कुमारांपुढील कार्य किंवा हे आम्हीही करू शकतो! मराठी निबंध

१९९१ हे साल भारतात ‘साक्षरता-प्रसार’ वर्ष म्हणून पाळले गेले. महाराष्ट्रातील. दोन जिल्हे – सिंधुदुर्ग आणि वर्धा तर आता शंभर टक्के साक्षर झाले आहेत, असे म्हणतात. ही किमया कशी झाली? सगळ्यांनी अगदी झटून काम केले म्हणूनच ना ! या सगळ्यांत आम्हीही आलो. आम्ही म्हणजे ‘विदयार्थी’, ‘कुमार’. या कार्यात सदैव अग्रभागी असणाऱ्या कुमारांच्या कामगिरीचे दूरचित्रवाणीने अनेकदा दर्शन घडवले आहे. आजही देशातून निरक्षरता पूर्णपणे हद्दपार झालेली नाही. आम्ही या निरक्षरतेला गाडून टाकण्यास मदत करू शकू.

निरक्षरतेबरोबरच येणारी दुसरी अक्काबाई म्हणजे अंधश्रद्धा ! अज्ञानावर पोसलेली ही अंधश्रद्धा अनेकदा घातक ठरते. मग ती कुणा अजाण बालिकेला देवदासी बनवते, तर कधी निष्पाप प्राण्याला ‘देवाचा बळी ‘ देते. अशा या अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी वर्षानुवर्षे जोपासल्या गेल्यामुळे त्या समाजात आवश्यक व अनिवार्य मानल्या गेल्या आहेत. या रूढीविरुद्ध, अंधश्रद्धांविरुद्ध विज्ञाननिष्ठ माणसे झगडत आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही विदयार्थी-यु -युवक आमचा खारीचा वाटा उचलू शकणार नाही का?

नित्यनियमाने दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही राष्ट्रगीत म्हणतो. राष्ट्राच्या एकतेची प्रतिज्ञा घेतो; पण या राष्ट्रासाठी आम्ही काय करतो? आमच्या राष्ट्राचे नुकसान करणारे देशद्रोही सतत आमच्याभोवती वावरत असतात. त्यांना त्यांची दृष्टकृत्ये करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न संघटित कुमारशक्ती करू शकणार नाही का? आपल्या देशाच्या सीमांवर परकीय आक्रमण होण्याची नेहमीच शक्यता असते. हे परकीय आक्रमण थोपवण्याचे सामर्थ्य आपल्यात आले पाहिजे. स्वसंरक्षणाच्या बाबतीत परावलंबी राहणे म्हणजे गुलामीला आमंत्रण देण्यासारखे आहे. संरक्षणाच्या कामासाठी आपली पूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्हांला आमच्या या कुमारावस्थेतील काळाचा चांगला उपयोग करून घेता येईल.

आपण ज्या समाजात राहत असतो, त्या समाजाचे आपण ऋणी असतो. या समाजाचे जे शत्रू आहेत, त्यांना आमच्यासारखे कुमार सहजगत्या टिपू शकतील. मालात भेसळ करणारे, माल दडवून ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करणारे, लहान मुलांना पळवणारे व त्यांना वाईट मार्गाला लावणारे, बुवाबाजी-भोंदूगिरी करून भोळ्याभाबड्यांना फसवणारे अशांना शोधून काढून समाजाला पीडा देणारी ही कीड नाहीशी करण्याचे काम आम्ही कुमार नक्कीच करू शकतो.

आपला फुरसतीचा वेळ वृद्ध, रुग्ण, अपंग यांच्या सेवेसाठी खर्च करून ‘समयदानाचे पुण्य ‘ही कुमार संपादन करू शकतील.

पुढे वाचा:

Leave a Reply