मी ढग झालो तेव्हा निबंध मराठी – Mi Dhag Zalo Tar Nibandh in Marathi

आज आम्ही सारा दिवस श्रमदान करण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे रात्री बिछान्यात पडताच गाढ झोप लागली नि चमत्कारच झाला ! माझे शरीर मला पिसासारखे हलके हलके वाटू लागले. तरंगत तरंगत मी खोलीबाहेर पडलो आणि गॅस भरलेल्या फुग्यासारखा वरवर जाऊ लागलो; कारण मी ढग झालो होतो. वर जाता जाता मी खाली वळून पाहिले, तर तेथे मला एक नदी दिसली. नदीच्या पात्रात मला माझे रूप दिसले. किती सुंदर होते ते ! अगदी पांढरेशुभ्र!

आता इतक्या उंचावरून सबंध गाव माझ्या नजरेच्या टप्प्यात येत होते. उंचावरून आमचे गाव किती चिमुकले दिसत होते! गावातील वैष्णवी नदी तर एखादया लहानशा सुतळीसारखी दिसत होती आणि डोंगरावरची झाडे तर कुंडीतली रोपेच वाटत होती!

ढगाचे रूप प्राप्त झाल्यामुळे माझा वेग विलक्षण वाढला होता व मला मुक्तता लाभली होती. मी स्वच्छंदपणे कोठेही विहार करू शकत होतो. मी आमच्या गावावरून चकरा मारत होतो. गाव नीट दिसावे म्हणून मी थोडासा खाली आलो. गावातील अस्वच्छता पाहून मला खूपच वाईट वाटले. काही गावकरी आळशीपणाने पारावर गप्पा मारत बसले होते. त्यांनी कामाला लागावे असे मला खूप वाटले. पण मी काय करू शकणार !

गावाबाहेरच्या शेतात काही माणसे काम करत होती. पण एका शेतात दोन-चार माणसे शिरून कणसे चोरत होती. ती माणसेही आमच्या गावातीलच होती. गावातील पाटील व काही गावकरी ‘कमी पावसाची’ चिंता करत होते. मनात आले, आपण पाऊस होऊन त्यांच्यावर कोसळावे. पण ते कसे शक्य आहे? मी तर आहे पांढरा ढग. आणि पावसासाठी हवा काळा ढग, पाणी असलेला! –

आकाशात कडाडल्याचा आवाज झाला आणि मी खडबडून जागा झालो. पुन्हा माझे शरीर जड जड वाटू लागले. कारण आता मी माझ्या बिछान्यावर होतो. मी पाहिले ते एक स्वप्न होते तर !

पुढे वाचा:

Leave a Reply