Set 1: शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी – Shalecha Pahila Divas Nibandh Marathi

उन्हाळी सुट्टीत खूप मौज केल्यामुळे शाळेचा पहिला दिवस कधी उजाडला हे कळले सुद्धा नाही. आणखी चार दिवस सुट्टी वाढली असती तर खूप बरे झाले असते, असे मनामध्ये सारखे विचार येत होते; पण शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि मन शाळेकडे ओढ घेऊ लागले.

आईने माझी शाळेची बॅग केव्हाच स्वच्छ धुवून ठेवली होती. दप्तरात पुस्तके, वह्या, कंपासपेटी सारे काही भरले आणि मी मित्रांसमवेत शाळेला गेलो.

शाळेच्या आवारात खूप कचरा साचला होता. आम्ही सर्वांनी मिळून सफाई केली. शाळा आता आमच्यासारखीच स्वच्छ व नीटनेटकी दिसत होती. आम्ही सर्व मुले परिपाठासाठी ओळीने उभे राहिलो. मुख्याध्यापकांनी सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले. जाधव मॅडमनी आपल्या गोड आवाजात ‘खरा तो एकचि धर्म’ ही प्रार्थना सांगितली. पसायदान झाल्यावर आम्ही वर्गात गेलो. वर्गात जो तो आपली नवी पुस्तके मित्रांना दाखवण्यात गर्क ! प्रत्येकाजवळ सुंदर सुंदर पेन होते. आपला पेन किती सुरेख आहे हे प्रत्येकजण दाखवत होता. सुधीरकडे खूपच आकर्षक पेन होता. त्याच्याभोवती सर्वांनी घोळका केला होता.

गुरुजी वर्गात आले. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या आणि मराठीच्या तासाला सुरुवात केली. शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही खूप गंमती जमती केल्या आणि सायंकाळी घरी परतलो.

Set 2: शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी – Shalecha Pahila Divas Nibandh Marathi

वाढदिवस आणि सणांच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही. प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असते. त्याचा प्रभाव बालकाच्या मनावर पडतो.

जरी मी आज आठवीचा विद्यार्थी असलो तरी शाळेच्या पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते. माझी बहीण शारदा मंदिरमध्ये त्यावेळी शिकत होती. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. माझ्या आई बाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निश्चय केला. जेव्हा मी पाच वर्षांचा झालो तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले.

पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले. नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर सहा वाजता मी तयार झालो. दूध आणि नाश्ता केला. मी आवडीने शाळेचा गणवेश घातला. नवे बूट मोजे, दफ्तर पाहून मी उत्साहित झालो. माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला कारमध्ये बसवून शाळेत नेले.

शाळेची इमारत तीन मजली असून सुंदर होती. बाहेरच्या फाटकावर खाकी गणवेश घातलेला चौकीदार होता. वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला. माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली. वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले. तिथे बरीच मुले आपल्या आई वडिलांबरोबर आलेली दिसली. मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलावीत होते व त्यांच्या प्रवेशअर्जावर सह्या करीत होते. मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. माझा वर्ग तळमजल्यावरच होता. वर्गात प्रवेश केल्यावर तिथे २०/२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असलेले दिसले. माझ्या बहिणीची मैत्रीण सुधा, हिची लहान बहीण पण होती. ती मला लगेच “हॅलो’ म्हणाली. माझ्या वर्गशिक्षिकेने मला तिच्या जवळच पहिल्या ओळीत बसविले. दोन तासांनंतर मधल्या सुट्टीची घंटी वाजली. सर्व मुले दफ्तर भरून व बंद करून बाहेर आली मी पण त्यांच्याबरोबरच बाहेर पडलो. माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती. नंतर आम्ही डबा खाल्ला. सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली. “

पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिकेने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले. पाठ्यपुस्तकांची यादी दिली. पाढे शिकविले. मला कविता म्हणावयास सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला शाबासकी दिली. साडेबारा वाजता शाळा सुटली. माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली. आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो. फाटकापाशी आमची आई वाट पाहत उभी होती. नंतर आम्ही तिघे रिक्षाने घरी आलो.

असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस. मी कितीही मोठा झालो तरीही हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील.

शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी – Shalecha Pahila Divas Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply