विवाहाचे दृश्य निबंध मराठी – Vivahache Drushya Marathi Nibandh

भारतीय परंपरेत विवाह हा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. मुलगा असो की मुलगी त्यांचे लग्न शक्य तितके थाटामाटाने होते. प्रत्येक आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे तर कधी त्याबाहेर जाऊन खर्च करतात. ऐश्वर्य आणि भव्यपणा आजच्या समाजाचे एक अभिन्न अंग बनले आहे.

मागच्या आठवड्यात माझ्या एका वर्गामित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाण्याची संधी मिळाली. शाळेतील आणखी काही मित्र बरोबर होते. विवाह स्थळ केशवपुरम् मधील सनातन मंदिराच्या जवळचा एक पार्क होते. पार्कमध्ये भला मोठा लांब रुंद मंडप टाकला होता. मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याच्या दारासारखे केले होते. दाराबाहेर विद्युत चलित फवाऱ्यांतून मंद सुगंधाचे थेंब फवारले जात होते. मंडपात गालिचे टाकलेले होते. जवळपास दोन हजार खुा टाकलेल्या होत्या. सर्वत्र फुलांचा सुवास दरवळत होता. एका बाजूला खाण्याची व्यवस्था केलेली होती. टेबलावर त-हेत-हेचे खाद्यपदार्थ सजावट करून ठेवले होते. चाट, पाणीपुरी मिठाई यांचे स्टॉल होते. एका बाजूला शीतपेये, आईस्क्रीम ठेवलेले होते. वधूपक्षाकडून वर पक्षाच्या स्वागताची खूप जोरदार तयारी केलेली होती. मधुर सनई वादन चालू होते.

खूप गडबड होती. स्त्रिया, मुले रंगीबेरंगी कपड्यांमध्ये खूप आकर्षक दिसत होते. तरुण मुली सजविलेली ताटे घेऊन वराची वाट पाहत होत्या. साडेनऊ वाजता वरात आली. तिचे वधूपक्षाकडून हार्दिक स्वागत केले गेले. स्त्रियांनी गीत गाऊन वरास घोडीवरून उतरविले. मुख्य दारावर चौरंगावर उभे करून औक्षवण केले. मग त्यांना विवाहासाठी असलेल्या स्टेजवर बसविण्यात आले. इकडे वहाडी, पाहुणे यांचे खाणे पिणे सुरू झाले. लोक प्रेमाने एकमेकांना भेटत होते. मुहूर्त जवळ आल्यावर वधूला आणण्यात आले व वराजवळच्या आसनावर बसविण्यात आले. वधू-वर खूप सुंदर दिसत होते. एकमेकांना हार घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मंगलाष्टके म्हटली गेली. या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले. खूप फोटो काढण्यात आले. वातावरण उल्हसित व आनंदमय होते. काही जण खात होते काही गप्पा मारीत होते. साडेदहानंतर लोक जेवण करून जाऊ लागले. आम्ही वधूपक्षाकडून असल्यामुळे शेवटी जेवण केले आणि मित्राच्या बहिणीला भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

पुढे वाचा:

Leave a Reply