Set 1: शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी – Shistiche Mahatva Marathi Nibandh

शिस्त म्हणजे वागण्यातील नियमितपणा. शिस्त म्हणजे संयम. शिस्त म्हणजे नियमांचे पालन. शिस्त म्हणजे लगाम. माणसाने स्वतःच्या मनाला शिस्त लावली पाहिजे.

शिस्तीचे धडे लहान मुले अगोदर घरात आपल्या आईवडिलांपाशी गिरवतात. त्यानंतरचे पुढले धडे तीच मुले शाळेत गेल्यावर आपल्या शिक्षकांपाशी शिकतात. जी व्यक्ती प्रथमपासून शिस्तीचे आचरण करीत असेल तिला जीवनात सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात.

शिस्त ह्याचा अर्थ कायम लांब चेहरा करून बसणे आणि जीवनाचा आनंद अजिबात न घेणे असा नाही. असे आहे की आपल्यापाशी वेळ नेहमी थोडाच असतो. त्या थोडक्या वेळात आपल्याला ब-याच गोष्टी पार पाडायच्या असतात. उदाहरणार्थ, गृहपाठ करायचा असतो, कविता पाठ करायची असते, टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचा असतो. घरातले काहीतरी काम करायचे असते. शिकवणीला जायचे असते. शिवाय एवढे सगळे करून खेळायलाही जायचे असतेच. अशा वेळी जर आपण शिस्त पाळली आणि कामांचा क्रम ठरवला की मग मनावर ताण येत नाही. खेळायच्या वेळेवर खेळता येते आणि अभ्यासाच्या वेळेवर अभ्यासही होतो.

शिस्त ही स्वतःने स्वतःला लावून घेतलेली असली तरच तिचा उपयोग होतो. त्यालाच स्वयंशिस्त असे म्हणतात. दुस-याने शिस्त लादली की ती मोडण्याकडेच माणसाचा कल असतो. पूर्वी मुलांना शिस्त लागावी म्हणून शाळेत गुरूजी छडी मारायचे.” छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ असे मुळी चित्रपटातले एक गाणेच होते. परंतु नंतर बालमानसशास्त्रज्ञांनी शोधून काढले की शिस्तीचा अतिरेक केला की मुले कोडगी तरी होतात किंवा मग खूप भित्री तरी होतात.

मुलांचे व्यक्तिमत्व जर उत्तम त-हेने विकसित व्हायचे असेल तर त्यांना शिस्तीचा जाच करता कामा नये.

आपल्या देशातल्या लोकांना सार्वजनिक जीवनात एकुणच शिस्त पाळायला फारसे आवडत नाही. कचे-यांत कर्मचारी वेळेवर जात नाहीत. लोकसभेत देशापुढील समस्या सोडवण्याऐवजी गदारोळ आणि आरडाओरडा करण्यातच लोकप्रतिनिधी आपला वेळ वाया दवडतात. लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. ही परिस्थिती भयावह आहे. एक देश म्हणून जर आपल्याला प्रगती करायची असेल तर सर्वांनीच शिस्त लावून घेणे आवश्यक आहे.

निसर्गसुद्धा शिस्तप्रिय आहे. सूर्य रोज वेळच्या वेळी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. नद्या आपला मार्ग बदलून भलत्याच दिशेने वाहात नाहीत. आता पावसाळ्यात नदीला पूरच आला तर मात्र ती आपला मार्ग बदलून भरपूर भूभाग पोटात घेते. त्या बेशिस्तीमुळे काय गोंधळ उडतो ते आपल्याला माहिती आहेच.

तर असे आहे शिस्तीचे महत्व.

Set 2: शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी – Shistiche Mahatva Marathi Nibandh

शिस्त या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे नियमांचे पालन करणे. आपल्या मार्गदर्शकांच्या आदर्शाने पालन करीत नियमबद्ध जीवन व्यतित करणे म्हणजे शिस्त. शिस्तीचे पहिले केंद्र म्हणजे आई वडील, ज्यांच्याकडे मूल शिस्तीचे प्राथमिक धडे शिकत. त्यानंतर शाळेत गेल्यावर गुरुजनांकडून शिस्तीचे पुढचे धडे शिकते. जी व्यक्ती प्रथमपासून शिस्तीत असेल तो सर्व समस्यांची सोडवणूक भविष्यात करू शकते. आपले आई-वडील, गुरुजनांचा आदर करेल.

शिस्त लागण्यासाठी शाळा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. इथे मुलांना शिस्तीचे पूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. म्हणजे ते वर्गात भांडणार नाहीत, गुरुंचा आदर करतील, त्यांचा मान राखतील, वर्गात शिक्षक नसताना गोंधळ करणार नाहीत. वर्गात शिकविल्या जाणाऱ्या पाठांचा अभ्यास करतील. पाश्चात्य देशांत आधी मुलांना शिस्त शिकविली जात. शिस्तप्रियता त्यांच्यात ओतप्रोत भरली जाते. पाश्चात्य देश शिस्तीत जितके पुढे आहेत तितकाच भारत मागे. मात्र शिस्तीच्या नावाखाली लहान मुलांना जास्त शिक्षा करू नये. मग ते गुन्हेगाराप्रमाणे शिस्तभंग करण्याच्या शोधात राहतात.

आपल्या देशात शिस्तीची स्थिती फार भयानक आहे. कार्यालयात कर्मचारी वळेवर जात नाहीत. भ्रष्टाचाराशिवाय कामे होत नाहीत. विधानसभेत देशातील प्रश्न सोडविण्याऐवजी शिवीगाळ, गोंधळ होता. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिस्त असणे आवश्यक असते. आपली लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर शिस्त पालन करणे महत्त्वाचे आहे.

शिस्तीत राहूनच व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकते. फक्त मानवच शिस्तीत राहतो असे नाही तर निसर्गही शिस्तीतच राहतो. जर नदी बेशिस्त झाली तर हाहा:कार माजेल. सूर्य चंद्राचा उदय अस्त वेळेवरच होतो. सर्व ऋतू वेळेवर येतात/जातात. झाडे वेळेवर फुले, फळे देतात. निसर्ग क्षणभर जरी बेशिस्त झाला तरी प्रलय होईल. निसर्ग जर शिस्तीत राहू शकतो तर आपण का नाही?

शिस्त जीवनाला सुखमय बनविते. जीवनाला ध्येयाकडे घेऊन जाते. ध्येयप्राप्ती माणसाला सुखी व संपन्न बनविते. सुंदर आणि बलवान राष्ट्राची कल्पना आपण शिस्तीत राहूनच करू शकतो.

शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी – Shistiche Mahatva Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply