बाजारातील फेरफटका निबंध मराठी

त्यादिवशी अचानक मामाचा फोन आला, “आम्ही गिरगावात नाटकाला येणार आहोत. रात्री जेवायला तुमच्याकडे येऊ.” अचानक आलेल्या त्या फोनमुळे जेवायला काय करायचं हा प्रश्न आईला पडला आणि ‘पावभाजी’ करूया, असा विचार करून तिनं मला बाजारात जाऊन साहित्य आणायला सांगितलं. आईची आज्ञा निमूटपणे पाळून माझी स्वारी बाजाराकडे निघाली. दिवस पावसाळ्याचे होते. त्यामुळे आईनं ‘छत्री घेऊन जा’ अशी सूचनाही दिली होती.

मी बाजारात जायला आणि पावसाचं आगमन व्हायला एकच गाठ पडली होती. एका हातात कापडी भली मोठी पिशवी आणि दुसऱ्या हातात छत्री, अशा प्रकारे मी बाजारात चालू लागलो. पावसामुळे साहजिकच लोकांनी छत्र्या उघडल्या. त्यामुळे एकमेकांना छत्र्यांचे धक्के लागत होते. भाजीवाले जिवाच्या आकांतानं “कोबी पाच रुपया पाव, पाच रुपया पाव’ असं ओरडत होते. मला तर कोबी, टॉमेटो, फ्लॉवर, बटाटे, कांदे अशी भरपूर भाजी खरेदी करायची होती. सुरूवातीला थोडी भाजी खरेदी केली देखील आणि तसाच भिजत पुढं जात होतो.

पावसापासून संरक्षण करण्यासाठी लगेचच भाजीवाल्ल्यांनी आपल्या डोक्यावर प्लॅस्टिकचं छत उभं केलं. कांद-बटाटेवाल्याशी एका बाईचं भांडण चालू होतं. दोन रुपयासाठी घासाघीस चालू होती. भाजीवाला पैसे कमी करायला तयार नव्हता आणि त्या बाई जास्त पैसे द्यायला तयार नव्हत्या. दरम्यान पाऊस कमी झाला होता. त्यामुळे थोडं बरं वाटत होतं.

एका माणसानं काही टॉमेटो खरेदी केले. ते त्यानं प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकले. थोडं अंतर तो चालून गेला मात्र, ती प्लॅस्टिकची पिशवी फाटली आणि सगळे टॉमेटो त्या चिखलात पडले. तो माणूस ते टॉमेटो उचलू लागला होता. तेव्हा आपण कापडी पिशवी आणली ते बरं झालं, असं मनाला वाटून मी सुखावलो.

इतक्यात महानगरपालिकेची गाडी आली आणि ती गाडी येत असल्याची वर्दी एका भाजीवाल्यानंच आणली. त्याबरोबर मांडलेले स्टॉल्स आवरण्याची धांदल चालू झाली. तरी पोलिसांनी काही टोपल्या त्या गाडीत टाकल्याच. “साहेब, पैसे घ्या, पण आमच्या टोपल्या दया’, असा एक भाजीवाला, गयावया करू लागला होता. पोलिस मात्र काहीच ऐकायला तयार नव्हते. त्या भाजीवाल्यालाच त्या पोलिसांनी गाडीत बसवले.

मला अजून बरंच साहित्य विकत घ्यायचं होतं. पण म्हटलं, आधी पावभाजी मसाला, मस्का विकत घ्यावा म्हणून भाजीगल्लीतील छोट्याशा दुकानात शिरलो. दुकानदारानं माझ्या हाती बिल दिलं. ते बिल दयायला पैसे काढण्याकरिता खिशात हात घातला, तेव्हा लक्षात आलं की या गर्दीत माझं पाकीटच कुणीतरी मारलं होतं. आता घरी काय रामायण घडणार या विचारानं जिन्नस न घेताच घरी जाऊ लागलो. हा फेरफटका मला चांगलाच महागात पडला होता.

पुढे वाचा:

Leave a Reply