Table Tennis Information in Marathi: टेबल टेनिस खेळाचा उगम 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये झाला. असे म्हटले जाते की त्याचे नाव पूर्वी ‘पिंग-पोंग’ असायचे. अनेक ठिकाणी याला ‘गॉसिमा’ असेही म्हटले जात असे. जेव्हा या खेळाची संघटना 1922 मध्ये तयार झाली, तेव्हापासून त्याला ‘टेबल टेनिस’ असे नाव देण्यात आले. या काळापासून त्याचे नियम देखील मानवीकरण केले गेले.

टेबल टेनिस हा एक इनडोअर गेम आहे जो लहान जागेत खेळला जाऊ शकतो. हा खेळ चीन, जपान, इंडोनेशिया इत्यादी देशांमध्ये पूर्णपणे लोकप्रिय झाला आणि त्यानंतर हळूहळू तो जगातील इतर देशांमध्येही लोकप्रिय झाला. हा खेळ भारतातही खूप लोकप्रिय आहे आणि त्यात वेळोवेळी स्पर्धा असतात.

1966 मध्ये, युरोपियन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये 33 देशांनी भाग घेतला. या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोघेही सहभागी झाले होते.

टेबल टेनिस खेळाची माहिती, Table Tennis Information in Marathi
टेबल टेनिस खेळाची माहिती, Table Tennis Information in Marathi

टेबल टेनिस खेळाची माहिती – Table Tennis Information in Marathi

टेबल टेनिस पुरुष आणि महिला दोघे खेळतात. हा खेळ लहान रँकेट आणि बॉलसह टेबलवर खेळला जातो. हे एक विशेष प्रकारचे टेबल आहे जे आयताकृती आकाराचे आहे. एका बाजूचा खेळाडू रॅकेटने चेंडू मारतो आणि तो दुसऱ्या खेळाडूच्या दिशेने उसळतो. मग दुसरा खेळाडू चेंडू रॅकेटने त्याच प्रकारे मारतो आणि टेबलवर चेंडू मारतो आणि पहिल्या खेळाडूच्या दिशेने बाउंस करतो. असाच खेळ चालू आहे.

टेबल टेनिस टेबल, चेंडू, रॅकेट
टेबल टेनिस टेबल, चेंडू, रॅकेट

टेबल टेनिस टेबल

 • लांबी – ९ फूट (२७४ सें.मी.)
 • रुंदी – ५ फूट (१५२.५ सें.मी.)
 • उंची – २ फूट ६ इंच (७६ सें.मी.)

टेबलाचा खेळण्याचा पृष्ठभाग (Playing Surface)

पृष्ठभाग असा असावा की‚ त्यावर १२ इंच उंचीवरून सोडलेला प्रमाणित चेंडू ८-३/४  इंच ते ९-३/४  इंच उशी घेईल. टेबलाचा रंग गडद हिरवा किंवा आकाशी असावा.

अंतिम रेषा (End Lines)

टेबलाच्या ५ फूट रुंदीच्या बाजूला असणाऱ्या २ सें.मी. जाडीच्या पांढऱ्या रंगाच्या रेषा.

बाजूकडील रेषा (Side Lines)

टेबलाच्या ९ फूट लांबीच्या बाजूला असणाऱ्या इंच जाडीच्या पांढऱ्या रंगाच्या रेषा.

मध्यरेषा (Centre Lines)

बाजूकडील रेषांपासून समान अंतरावर समांतर असणारी आणि खेळण्याच्या पृष्ठभागाचे दोन समान उभे भाग करणारी पांढऱ्या रंगाची रेषा. मध्यरेषेची जाडी (३ मि.मी.) असते.

टेबल टेनिस जाळे (Net)

अंतिम रेषांशी समांतर व समान अंतरावर जाळे असते. जाळ्याची लांबी ६ फूट असते व उंची ६ इंच असते. जाळे बांधण्यासाठी बाजूकडील अंतिम रेषांच्या बाहेर ६ इंच अंतरावर आधार असतील. जाळे व आधार (Supports) यांच्यामध्ये मोकळी जागा नसावी.

जाळ्यामुळे खेळण्याच्या पृष्ठभागाचे दोन समान भाग होतात. प्रत्येक भागास अंगण (Court) असे म्हणतात.

टेबल टेनिस चेंडू

 • वजन – २.७ ग्रॅम
 • व्यास – ४० मिलिमीटर
 • आकार – गोल
 • रंग – पांढरा‚ पिवळसर
टेबल टेनिस रॅकेट, टेबल टेनिस चेंडू
टेबल टेनिस रॅकेट, टेबल टेनिस चेंडू

टेबल टेनिस रॅकेट

रॅकेटच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळे रंग असतील. रॅकेटच्या एका बाजूला फक्त लाल आणि दुसऱ्या बाजूला फक्त काळा रंग असेल.

रॅकेटचा पृष्ठभाग लाकडी‚ सपाट व समान जाडीचा असावा. चेंडू खेळण्याच्या पूर्ण पृष्ठभागावर काटेरी रबराचे (Pimpled rubber) वेष्टन असावे आणि त्याची जाडी २ मि.मी.पेक्षा अधिक नसावी. सँडविच (Sandwich) प्रकारची रॅकेट असेल तर वेष्टनाची जाडी ४ मि.मी.पेक्षा अधिक नसावी.

पंचाला रॅकेटची तपासणी करण्याचा अधिकार राहील‚ तसेच खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याची रॅकेट प्रमाणित असल्याबद्दल खात्री करून घेऊ शकतो.

रॅकेटचा चेंडू खेळण्याचा पृष्ठभाग व रॅकेटची मूठ (Handle) यांच्यामधील भाग हा मुठीचाच भाग म्हणून गणला जातो. पकड चांगली धरता यावी म्हणून तो कोणत्याही द्रव्याने वेष्टित असला तरी चालेल.

टेबल टेनिसच्या काही व्याख्या

मोकळा हात (Free hand)

ज्या हातात रॅकेट धरलेली नसते‚ तो हात.

रॅकेट हँड (Racket hand)

ज्या हातात रॅकेट धरलेली असते‚ तो हात.

रॅली (Rally)

सर्व्हिसबरोबर चेंडू खेळात येतो आणि नियमभंग होईपर्यंत खेळात राहतो‚ त्याला रॅली असे म्हणतात.

लेट (Let)

कोणत्याही कारणाने दोघांपैकी कोणालाही गुण देता येत नाही आणि त्या गुणासाठी खेळ पुन्हा सुरू करावा लागतो‚ त्याला लेट म्हणतात.

व्हॉली (Volley)

प्रतिस्पर्ध्याने मारलेला चेंडू नेटवरून येऊन आपल्या अंगणास स्पर्श करण्यापूर्वीच खेळाडूने रॅकेटने अगर रॅकेट धरलेल्या हाताच्या मनगटाखालील भागाने चेंडू मारला‚ तर त्याला व्हॉली असे म्हणतात.


टेबल टेनिस खेळाचे नियम

१) नाणेफेक जिंकणारा खेळाडू / जोडी (Pair) बाजू किंवा सर्व्हिस याची निवड करील.

२) पहिल्या गेममध्ये (Game) प्रथम सर्व्हिस करणारा खेळाडू / जोडी दुसऱ्या गेममध्ये प्रथम सर्व्हिस स्वीकारील.

३) सर्व्हिस करणाऱ्याने आपल्या मोकळ्या हातात उघड्या तळहातावर चेंडू ठेवावा. हाताचा अंगठा मोकळा राहील व बोटे परस्परांस चिकटलेली असतील. चेंडू तळहातावर स्थिर राहील. सर्व्हिस करताना मोकळा हात टेबलाच्या पृष्ठभागाच्या उंचीपेक्षा वर पाहिजे. तळहातावरील चेंडू किमान ६ इंच (१६ सें.मी.) सरळ वर उडवावा व तो खाली येत असताना रॅकेटने मारावा. चेंडू वर उडविताना स्पिन करता येणार नाही.

सर्व्हिस करणाऱ्याचा रॅकेट धरलेला हात टेबलाच्या पृष्ठभागाच्या खाली नेता येणार नाही. सर्व्हिस करताना पाय आपटला व त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूचे अवधान विचलित होत नसेल‚ तर त्याचा नियमभंग मानू नये. सर्व्हिस करताना रॅकेटचा व चेंडूचा स्पर्श टेबलाच्या अंतिम रेषेच्या बाहेर झाला पाहिजे. सर्व्हिस करणाऱ्याने मारलेला चेंडू प्रथम त्याच्या अंगणाला स्पर्श करील व नंतर दोन्ही आधारांच्या मधून जाळ्यावरून पलीकडे जाऊन प्रतिस्पर्ध्याच्या  योग्य अंगणाला स्पर्श करील. (एकेरीसाठी)

४) चेंडू तळहातावरून वर उडविल्यापासून तो चेंडू खेळात आहे‚ असे मानले जाते.

५) सर्व्हिस केल्यावर चेंडू जाळ्याला लागून पलीकडील बाजूच्या योग्य अंगणात पडला‚ तर पुन्हा सर्व्हिस करावी. चेंडू जाळ्याला लागून सर्व्हिस करणाऱ्याच्या अंगणात पडला किंवा प्रतिस्पर्ध्याच्या अंगणाला स्पर्श होण्याऐवजी टेबलाच्या बाहेर पडला‚ तर तो सर्व्हिस करणाऱ्याचा फाउल मानला जातो.

६) प्रत्येक २ गुणांनंतर सर्व्हिस बदल होईल. (अपवाद – दोघांचेही १०-१० गुण होणे / त्वरा पद्धतीचा अवलंब)

७) एकेरी सामन्यात (Singles) सर्व्हिस करणारा योग्य सर्व्हिस करतो व सर्व्हिस स्वीकारणारा योग्य प्रकारे चेंडू परत टोलवितो आणि नंतर आलटून-पालटून त्यांनी जाळ्यावरून प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात चेंडू टोलवीत खेळ सुरू ठेवावयाचा असतो. दुहेरीमध्ये पहिली सर्व्हिस कोण करणार आणि ती कोण स्वीकारणार‚ हे खेळाडू परस्पर ठरवतील. दुहेरीतील सर्व्हिस करणारा खेळाडू आपल्या अंगणाच्या (टेबलाच्या) उजव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या अंगणाच्या उजव्या भागात योग्य सर्व्हिस करेल.

सर्व्हिस स्वीकारणारा तो चेंडू जाळ्यावरून सर्व्हिस करणाऱ्याच्या अंगणात कोणत्याही बाजूस खेळेल आणि तो चेंडू प्रथम सर्व्हिस करणाऱ्याचा साथीदार परतवेल. याप्रमाणे दोन्ही बाजूंकडील खेळाडू रॅली सुरू असेपर्यंत आलटून-पालटून चेंडू खेळतील. एका खेळाडूला सलग दोन वेळा चेंडू परतविता येणार नाही. खेळाडूने जाळ्यावरून पलीकडे टोलविलेला चेंडू प्रतिस्पर्ध्याकडील टेबलाच्या वरच्या कडेला (Edge) लागून खाली पडला तर तो चेंडू टोलविणाऱ्याचा नियमभंग नाही.

दुहेरीमध्ये सर्व्हिस बदल झाल्यावर पूर्वीची सर्व्हिस स्वीकारणारा प्रतिस्पर्धी  सर्व्हिस करेल आणि पूर्वीची सर्व्हिस करणाऱ्याचा जोडीदार ती स्वीकारेल.

८) चेंडू परत टोलविताना चेंडू टोलविणाऱ्याच्या अंगणाला चेंडूचा स्पर्श झाला‚ तर तो फाउल आहे.

९) चेंडू दोन्ही आधारांच्या मधून‚ आधाराच्या बाजूने प्रतिपक्षाच्या अंगणात गेला तरी चालतो.

१०) हातातून सुटलेल्या रॅकेटने चेंडू मारला गेला‚ तर तो फाउल आहे. तसेच हातात रॅकेट नसताना हाताने चेंडू मारणे‚ हाही फाउल आहे.

११) प्रतिपक्षापेक्षा किमान २ गुणांच्या आधिक्याने प्रथम किमान ११ गुण मिळविणारा खेळाडू/जोडी त्या गेममध्ये विजयी होतो/ होते. उदा. – ११-९‚ ११-८‚ ११-७. (गेममध्ये दोघांचे १०-१० गुण झाले असतील‚ तर गेम संपेपर्यंत खेळाडूला/जोडीला आलटून-पालटून एकेकदा सर्व्हिस मिळेल. दोन गुणांचे आधिक्य मिळविणारा खेळाडू/ जोडी विजयी होईल. उदा. १२-१०‚ १३-११‚ १४-१२.)

१२) गेम संपल्यानंतर खेळाडू बाजू बदलतील.

१३) दुहेरीमध्ये सर्व्हिस करण्यात किंवा स्वीकारण्यात क्रम बदलण्याची चूक लक्षात येताच पंच खेळ थांबवतील आणि योग्य क्रम राखण्याची कार्यवाही करतील. खेळ थांबवेपर्यंत झालेले गुण तसेच राहतील.

१४) अंतिम गेममध्ये कोणत्याही खेळाडूचे प्रथम ५ गुण झाल्यावर बाजू बदलाव्यात. (योग्य वेळी बाजू बदलल्या नाहीत‚ तर चूक लक्षात येताच बाजू बदलाव्यात. चूक लक्षात येईपर्यंत मिळालेले गुण तसेच राहतील.)

१५) दोन गेममध्ये ३० सेकंदांची विश्रांती राहील. एका गेममध्ये खेळाडूस एकदा त्रुटित काळाची मागणी करता येईल.

१६) सामन्याचा निकाल – सामना सात (किंवा विषम संख्या) गेम्सचा असेल. सातपैकी चार (पाचपैकी तीन) गेम्स जिंकणारा विजयी होतो.

टेबल टेनिस त्वरा पद्धत (Expedite System)

गेम सुरू होऊन १० मिनिटे पूर्ण होतात आणि त्या वेळी खेळाडूंचे / जोडींचे ९-९ गुण झाले नसतील‚ तर त्वरा पद्धत अमलात आणली जाते.

गेम सुरू झाल्यापासून १० मिनिटे होताच पंच खेळ थांबवतील. तेथून पुढे खेळ त्वरा पद्धतीनुसार सुरू राहील. दोन्ही खेळाडूंना / संघांना आलटून-पालटून एकेकदा सर्व्हिस करावयाची संधी मिळेल. संबंधित गेम व सामना संपेपर्यंत खेळ असाच सुरू राहील.

त्वरा पद्धतीनुसार रॅली सुरू होताच सर्व्हिस स्वीकारणाऱ्या खेळाडूने / खेळाडूंनी चेंडू किती वेळा यशस्वीरीत्या परत टोलविला‚ हे पंचांशिवाय दुसऱ्या अधिकाऱ्याने पाहून मोठ्याने एक ते तेरापर्यंत आकडे मोजावेत. सर्व्हिस स्वीकारणाऱ्या खेळाडूने / खेळाडूंनी तेराव्या वेळी चेंडू यशस्वीरीत्या परत टोलविला‚ तर रॅली थांबवून तो गुण त्याला दिला जातो.

१० मिनिटांनंतर खेळ थांबविताना रॅली सुरू असेल‚ तर त्वरा पद्धतीने खेळ सुरू करताना त्या रॅलीची सर्व्हिस केलेल्या खेळाडूला / संघाला प्रथम सर्व्हिस करण्याची संधी द्यावी. रॅली संपल्यावर खेळ थांबविला असेल‚ तर रॅलीची सर्व्हिस स्वीकारणाऱ्या खेळाडूला / संघाला प्रथम सर्व्हिस करण्याची संधी द्यावी.

टेबल टेनिस लेट (Let)

पुढील प्रसंगी खेळ थांबवून त्या गुणासाठी पुन्हा सर्व्हिस करावयास सांगितले जाते.

 1. योग्य सर्व्हिस केल्यास चेंडूचा जाळ्याला अगर आधाराला स्पर्श होऊन चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात पडणे. (त्या सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूकडून पुन्हा सलग असे घडले‚ तर लेटचाच अवलंब करावा.)
 2. प्रतिस्पर्धी तयार नसताना सर्व्हिस करणे.
 3. चेंडू फुटल्यामुळे वा अन्य कारणांनी खेळावयास अयोग्य बनणे.
 4. खेळाडूच्या खेळात व्यत्यय आणणारी घटना घडणे.
 5. बाजू बदल याबाबत घडलेली चूक लक्षात येणे.
 6. सर्व्हिस करताना अगर चेंडू परत मारताना अपघाताने खेळाडू पडणे.
 7. त्वरा पद्धतीचा अवलंब करणे.
 8. खेळाडूला सूचना किंवा ताकीद देणे.

टेबल टेनिस गुण

ज्या खेळाडूचा नियमभंग होतो‚ त्या वेळी त्याच्या प्रतिस्पर्ध्याला गुण मिळतो. चेंडू खेळात असताना खेळाडूकडून पुढील नियमभंग झाले‚ तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जातो.

 1. चुकीची सर्व्हिस केली.
 2. यशस्वीरीत्या चेंडू परत टोलविला नाही/ टोलविताना नियमभंग केला.
 3. खेळ सुरू असताना त्याच्या मोकळ्या हाताचा टेबलाच्या पृष्ठभागाला स्पर्श झाला.
 4. खेळ सुरू असताना त्याच्या शरीराचा‚ कपड्याचा किंवा रॅकेटचा नेटला किंवा आधाराला स्पर्श झाला.
 5. चेंडू व्हॉली केला.
 6. त्याचे शरीर‚ कपडे किंवा रॅकेट यांच्यामुळे टेबलाचा पृष्ठभाग हलला.
 7. नेटवरून आलेल्या चेंडूने अंगणाला स्पर्श करण्यापूर्वी व चेंडूने मागील किंवा बाजूची रेषा ओलांडण्यापूर्वी चेंडूचा त्याच्या शरीराला किंवा कपड्याला स्पर्श झाला.
 8. प्रतिस्पर्ध्याकडून त्याच्याकडे आलेल्या चेंडूला सलग दोनदा स्पर्श करणे.
 9. दुहेरीमध्ये चुकीच्या क्रमाने चेंडू खेळणे.

टेबल टेनिस स्पर्धा पद्धती

पुरुषांचे तसेच महिलांचे सांघिक सामने खेळवले जातात. संघातील पाच खेळाडूंपैकी तीन खेळाडू प्रतिस्पर्ध्याबरोबर एकूण पाच सामने खेळतात. त्यांच्या जोड्या स्वेथलिंग कप पद्धतीने पुढीलप्रमाणे लावल्या जातात :

पहिला संघ दुसरा संघ
AX
BY
CZ
AY
BX

पाचपैकी तीन सामने जिंकणारा संघ विजयी होतो.

वैयक्तिक विजेतेपद

वैयक्तिक विजेतेपद ठरविण्यासाठी पुरुष एकेरी‚ महिला एकेरी‚ पुरुष दुहेरी‚ महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी या पद्धतीनेही सामने खेळविले जातात.

येथे तुम्हाला टेबल टेनिस बद्दल (Table Tennis Information in Marathi) माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला यासंबंधी इतर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही www.marathime.com ला भेट देऊ शकता. यासह, आपण आपले विचार किंवा सूचना किंवा प्रश्न टिप्पणी बॉक्सद्वारे विचारू शकता. आम्ही तुमच्या सूचनांची वाट पाहत आहोत.

पुढे वाचा:

Leave a Reply