शाळा आणि शिस्त मराठी निबंध – Shala Ani Shist Marathi Nibandh
रस्त्यावरून जात असता जोरात घंटानाद ऐकू आला म्हणून बाजूला पाहिले, तर ती एक शाळा होती. घंटेपाठोपाठ राष्ट्रगीत सुरू झाले आणि क्षणात शाळेच्या आवारात नि:शब्द शांतता निर्माण झाली. ते दृश्य पाहून मला आश्चर्यच वाटले. अशी शिस्त शालेय जीवनात अंगवळणी पडल्यास ही मुले जेव्हा मोठी होतील, तेव्हा ती निश्चितच आदर्श नागरिक बनतील.
आपण पाहतो की, लष्करात कडक शिस्त असते आणि अशी शिस्त अंगी बाणलेले जवानच देशाचे संरक्षण समर्थपणे करू शकतात. मानवी जीवनात शिस्तीला फार महत्त्व आहे. ज्या घरातील व्यक्तींना शिस्त असते ते घर नेहमी नीटनेटके आढळते. शिस्तीबरोबरच नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा येतो. पण ही शिस्त आपल्याकडे वैयक्तिक व सामाजिक जीवनात अभावानेच आढळते.
साध्या साध्या गोष्टीतही आपण बेशिस्तीने वागतो. कोणाकडेही जाताना आपण त्यांना आगाऊ कळवत नाही. उलट अशा बेशिस्त वागण्यास आपण आपलेपणा’ हे गोंडस नाव देतो. आपल्या साध्या वागण्या-बोलण्यातही बेशिस्त आढळते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिस्त लागली, तर समाजातील अनेक समस्या सुटतील. ही शिस्त लावण्यास योग्य वय म्हणजे बालवय आणि योग्य स्थान म्हणजे शाळा होय.
काही जणांना शाळेतील ही शिस्त मान्य नाही. ते म्हणतात, “बालपण म्हणजे स्वैरपणे बागडण्याचे वय. बागडण्यात कशाला हवी शिस्त?” हे मत अगदी चुकीचे आहे. शिशुविहारात तीन वर्षांच्या मुलांना केवळ खेळातच रमवले जाते. पण या खेळातून त्यांना शिस्त शिकवावी लागते. शाळेत येणाऱ्या या बालकांना शाळेत वेळेवर येण्याची देखील शिस्त हवी, शाळेत आल्यावर आपल्या चपला, बूट योग्य जागी रांगेत ठेवण्यासही शिकवले जाते.
हे वळण लागल्यास तो छोटा घरीदारी कोठेही आपली पादत्राणे व्यवस्थितच ठेवील. राष्ट्रगीताचा मान कसा राखावा याचा संस्कार झालेला बालक भावी जीवनात कोठेही, केव्हाही राष्ट्रगीताचा अपमान करणार नाही व इतरांकडूनही तो होऊ देणार नाही.
विदयार्थिजीवनात शिस्त आवश्यक आहे. शाळेचा गणवेश कसा असावा? तो कसा घालावा? याचे नियम निश्चित केलेले असावेत व ते कटाक्षाने पाळले जावेत. शाळेत वागताना कसे वागावे याची ‘वर्तन-संहिता’ असावी. शाळेत वेळेवर येण्याची सवय लागलेला विदयार्थी पुढे कोणतेही काम करताना उशिरा जाणे पसंत करणार नाही. अशा बारीकसारीक सवयींतून शिस्त अंगी बाणत असते.
एक गोष्ट नक्की की, शिस्तीचे महत्त्व विदयार्थ्यांना उमगून त्यांनी ती स्वत:च उचलली पाहिजे, छडीच्या धाकावर राबवलेली शिस्त फार काळ टिकत नाही.
पुढे वाचा:
- शालेय जीवनातील गमतीजमती
- श्रमाचे महत्व निबंध मराठी
- शस्त्रबंदी निबंध मराठी
- शरदाचे चांदणे निबंध मराठी
- शरद ऋतु मराठी निबंध
- शब्द हरवले तर मराठी निबंध
- वेळेचा सदुपयोग मराठी निबंध
- वेरूळ अजिंठा लेणी निबंध मराठी
- वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध
- वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी
- वृक्षांचे सौंदर्य निबंध मराठी
- वृक्षांचे महत्व मराठी निबंध
- वृक्षसंपत्ती मराठी निबंध