काश्मीरमधील बागबगीचे मराठी निबंध

काश्मीरमधले बागबगीचे हे मोगलकालीन आहेत. साधारणपणे ज्यूख्रिश्चन-मुस्लिम पद्धतीत स्वर्गाची जशी कल्पना असते तशा ह्या बागा असतात.काश्मीरमधील बागाही त्याला अपवाद नाहीत.

हल्लीच मे महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या आईबाबांसोबत काश्मीरला गेले होते. तिथे निशात आणि शालिमार ही मोगलांनी बांधलेली उद्याने बघण्याची संधी मला मिळाली. ह्या दोन्ही बागा दाल सरोवराच्या काठावर, एकमेकींच्या जवळच बांधलेल्या आहेत. दाल सरोवराच्या काठाशी असल्यामुळे त्यांना पाणी देणे कधीच कठीण गेले नाही.

ह्या बागांत आम्ही गेलो तेव्हा हवा अगदी आल्हाददायक होती त्यामुळे मन प्रसन्न झाले. तिथे कितीतरी प्रकारची रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलझाडे, वृक्षवेली आणि रोपटी आहेत. गुलाब तर सगळीकडे अगदी रानफुले उगवावीत तसा उगवला होता. ते पाहून काश्मिरी गुलाब एवढा सुप्रसिद्ध का आहे ते समजले. तिथेच एक मोठे कारंजेही होते. त्यातील पाण्याचा नाच पाहून आम्हा मुलांनाही नाचावेसे आणि बागडावेसे वाटत होते. चोहीकडे मऊ आणि हिरवीगार हिरवळ पसरली होती. त्या हिरव्या गालिचावरून अनवाणी चालताना पायांना अगदी सुखद गुदगुल्या होऊ लागल्या. ह्या दोन्ही बागांची देखभाल खूप चांगली केली जाते. तिथे कुशल बागवान आणि माळी नेमण्यात आलेले आहेत.

ज्या दिवशी आम्ही ह्या बागा पाहाण्यास गेलो त्या दिवशी तिथे पुष्कळ लोक आले होते. मे महिना असल्यामुळे देशी आणि विदेशी पर्यटकांची खूप गर्दी होती. तिथे पाळलेले मोर होते, सरोवरात हंस विहार करीत होते, कबुतरे होती. सारे काही अगदी स्वर्गात असल्यासारखेच वाटत होते. त्यामुळेच तर मोगल बादशहाजहांगीर असे म्हणाला होता की पृथ्वीवर कुठे स्वर्गअसेल तर तो फक्त ह्याच ठिकाणी असेल. त्याने शालिमार ही बाग आपली पत्नी नूरजहान हिच्यासाठी बांधून घेतली होती.

ह्या बागांत पूर्वीच्या काळी ब-याच हिंदी चित्रपटांचे शुटिंग होत असे. परंतु पुढे पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणे सुरू केल्यावर ते बंद झाले. काही काळापूर्वी तर पर्यटकसुद्धा इथे येत नव्हते. परंतु आता तेही येऊ लागले आहेत.

ह्या बागांत सूचिपर्णी जातीचे पाईन आणि फरचे कितीतरी घनदाट वृक्ष आहेत. फुलांच्या रोपांच्या वाफ्यांना षट्कोनी, चौकोनी, अंडाकृती असे आकार दिलेले आहेत. त्यावरून भुंगे आणि फुलपाखरं भिरभिरत होती. डोक्यावर तुरे असलेले बुलबुल पक्षी किलबिल करीत सगळीकडे बागडत होते. आम्ही तर दंग होऊन सारे दृश्य पाहातच राहिलो. सा-या वातावरणात जादूच भरून आल्यासारखी वाटत होती. ते दृश्य माझ्या मनोपटलावरून कधीही पुसले जाणार नाही. पुन्हा मी काश्मीरला केवळ ते दृश्य पाहाण्यासाठीच जाईन असे मला वाटते.

पुढे वाचा:

Leave a Reply