संगणक वर मराठी निबंध – Essay On Computer in Marathi

संगणक म्हणजेच कॉम्प्युटर हा आता सर्वांच्या फारच ओळखीचा झाला आहे. आमच्या घरात एक संगणक आहेच. त्याशिवाय आई, बाबा आणि आजोबा ह्यांच्यापाशी त्यांचे त्यांचे लॅपटॉप आहेत. मला काही त्यातले फारसे कळत नाही कारण मी लहान म्हणून मला कुणी त्याला हातच लावू देत नाही.

परंतु आता मी तिसरीत गेलो आहे. आता आम्हाला शाळेतच संगणक हा एक विषय आहे. त्यामुळे आता मला हळूहळू संगणक वापरता येऊ लागला आहे.
संगणक खूप खूप पूर्वी अमेरिका ह्या देशात शोधला गेला. सुरूवातीला तो फारच अगडबंब होता. त्याला फक्त गणित करता येत होते. परंतु हळूहळू त्याच्यात सुधारणा होत गेली. मग इंटरनेटचाही शोध लागला. त्यामुळे दोन संगणक एकमेकांशी जोडता येणे शक्य झाले.

आता तर काय, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. मोबाईल हा तर छोटा संगणकच आहे. माझ्या आईच्या मोबाईलमध्ये मी कधीकधी गेम्स खेळतो. त्यातून आई इमेल करते, व्हाट्सअप करते, फेसबुक बघते, आगगाडीचे टाईम टेबल बघते, बँकेची कामे करते आणि अहो, त्यातूनच ती फोनही करते हं.

म्हणजे बघा ना हा संगणक कसा आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे तो.

संगणक आपला मित्र निबंध मराठी – Computer My Friend Essay in Marathi

मला संगणक खूप आवडतो. संगणकावर खूप छान छान खेळ खेळता येतात. मी संगणकावर खेळ खेळतो.

एकदा ताईने मला संगणकाच्या खूप गमती दाखवल्या. संगणकावर आपल्याला मजकूर टंकलिखित करता येतो. त्यात हव्या त्या दुरुस्त्या करता येतात. अक्षरांचे आकार लहानमोठे करता येतात.

संगणकावर कोणतीही आकृती अचूक काढता येते. चित्रे काढता येतात. त्यांत रंग भरता येतात. गणिते सोडवता येतात. संगणक हिशेब ठेवू शकतो. या सर्व गोष्टी संगणकावर भरभर व अचूक करता येतात.

इंटरनेटमुळे आपल्याला हवी ती माहिती संगणकावर मिळवता येते. संगणकाद्वारे मित्रांशी गप्पा मारता येतात. हल्ली संगणकावर विमानांची व गाड्यांची तिकिटेही मिळतात.

संगणकाचे फायदे सांगावे तेवढे थोडेच आहेत. संगणक हा खरोखर आपला मित्र आहे.

संगणक निबंध मराठी – Computer Essay In Marathi

संगणक क्रांती घडली आहे, संगणकयुग अवतरले आहे असे आपण वाचतो. आणि ते खरेही आहे. मानवाचा मेंदू हा सुद्धा एक संगणकच आहे असे आपण म्हणतो. ह्या मेंदूचा उपयोग करूनच तर मानवाने संगणक तयार केला. सुरूवातीचा अगदी प्राथमिक अवस्थेतील संगणक हा १९४१ साली जर्मनीत बनवण्यात आला होता. अंकगणितातील आणि अभियांत्रिकीतील (इंजिनियरिंगमधील) प्रश्न अत्यंत वेगाने सोडवणे ह्यासठी त्यांचा उपयोग करण्यात येत होता.

त्यानंतर मात्र संगणक आता एवढे प्रगत झाले आहेत की एरवी अशक्यप्राय वाटली असती अशी कामेही आता ते सहज करू लागले आहेत.

संगणकामध्ये वेगवेगळे प्रोग्रॅम किंवा आज्ञावली भरल्यामुळे आता बरीचशी कठीण कामे हाताच्या चुटकीसरशी होऊ लागली आहेत. एवढेच नव्हे तर अनेक संगणक एकमेकांना जोडता येऊ लागल्यामुळे बँका, रेल्वे, वेगवेगळ्या कंपन्या इत्यादींना आपल्याकडील सर्व संगणक एकमेकांशी संलग्न करता येऊ लागले आहेत. त्यामुळे आता घरबसल्या आपण संगणकाद्वारे आगगाडीचे तिकिट काढू शकतो, वेगवेगळी बिले भरू शकतो आणि बँकेचेही बरेचसे व्यवहार करू शकतो. आता तर आपण आपले सगळे करही संगणकाद्वारे भरूही शकतो.

संगणकाच्या जोडीला इंटरनेटची सुविधा मिळाल्याने तर खूप मोठी क्रांती झाली आहे. इंटरनेटच्या माहितीजालावर कुठल्याही विषयाची माहिती मिळते. ही माहिती मिळवायला पूर्वी बरीच मेहनत घ्यावी लागत असे आणि बराच वेळही द्यावा लागत असे. परंतु तीच माहिती आता अक्षरशः हाताच्या बोटावर आपल्याला उपलब्ध झाली आहे.आकाशातील कृत्रिम उपग्रहांशी संगणकाची संदेशवहनयंत्रणा जोडलेली असल्यामुळे हे शक्य होते.

एके काळी संगणक हा आकाराने अगदी अवाढव्य होता, तो विकत घेणे सर्वसामान्य माणसांना शक्यच नव्हते, शिवाय त्याची कामेही मर्यादितच होती. आता मात्र तसे नाही.

आता ब-याच जणांपाशी लॅपटॉप असतात. त्याशिवाय आयफोन किंवा ऍण्ड्रॉइड फोनमुळे तर मोबाईलमध्येच संगणक समाविष्ट झाला आहे. फोन करणे आणि लघुसंदेश पाठवणे ही कामे मोबाईलवर होतातच पण त्याशिवाय संगणकाचीही बरीचशी कामे मोबाईल करतो.

मी कधी मोठी होईन आणि माझी आई मला कधी मोबाईल घेऊन देईल असे मला झाले आहे. बघुया, कधी येतो तो दिवस?

संगणक चे महत्त्व मराठी निबंध – Computer Essay in Marathi

संगणकाचा सर्वप्रथम शोध १८२२ साली चार्ल्स बॅबेज ह्या मेकॅनिकल इंजिनियरने लावला. म्हणूनच त्याला संगणकाचा जनक असे म्हणतात. परंतु त्याने शोध लावलेल्या संगणकाचे आजच्या संगणकाशी काहीच साम्य वाटत नाही. त्यानंतर १९३१ साली ऍलन टुरिंग ह्याने आधुनिक संगणकाची पायाभरणी केली. तिथून पुढे नवनवे शोध लागत संगणकाला आजचे स्वरूप मिळाले आहे.

सुरूवातीचा संगणक अगदी अगडबंब होता. म्हणजे त्याला एका स्वतंत्र खोलीत वेगळे ठेवले जात असे. त्याच्याकडून करून घेतली जाणारी कामेही प्राथमिक अंकगणितीय स्वरूपाची होती. परंतु हळूहळू जसजशी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती घडू लागली तसेतसे संगणकाच्या स्वरूपातही बदल घडू लागले. आजकाल तर संगणक एवढा लहान बनला आहे की तो आपल्या मोबाईलमध्येही मावू लागला आहे. लॅपटॉप, डेस्कटॉप, आयपॅड अशाही स्वरूपात तो आता उपलब्ध झाला आहे.

संगणकाचा वापर कसा करायचा ते आता आम्हा मुलांना शाळेतही शिकवतात. संगणकाला इंटरनेटची जोड मिळाली की आपण अगदी पृथ्वीला प्रदक्षिणा घालू शकतो. आज ब-याच व्यवस्थांचे आणि प्रणाली संगणकीकरण झाले आहे. बँकाच्या सर्व शाखा आता एकमेकींशी संगणकाद्वारे जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे कुठल्याही शाखेत जाऊन ग्राहक आपले व्यवहार करू शकतात. रेल्वेच्या तिकिटप्रणालीचेही संगणकीकरण झाले आहे त्यामुळे प्रवाश्यांना घरबसल्या तिकिट काढता येते. त्यात त्यांचा वेळ पुष्कळ वाचतो. आयकर, मालमत्ता कर, सरकारी विभाग ह्यांचेही आता संगणकीकरण होत आहे. संगणकीकरणामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो, कामात बिनचूकपणा येतो.

संगणकावरून इमेल पाठवता येतात, त्यामुळे पत्रव्यवहार तातडीने होऊ शकतो. दूरवरच्या व्यक्तीशी स्काईपच्या माध्यमातून बोलता येते. गुगलवरून कुठलीही माहिती हाताच्या अगदी बोटांवर मिळू शकते. त्यामुळे सगळे जग अगदी जवळ आल्यासारखे वाटते.

संगणक अभियंते आणि प्रोग्रामर संगणकासाठी अनेक आज्ञावली तयार करतात. संगणक हा मानवी मेंदूसारखा वेगवेगळी कामे करू शकतो. परंतु त्याच्या मेमरीत जी आज्ञावली भरली गेली असते त्या आज्ञावलीत काही चूक असेल तर तो ती स्वतःहून दुरूस्त करू शकत नाही. त्यामुळे संगणकाची चूक असे आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात ती मानवी चूक असते. कारण शेवटी संगणक हा मानवाचा दास आहे. तो केवळ आज्ञापालन करणारा सेवक आहे. संगणकापासून यंत्रमानवही तयार केला आहे. त्याला रोबो असे नाव आहे. हा रोबो घरातलीही कामे करू शकतो. त्यामुळे संगणक हे मानवाला मिळालेले वरदानच आहे असे म्हटले पाहिजे.

संगणक निबंध मराठी मध्ये – Sanganak Nibandh in Marathi

संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाबरोबरच मानवाने शास्त्रीय व तांत्रिक क्षेत्रात उन्नती केली. त्याने त-हेत-हेचे इलेक्ट्रॉनिक तांत्रिक शोध लावून मानवोपयोगी आधुनिक उपकरणे बनविली. संगणकाचा शोध मानवाच्या यशाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. शोध कार्य व अन्य क्षेत्रातून संगणकाला काढून टाकला तर मानव शास्त्रीय प्रगती करू शकणार नाही, मागील काही वर्षांत संगणाकाचा विकास तीव्रतेने झाला आणि होत आहे. संगणक मानवाच्या सूचनेनुसारच कार्य करतो.

टाईपरायटरप्रमाणेच संगणकात अक्षरांचे, अंकांचे, विरामचिन्हांचे संकेत असलेल्या कुंजिका असतात. त्यांच्या साहाय्याने संगणकाला आदेश दिला जातो. संगणकात लिहिले गेलेले सर्व आकडे, साहित्य साठविले जाते आणि ते एकानंतर एक समोर येतात. संगणकात साठविलेल्या साहित्याचे आकडेवारीचे मुद्रण प्रिन्टरच्या सहाय्याने करता येते.

आपल्या दैनिक जीवनात संगणकाचा उपयोग खूप वाढला आहे. त्याद्वारे अनेक कामे करवून घेतो. संगणकामुळे मोठमोठी व किचकट कामे, आकडेमोडी चुटकीसरशी होतात. संगणकाद्वारे गुन्ह्याची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. लहान मुले संगणकावर खेळ खेळतात. विविध विषयांचे पाठ्यक्रम संगणकावर तयार होतात. रेल्वे आणि विमानाचे आरक्षण संगणकाच्या मदतीने करता येते.

बँकांमध्ये पण संगणकाचा उपयोग वाढला आहे. बँकेतील संगणकात प्रत्येक ग्राहकाचे खाते व त्याचे पूर्ण विवरण साठविलेले असते. बँकेतील दैनंदिन देण्याघेण्याचे हिशेबही असतात. ग्राहकाला संगणकावर त्वरित आपल्या खात्याची माहिती मिळू शकते.

भारतात शिक्षणाच्या प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने दूर शिक्षण घेणाच्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. चित्रपट उद्योगातही संगणकाच्या साहाय्याने दृश्यांचे चित्रण होते. वाहतुकीचे नियंत्रणही संगणकाच्या साहाय्याने केले जाते. आपात्कालीन बातम्यांचे प्रसारणही संगणक करतो. अलीकडे लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सेवेअंतर्गत संगणक टेलिफोनच्या तारांद्वारे जोडले आहेत ज्यामुळे महत्त्वाचे संदेश क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.

संगणक आज मानवासाठी अति आवश्यक आणि महत्त्वपूर्ण यंत्र आहे ज्याचा उपयोग आपल्या गरजांनुसार सतत केला जात आहे. भविष्यात याचा उपयोग आणखी वाढतच जाणार आहे.

संगणक वर मराठी निबंध – Essay On Computer in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply