शाळेतील शिपाई मराठी निबंध – Shalecha Shipai Essay in Marathi
आमच्या शाळेतील शिपायाचे नाव आहे केरू. हा केरू आम्हाला खूप आवडतो. तो सदैव खाकी गणवेषात असतो. त्याच्या डोक्यावरची टोपीसुद्धा खाकी रंगाचीच असते. आमच्या शाळेतली बालवर्गातली मुले केरूची टोपी उडवतात तेव्हा तो गंमतीने त्यांच्यामागे धावल्याचे नाटक करतो तेव्हा सर्वांना हसायला येते.
केरू वक्तशीर आहे. शाळा वेळेवर सुरू करण्याची, सोडण्याची आणि सर्व तासांची घंटा वाजवण्याची जबाबदारी तो अगदी निष्ठेने पार पाडतो. एखाद्या वेळेस तास खूप जास्त चालला असे वाटले तर आम्ही गंमतीने म्हणतो की केरू झोपला की काय? पण तसे कधीच होत नाही.
केरू खूप कामसू आहे. तो मालवणचा राहाणारा आहे. त्याला शाळेच्या आवारातच संस्थेने घर दिले आहे. तिथे तो आपल्या बायकोमुलांसह राहातो. त्याचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे.
केरूला अनेक जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. शाळा सुटल्यावर तो चौकीदाराचे कामसुद्धा करतो. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकांची खोली झाडणे आणि पुसणे हे काम तोच करतो. मुख्याध्यापकांना भेटावयास येणा-या व्यक्तींना तो क्रमाक्रमाने आत सोडतो. तसेच मुख्याध्यापकांनी घंटी वाजवून आत बोलावले की आत जाऊन त्यांनी सांगितलेले काम करतो.
केरू अगदी नम्र आणि आज्ञाधारक आहे. तो प्रत्येक शिक्षकाशी आणि शालेय कर्मचा-याशी आदराने बोलतो. त्याची बायको हिरा शाळेचे आवार आणि खोल्या झाडते. हे दोघे पतीपत्नी अगदी प्रामाणिकपणे आपले काम करतात. त्यांना झाडलोट करताना विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची एखादी वस्तू हरवलेली सापडली तर ते शाळेच्या कचेरीत ती जमा करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांनाच प्रेम वाटते.
मध्यंतरी केरूच्या मुलाला डेंग्यू झाला होता तेव्हा शाळेतील शिक्षकांनीच त्याला चांगल्या इस्तितळात भरती केले होते. त्या इस्पितळातील डॉक्टर शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी केरूच्या मुलाकडे खास लक्ष देऊन त्याच्यावर उपचार केले होते. असा आहे आमच्या शाळेचा शिपाई केरू.
आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी – Essay on School Peon in Marathi
शिपाई हा कोणत्याही संस्थेतील महत्त्वाचा कर्मचारी असतो. कार्यालयाच्या किंवा संस्थेच्या अधिकाऱ्यांचे आदेश कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे कार्य असते. इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत रामजी नावाचा शिपाई आहे. तो नेपाळचा राहणारा आहे. त्याची उंची पाच फूट आहे, पण शरीर सुदृढ आहे. तो एक गोरापान व उत्साही मनुष्य आहे. तो आठवीपर्यंत शिकलेला आहे.
रामजी ३० वर्षांचा आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण पत्नी व मुले नेपाळमध्ये त्याच्या आई वडिलांसोबत राहतात. रामजीला शाळेतच एक खोली राहण्यासाठी मिळाली आहे. तो तिथेच राहतो व स्वत:चे जेवण स्वत:च बनवितो.
रामजीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शाळा बंद झाल्यावर चौकीदाराचे काम करावे लागते. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकाचे कार्यालय झाडून पुसून स्वच्छ करावे लागते. त्यानंतर तो शाळेच्या कार्यालयांची साफ-सफाई करतो. नंतर गणवेश घालून शाळेच्या मुख्य फाटकाशी उभा राहतो. खाकी पँट, शर्ट, काळ्या टोपीत तो गुरखा पलटणीचा जवानच वाटतो. मुख्याध्यापक येताच त्यांची बॅग त्यांच्या कार्यालयात नेऊन टेवतो. भेटावयास येणाऱ्या पालकांना किंवा इतर व्यक्तिंना बाहेर बसवितो. मुख्याध्यापकांची परवानगी मिळाल्यानंतर क्रमाक्रमाने त्यांना आत पाठवितो. मुख्याध्यापकांचे आदेश तो इतर शिक्षकापर्यंत पोहोचवितो. तास पूर्ण झाल्याची घंटी वाजवितो. मुख्याध्यापकांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्याचे कामही त्यालाच करावे लागते.
रामजी अत्यंत नम्र व आज्ञाधारक आहे. तो प्रत्येक शिक्षकाशी व इतर कर्मचाऱ्यांशी आदराने बोलतो. तो मुलांचे लाड करतो. एकदा शाळेत माझी प्रकृती बिघडली तेव्हा त्यानेच मला रिक्षा करून घरी नेले.
शाळेच्या आवारात क्वार्टरमध्ये राहणाऱ्या शिक्षकांची कामे करून तो ५०-१०० रु. आणखी कमावतो. पगाराचा मोठा हिस्सा तो आपले आई वडील बायको मुलांसाठी घरी पाठवितो. रामजी कर्तव्यतत्पर व प्रामाणिक आहे. जर त्याला कुणा विद्यार्थ्याची किंवा शिक्षकांची एखादी वस्तू सापडली तर ती तो कार्यालयात जमा करतो. एकदा एका विद्यार्थ्याच्या आईची पर्स शाळेतच विसरली. घरी गेल्यावर ही गोष्ट तिच्या लक्षात आली ती सरळ रामजीकडे गेली. परंतु त्याने पर्स लगेच मुख्याध्यापकांकडे जमा केली होती. रामजीच्या प्रामाणिकपणावर खुष होऊन ती रामजीला १० रु. बक्षीस देऊ इच्छित होती पण त्याने ‘हे तर माझे कर्तव्यच होते’ असे म्हणून बक्षीस घेण्यास नकार दिला.
आमचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांनाच रामजी आवडतो. खरंच तो अतिशय चांगला माणूस आहे.
आमच्या शाळेचा सेवक – आमच्या शाळेचा चपराशी
गोविंद आमच्या शाळेचा चपराशी आहे. तो अतिशय मेहनती आणि ईमानदार आहे. सगळेजण त्याचं कौतूक करतात. तो अनेक वर्षापासून आमच्या शाळेत सेवा करतो. त्याचं वय जवळ-जवळ ३५ वर्ष इतकं आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनीमध्ये देखील तो आवडता आहे कारण तो हसरा आणि मनमिळावू आहे.
गोविंद नेहमी खाकी वर्दीत असतो. तो नेहमी मुख्याधापकाच्या कक्षाबाहेर स्टूलवर बसलेला असतो. परंतु त्याला बसण्यासाठी वेळच कुठे असतो. तो कामात नेहमी व्यस्त असतो. त्याचं मुख्य काम आहे मुख्याधापकाने केलेल्या आज्ञाचं पालन करणे. स्कूलची बेल वाजवणे त्याचेच काम. ऑफिस आणि मुख्याधापकाच्या कक्षाची चावी त्याच्याकडेच असते, तोच ती उघडतो बंद करतो. शाळा सुरू होण्याआधी
तो शाळेत दाखल होतो आणि सगळे गेल्यानंतर जातो. उत्तर प्रदेशातील कोण्यातरी गावातला तो आहे. परंतु अनेक वर्षापासून दिल्लीतच रहातो. त्याच्या गावात त्याचे वयोवृद्ध आईवडील आणि एक छोटा भाऊ रहातो. तिथे त्याला शेत-जमीन आहे आणि काही गायी-म्हशी देखील. गोविंद कधी-कधी सुट्या असल्यावर गावाकडे जातो, तो आपल्या आई-वडिलाचा फारच आदर करतो. तो नहमीच त्यांच्याबद्दल विचार करीत असतो.
गोविंद आमच्या शाळेचा अविभाज्य भाग आहे. तो नसेल तर आम्ही आमच्या शाळेची कल्पना देखील करू शकत नाही. तो .
गरीब आहे आणि त्याला पगार पण फार कमी आहे. पंरतु आम्ही पहातो की तो नेहमी समाधानी आणि शांत असतो. होळी–दिवाळीला आदी सणाला आम्ही त्याला मिठाई आणि छोट्या-मोठ्या भेटवस्तू देत असतो. यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं, परंतु तो स्वतः कधी कोणाला काहीही मागत नाही. घरी त्याला पत्नी आणि मुलगा आहे. त्याचं नाव रामजीवन आहे. तो पण कोण्या सरकारी कार्यालयात चपराशी आहे.
पुढे वाचा:
- शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध
- शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी निबंध
- शाळेची सहल मराठी निबंध
- शाळेची घंटा वाजलीच नाही तर निबंध मराठी
- शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी
- शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी
- शाळा नसती तर मराठी निबंध
- शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी
- शाळा आणि शिस्त मराठी निबंध
- शालेय जीवनातील गमतीजमती
- श्रमाचे महत्व निबंध मराठी
- शस्त्रबंदी निबंध मराठी
- शरदाचे चांदणे निबंध मराठी