री अरूणा ढेरे या महिन्याचं वर्णन करताना म्हणतात,
“चार दिसांवर उभा ओला श्रावणझुलवा
न्याया पाठवा भावाला, तिला माहेरी बोलवा
मंगळागौरीच्या व्रताच्या निमित्तानं सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. मंगळागौरीच्या खेळात रात्र जागवली जाते.
श्रावण महिन्याकडे बघण्याचा प्रत्येक कवीचा दृष्टीकोण वेगळा आहे. ‘कुसुमाग्रज’ म्हणतात,
“हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला”
तर कोणी म्हणतं, ‘समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा महिना’. इथे ‘पाचवा महिना’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. सलग येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण हा एक अर्थ, तर ‘सृष्टी’ ही गर्भवती आहे. तिला पाचवा महिना लागला आहे. कारण काही महिन्यातच नवनवीन लतावेलींच्या रूपानं नवे जीव या सृष्टीच्या पोटी जन्माला येतील.
कवयित्री शांता शेळके श्रावणाचं वर्णन करताना म्हणतात,
“मनभावन हा श्रावण,
भिजवी तन भिजवी मन श्रावण, प्रिय साजण”
थोडक्यात श्रावण महिना हा सर्वांमध्ये चैतन्याची जागृती करतो. या महिन्यात आकाशात दिसणारं इंद्रधनुष्य मनाला भुरळ घालतं आणि आपण त्या श्रावण महिन्याचा आनंद घेण्यात तल्लीन होऊन जातो.
पुढे वाचा:
- श्रावणातील गमती जमती निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- शेत मळ्याला भेट मराठी निबंध
- शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध
- शेकरू प्राणी निबंध मराठी
- शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी
- शिष्टाचार मराठी निबंध
- शिंपी मराठी निबंध
- आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी
- शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध
- शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी निबंध
- शाळेची सहल मराठी निबंध
- शाळेची घंटा वाजलीच नाही तर निबंध मराठी
- शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी